>> तिघांचीही तुरुंगात रवानगी; बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी रामपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निवाडा
उत्तरप्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे सरचिटणीस आझम खान आणि त्यांच्या कुटुंबासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात रामपूर जिल्हा सत्र न्यायालयाने आझम खान, त्यांची पत्नी तन्जीम फातिमा आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान यांना दोषी ठरवले आहे. तसेच तिघांनाही सात-सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर या तिघांचीही न्यायालयातून थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली.
अब्दुल्ला आझम खान यांच्या जन्म प्रमाणपत्राशी संबंधित प्रकरणात भाजप नेते आकाश सक्सेना यांनी 2019 मध्ये न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यावर रामपूर न्यायालयाने काल निकाल दिला.
विशेष सरकारी वकील अरुण कुमार यांनी या प्रकरणी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अब्दुल्ला आझम खान यांच्या बनावट जन्म प्रमाणपत्राच्या दोन खटल्यांमध्ये अब्दुल्ला खान आणि त्यांच्या आई-वडिलांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अब्दुल्ला आझम यांच्याविरोधात गंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अब्दुल्ला खान यांच्याकडे दोन जन्म प्रमाणपत्रे असल्याचा आरोप करण्यात आला होता. यापैकी एक जन्म प्रमाणपत्र जानेवारी 2015 मध्ये लखनऊ नगरपालिकेने बनवलेले होते, तर दुसरे रामपूरमधील आहे, जे 28 जून 2012 मध्ये रामपूर नगरपालिकेने बनवले होते. ही वेगवेगळी जन्म प्रमाणपत्रे वेगवेगळ्या कामांसाठी आपल्या सोयीनुसार वापरण्यात आली असल्याचा अब्दुल्ला खान यांच्यावर आरोप आहे.
अब्दुल्ला खान यांच्यावर खोट्या जन्म प्रमाणपत्राच्या आधारावर पासपोर्ट बनवून परदेश दौरे करणे आणि दुसऱ्या जन्म प्रमाणपत्राचा वापर हा सरकारी कामांसाठी केल्याचा आरोप आहे. दोन्ही जन्म प्रमाणपत्रे बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर अब्दुल्ला खान, आझम खान, तन्जीम फातिमा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांना शिक्षादेखील सुनावण्यात आली.