पणजी मनपा क्षेत्रातील रस्ते जूनपर्यंत पूर्ण ः महापौर

0
3

पणजी महानगरपालिका क्षेत्रातील सार्वत्रिक रस्ते आणि मलनिस्सारण वाहिनी हे दोन्ही प्रकल्प पुढील वर्षी जूनपर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी काल दिली.

राजधानी पणजीतील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागते. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने शहरातील अनेक भागांत पावसाचे पाणी तुंबून रस्ते पाण्याखाली जातात. ही पुराची समस्या सोडविण्यासाठी राजधानीत सुमारे १३० कोटी रुपये खर्चून रस्ते व मलनिस्सारण हे दोन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या दोन्ही प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर महापौर मोन्सेरात यांनी वरील माहिती दिली. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ७० कोटी आणि ६० कोटी रुपये खर्चाचे युनिव्हर्सल फूटपाथ आणि सीवरेज चेंबर्स आणि सीवेज लाइनची कामे केली जात आहेत. निविदेत एक मुद्दा शिल्लक आहे, तो दुरुस्त करून सरकारकडे अतिरिक्त निधीची मागणी करणे आवश्यक आहे, असेही महापौर मोन्सेरात यांनी सांगितले. आंतरविभागीय समन्वयाच्या अभावामुळे कामात अनेक अडथळे येत आहेत. पोर्तुगीज काळातील जुने नाले दुरुस्त करून पाण्याचा प्रवाह वाढवणे आणि पाणी साचणे टाळणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती यावेळी महापौर मोन्सेरात यांनी दिली.