Home Featured पणजी मनपावर पुन्हा भाजप

पणजी मनपावर पुन्हा भाजप

0

बाबूशप्रणीत टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्हला 27 जागा

उत्पल पर्रीकरांच्या आम्ही पणजीकरला 3 जागा

पणजी महानगरपालिका मंडळाच्या गेल्या 11 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजप, मंत्री बाबूश मोन्सेरातप्रणीत टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह पणजी गटाने 30 पैकी 27 जागांवर दणदणीत विजय मिळविला असून उत्पल पर्रीकर यांचा पाठिंबा असलेल्या आमी पणजीकर गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
पणजी महानगरपालिकेवर मंत्री बाबूश मोन्सेरात गटाने पुन्हा एकदा वर्चस्व मिळविले आहे.

प्रभाग 4 मधून विद्यमान महापौर रोहीत मोन्सेरात 244 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. या निवडणुकीत टुगेदर फॉर पणजी गटाचे विठ्ठल चोपडेकर, शुभम चोडणकर, उदय मडकईकर आणि कॅरालिनो पो हे चार माजी महापौर विजयी झाले आहेत. तर, आमी पणजीकर गटाचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना पराभव पत्करावा लागला आहे. तसेच माजी नगरसेविका शीतल नाईक यांनाही पराभव पत्करावा लागला.
पणजी महानगरपालिकेच्या 11 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीतील मतमोजणी बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात काल करण्यात आली.

अनेक ठिकाणील चुरशीच्या लढती
महानगरपालिकेच्या अनेक प्रभाग निवडणुकीत चुरशीच्या लढती झाल्या होत्या. त्यामुळे निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपप्रणीत गटाचे 27 उमेदवार निवडून आले असले तरी आमी पणजीकर गटांच्या उमेदवारांना चांगली मते मिळालेली आहेत. काही अपवादात्मक प्रभाग वगळता अनेक प्रभागातील मतांचा आढाला घेतला असता चुरशीच्या लढती झाल्याचे दिसून येत आहे. बाबूश मोन्सेरात यांनी मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन गटाच्या विजयी उमेदवारांचे स्वागत केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह गटाच्या विजयी उमेदवारांचे स्वागत केले.

फुर्तादोंचा पराभव
पणजी महानगरपालिकेच्या राजकारणात गेली कित्येक वर्षे कार्यरत असलेले माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांना वर्ष 2026 च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. मागील सहा निवडणुकीत माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो निवडून आले होते. तथापि, त्यांचे पुत्र लिओनिड फुर्तादो प्रभाग 7 मधून 68 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहेत.
प्रभाग 11 मधून तुकाराम चिन्ननावर सर्वाधिक 457 मतांनी विजयी झाले आहेत. तर, प्रभाग 17 मधून जॅक सुखिजा केवळ 2 मतानी विजयी झाले आहेत. प्रभाग 17 मध्ये दोन वेळा मतांची फेरमोजणी करण्यात आली.

उत्पल पर्रीकरांकडून मतदारांचे आभार
उत्पल पर्रीकर यांनी आम्ही पणजीकर पॅनलला पाठिंबा दिलेल्या मतदारांचे आभार मानले आहेत. आमच्या पॅनलला अपेक्षेनुसार जागा मिळाल्या नसल्या तरी पणजी शहरासाठी नेहमीच कार्यरत राहणार आहे. महानगरपालिका निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. या कौलाचे विश्लेषण केले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी काल निवडणूक निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सत्ताधारी भाजपच्या पॅनलला केवळ पंधरा दिवसांच्या तयारीतून कडवे आव्हान उभे केले होते. आमच्या पॅनलचे 4 उमेदवार 21 मते, 30 मते, 41 मते, 59 मते अशा कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत. सर्व कार्यकर्त्यांद्वारे अभ्यास करून सातत्याने जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला जाणार आहे, असेही उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.