>> नगरनियोजनमंत्र्यांची माहिती; स्थगित ओडीपींपैकी दोन आराखडे पुन्हा चालीस
पणजी, ताळगाव, बांबोळी आणि म्हापसा येथील बाह्य विकास आराखडे (ओडीपी) अधिसूचित करण्यात आले असून, आता मसुदा आराखडे तयार करण्यासाठी खुले करण्यात आले आहेत, अशी माहिती नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी काल नगरनियोजन मंडळाच्या बैठकीनंतर दिली.
राज्यात भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर विश्वजीत राणे यांच्याकडे नगरनियोजन खात्याचा पदभार देण्यात आला. मंत्री राणे यांनी नगरनियोजन खात्याचा ताबा घेतल्यानंतर पणजी, म्हापसा, फोंडा, मडगाव ओडीपींचे मसुदे स्थगित ठेवण्याचा आदेश २७ एप्रिल २०२२ रोजी जारी करण्यात आला होता.
राणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी घेण्यात आलेल्या नगरनियोजन मंडळाच्या बैठकीत पणजी, म्हापसा, ताळगाव आणि बांबोळी येथील ओडीपींच्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर सदर ओडीपी अधिसूचित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता, या चार ओडीपींचे मसुदे तयार केले जाणार आहेत.
उत्तर गोवा नगरनियोजन मंडळाच्या अध्यक्ष तथा ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात आणि मंडळाने नियुक्त सल्लागारांसह ओडीपी मसुदे आराखडे तयार करण्यात येणार आहेत. ओडीपींचे मसुदे तयार करण्यात आल्यानंतर सूचना आणि हरकतींसाठी खुले करण्यात येणार आहे, असेही मंत्री राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संवर्धन समितीच्या बैठकीत अनेक प्रकल्पांवर विस्तृत चर्चा करण्यात आली असून, काही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. इतर अर्जदारांना देखील संवर्धन समितीने सुचवलेल्या बदलांचे पालन करण्यास सूचित केले आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे.
आराखडे कालमर्यादेत तयार करणार : राणे
ओडीपी आराखडे कालमर्यादेत तयार केले जाणार आहेत. विकास ही निरंतर प्रक्रिया असून, विकास थांबवू शकत नाही. ओडीपींच्या माध्यमातून योग्य नियोजनबद्ध आराखडे तयार करण्यावर भर दिला जाणार आहे, असेही विश्वजीत राणे यांनी सांगितले.