पं. नेहरू ः अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे जागतिक शांतिदूत

0
17
  • शंभू भाऊ बांदेकर

पं. जवाहरलाल नेहरू यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा हा लेख-

आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून सुपरिचित असलेले पं. जवाहरलाल नेहरू हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्यसैनिक, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, अखिल भारतीय काँग्रेसचे पहिले तरुण अध्यक्ष, जागतिक कीर्तीचे लेखक, बाळगोपाळांचे चाचा, एक थोर मुत्सद्दी आणि जागतिक शांतिदूत, या सर्व स्तरांवर वेळोवेळी महत्त्वपूर्ण योगदान देऊन त्यांनी स्वतःचे श्रेष्ठत्व तर सिद्ध केलेच, पण सुयोग्य विकासासाठी जाणीवपूर्वक, परिश्रमपूर्वक, दूरदर्शीपणाने मोठे योगदान दिलेले आहे आणि म्हणूनच त्यांना आदराने आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून गणले गेले आहे.

हे सारे खरे असले तरी पं. नेहरूंच्या विचारांचा मागोवा घेता आपल्या लक्षात येते ते हे की, आपल्याला जे पटले त्याच्यासाठी जिद्दीने, उत्साहाने पुढे जायचे व जे चुकले असे आपल्या लक्षात आले किंवा कोणी तसे लक्षात आणून दिले तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायची. त्यांच्या या पैलूवर प्रकाश टाकणारी अनेक व्यक्तिमत्त्वांची अनेक उदाहरणे देता येतील. येथे फक्त वानगीदाखल आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची गोष्ट नमूद करतो. पं. नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या सतरा वर्षांच्या कालावधीत त्यांचा दोन राष्ट्रपतींशी संबंध आला. त्यातील पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व दुसरे डॉ. राधाकृष्णन हे होत. त्यातील पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याशी नेहरूंचा पहिला खटका उडाला तो देशाच्या राज्यघटनेवरून. डॉ. प्रसाद यांचे म्हणणे होते की, भारताची मौलिक घटना (मूळ प्रत) जी राष्ट्राला अर्पण करायची आहे ती हिंदी भाषेत असावी. पण पं. नेहरूंनी वेळेचा अभाव असल्याने इंग्रजी भाषेत लिहिलेल्या घटनेचे हिंदीत रूपांतर करणे कठीण आहे. तसेच, भाषांतरित घटनेला पुन्हा सभासदांकडून संमती घ्यावी लागेल, अशी अडचण सांगितली. त्यामुळे राष्ट्रपतींचा रोष पत्करून ही घटनेची मूळ प्रत इंग्रजीतच राष्ट्राला अर्पण केली गेली.

त्यापूर्वीही नेहरू-प्रसाद वाद रंगला होता तो हंगामी राष्ट्रपतिपदावरून! नेहरूंना या पदासाठी चक्रवर्ती राजगोपालाचारी (राजाजी) हे योग्य उमेदवार वाटत होते, तर काँग्रेसी नेत्यांच्या मते डॉ. प्रसाद घटना समितीचे ‘प्रेसिडेंट’ होतेच, आणि शासनाचा पुढील कारभार नव्या घटनेप्रमाणे व्हायचा होता, तेव्हा ‘पंतप्रधान’ आणि ‘राष्ट्रपती’ ही दोन्ही पदे तुल्यबळ नेत्यांनी भूषवावीत आणि या दोन्ही पदांवर लोकांचा विश्वास संपादन केलेल्या व्यक्तीच असणे आवश्यक होते. शेवटी नेहरूंनी राजाजींच्या- प्रसादजींच्या- संदर्भात जे वक्तव्य केले ते वादग्रस्त ठरले व वृत्तपत्रांनीही त्याला बरीच प्रसिद्धी दिली. नेहरू म्हणाले होते, ‘राजाजींना दिल्लीच्या उच्चभ्रू समाजात परकीय राजकारणात वावरायला इतके दिवस लागले तर राजेंद्र प्रसाद यांना कितीतरी दिवस लागतील! तेव्हा राजाजींनाच अग्रक्रम दिला पाहिजे.’ यावर बहुसंख्य काँग्रेसी नेत्यांनी त्यांच्या विधानास विरोध करीत म्हटले, ‘राष्ट्रपतिपदाचा उमेदवार आधुनिक नसून, सर्व जनतेला मान्य असा असला पाहिजे.’ यावर नेहरू-प्रसाद यांचा बराच पत्रव्यवहारही झाला. नेहरूंना आपली बाजू कमकुवत आहे हे पटले. त्यांनी माघार घेतली व डॉ. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती झाले. भविष्यात दोघांमध्ये बरेच मतभेद, वाद झाले असले तरी दोघांनीही मनाचा मोठेपणा दाखवून ते वाद, मतभेद मिटवून टाकले व पूर्वीसारखाच सलोखा त्यांच्यामध्ये निर्माण झाला. नेहरू रात्री तीन वाजेपर्यंत आपली कामे उरकत असत, तर प्रसादजी पहाटे तीन वाजता उठून आपली दिनचर्या सुरू करत. दर सोमवारी सकाळी नऊ वाजता नेहरू राष्ट्रपती भवनावर जाऊन शासनाच्या सर्व घडामोडींची माहिती त्यांना पुरवत व प्रसादजीही सर्व ऐकून आपले म्हणणे मांडत.

आपल्या देशाचा विकास करताना तो सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचला पाहिजे व त्यासाठी त्या माणसांनाही बरोबर घेऊन गेले पाहिजे यावर त्यांचा भर होता. उदाहरणादाखल येथे ‘सहकार’ क्षेत्राबाबत सांगता येईल. सहकार क्षेत्र हे सामान्य जनतेपासून असामान्यांपर्यंत सर्व जातिधर्मातील व सर्व राजकीय पक्षांचा विकास करणारे क्षेत्र आहे, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. सहकारामुळे आर्थिक आणि सामाजिक स्तरावरील विकास तर होईलच, पण लोकशाही आणि सहकार हे हातात हात घालून जाणारे असल्यामुळे खरा विकास दोघांच्या माध्यमातून साध्य होऊ शकतो, अशी त्यांची भावना होती. म्हणून आर्थिक धोरणासंबंधाने नेहरूंनी 29 जानेवारी 1955 या दिवशी प्रथम जाहीररीत्या भारतीय काँग्रेसमध्ये आपली मते मांडली व सहकार क्षेत्राला समाजवादी दृष्टिकोनातून कसे महत्त्व आहे हे सांगितले. भारताच्या आर्थिक धोरणाचा पाया याद्वारे कसा मजबूत होईल, याचे विस्तृत प्रतिपादन केले.

आमच्या देशाचा चौफेर विकास करतानाच विदेशातही आपली प्रतिमा कशी उजळेल, आपला देश इतर देशांना कोणत्या प्रकारचे सहकार्य करू शकेल व इतर देशांकडून आपण कोणते सहकार्य घ्यायचे यासाठीही त्यांनी म. गांधीजींच्या अहिंसा, शांती मार्गांनी यशस्वी प्रयत्न केला होता. तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी व पं. नेहरू यांची दाट मैत्री होती. दोघांनीही इतर देशांना शांततेचा संदेश देत ‘जागतिक शांतिदूत’ म्हणून समर्पक कामगिरी पार पाडली होती.

गोव्याच्या बाबतीत सांगायचे म्हणजे, गोवा मुक्ती तब्बल चौदा वर्षांनी उशिरा झाली, याबद्दल नेहरूंकडे अंगुलिनिर्देश केला जातो. याबाबत नवी दिल्लीच्या पत्रसूचना कचेरीच्या पुराभिलेखातील 1947 ते 1961 या काळातील अधिकृत कागदपत्रांवरून असा निष्कर्ष काढण्यात आला- ‘पं. नेहरूंनी वारंवार सांगितले होते की, कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या भारतीय भूमीवर पोर्तुगीज साम्राज्यवादाचे शेवटचे अवशेष येथे कायम राहू देणार नाही. आम्ही खूप संयमाने वागत आलो आहोत आणि यापुढेही संयम राखू.’ पण पोर्तुगीज हुकूमशाही वठणीवर येत नाही असे दिसले तेव्हा पं. नेहरूंनी तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांच्याशी दीर्घ बोलणी करून गोवा मुक्त केला. यासाठी 19 डिसेंबर 1961 हा दिवस उजाडावा लागला व तोवर चौदा वर्षांचा वनवास गोवा व गोवेकरांना भोगावा लागला.
बाळगोपाळांचे प्रेमळ चाचा, देश स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षे तुरुंगात भोगलेले देशभक्त व आपल्या प्रभावी लेखणीने मोठमोठ्यांना अचंबित करणारे लेखक हीदेखील त्यांची अनोखी व अप्रतिम कामगिरी आहे. त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र प्रणाम!