कुटुंबाचे ‘स्वास्थ्य’ का बिघडतेय?

0
21
  • रमेश सावईकर

कुटुंबातील सदस्यांची मानसिकता कितीही आधुनिकतेची वावटळे आली तरी कौटुंबिक एकता व एकजीनसीपणाशी फारकत घेणारी असणार नाही याची दक्षता प्रत्येक सदस्याने घ्यायला हवी. कुटुंब विभक्त झाले तरी संस्कृती व संस्कारांचा प्रभाव नि प्रेम, वात्सल्य यांच्या अतूट अनुबंधानी ते कायमचे अंतस्थ जोडलेले असले पाहिजे तरच कौटुंबिक व व्यक्तिगत सौख्य प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होऊ शकते.

सतत बदलत असलेल्या सामाजिक परिस्थितीमुळे समाजाच्या सर्व घटकांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे समाजव्यवस्था बदलते किंवा त्यामधील आमूलाग्र बदलामुळे परिवर्तन घडून येते. व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम हा विशेष महत्त्वाचा असतो. मूलभूत अशा काही गोष्टी असतात, त्यामुळे माणसावर लहानपणापासून होणारे संस्कार त्याला कुटुंबवत्सलतेचा वारसा प्राप्त करून देतात. ज्यावेळी मूलभूत बाबींना फाटा देऊन आधुनिक सामाजिक प्रगतीसाठी माणूस बंधने झुगारून देतो, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वैर जीवन जगण्यात धन्यता मानतो, त्यावेळी समाजाचा एक मूलभूत घटक बनून असलेले कुटुंब व्यवस्थित चालू शकत नाही. कौटुंबिक व्यवस्था ढासळते आणि कौटुंबिक वात्सल्य धोक्यात येते. त्यामुळे माणसाचे, कुटुंबाचे अपरिमित नुकसान होते आणि पर्यायाने समाजाचेही!
माणूस एकटा राहू शकत नाही. तो सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे चांगले, सुखी, आनंदी जीवन जगण्यास त्याला कुटुंबाची व समाजाची नितांत गरज असते. आजच्या परिवर्तनीय परिस्थितीत कुटुंबव्यवस्था ढासळली आहे. पर्यायाने समाजव्यवस्थाही. त्यामुळे नव्या पिढीसमोर मोठे आव्हान उभे आहे. त्यातून बाहेर पडणे आवश्यक आहे. म्हणून कुटुंबव्यवस्था राखून ठेवण्यासाठी, पूर्वपरंपरेनुसार ती ढासळू नये याकरिता अथक प्रयत्न केले तर समाजातील अस्वस्थता, निराशा नि त्यातून उद्भवणारे वैराग्य दूर होऊ शकते.

व्यक्तिस्वातंत्र्याचे स्तोम समाजात वाढलेले आपल्याला दिसून येते. आर्थिक सुबत्तेमुळे लोक वाढत्या गरजा भागवितात, पण माणसाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडले आहे. याची कारणे म्हणजे- ‘मी फक्त माझ्यासाठी आहे; इतरांसाठी नव्हे!’ ही भावना मूळ धरू लागली आहे. नवीन पिढीसाठी ते स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या दृष्टीने भविष्यात घातक ठरू शकते. कुटुंब हा एक व्यापक समाजरचनेचा महत्त्वाचा घटक आहे. तो समाजातील एक महत्त्वाचा आणि आधारभूत असा प्राथमिक गट आहे.
प्रेम, आपुलकी, त्याग, समान हितसंबंध जपण्याची ईर्षा, सहकार्य आदी कुटुंबजीवनातून निर्माण होणारे प्राथमिक भावबंध हे व्यापक समाजजीवनातही पाझरत जाऊन व्यक्त होतात. समाजाच्या संस्कृतीचे कुटुंब हे एक प्रमुख वाहन असते. समाजाची मूल्ये, परंपरा, रीतीभाती व आचार यांचा वारसा व्यक्तीला एका संस्कारक्षम अवस्थेत मिळतो. इतर संस्थांच्या जीवनात प्रवेश करण्यापूर्वी संस्कार व वात्सल्य व्यक्तीला कुटुंबाकडूनच मिळते. व्यक्तीला एक निश्चित स्थान व दर्जा प्राप्त करून देण्याचे कार्य कुटुंबाकडूनच होते.

व्यक्तीच्या बालपणी सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या ती (व्यक्ती) पूर्णपणे कुटुंबाच्या अधीन असते. त्यामुळे आई-वडील, बहीण-भाऊ आणि इतर नातेवाईक यांच्याकडून होणाऱ्या संस्कारांचा तिच्या व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम हा विशेष महत्त्वाचा असतो.
कुटुंबाच्या निवासस्थानाचे स्वरूप व आकार एकमेकांशी व कुटुंबाची रचना व कार्य ही एकमेकांशी अधिक निगडित असतात. समाजशास्त्रीय विचारांत सामाईक निवासस्थान, कुटुंबातील सभासदांची एकमेकांशी असलेली नाती, त्यांचे हक्क, कर्तव्ये, भूमिका व कार्ये ही लक्षणे महत्त्वाची आहेत. आई, बाप आणि मुले यांचे भावनिक दुवे या ना त्या स्वरूपात समाजात दिसून येतात. या अर्थाने ‘कुटुंब’ हे केंद्र सर्वकालीन आहे. कुटुंब हे समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्या दृष्टीने एक मूलभूत महत्त्वाची संस्था आहे.

सामाजिक, मानसिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या कुटुंबाकडून होणाऱ्या कार्यांना समाजरचनेत एक असाधारण स्थान आहे आणि यातच संस्था या दृष्टीने कुटुंबाचे सामर्थ्य आहे. विवाह नीतीमध्ये पूर्ण व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह, आचार-विचार, नीतीनियम आणि मतमूल्यांचा पगडा व्यक्तीवर सतत असे. सर्व समाजच (समुदायच) एका मोठ्या कुटुंबासारखा एकजिनसी बनलेला असे. त्यामुळे समाजव्यवस्था सुरळीत होती, तशी कुटुंबव्यवस्थाही!
आज सामाजिक परिस्थितीत आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. मग तो सामाजिक कर्तव्यांचा व जबाबदारीचा विसर पडल्यामुळे असो किंवा अधिकारप्राप्तीच्या आग्रही मागणीसाठी असो; त्याचा परिणाम व्यक्तीवर, त्याच्या एकूणच जीवनशैलीवर झाल्याने कौटुंबिक शांतता, एकता नि स्वास्थ्याला तसेच कौटुंबिक स्थैर्याला तडा गेला आहे.

भोवतालची सर्वंकष बहुजन संस्कृती (मास-कल्चर) यास कारणीभूत आहे. कौटुंबिक संगोपन व नीतीनियमांवर मर्यादा पडल्याने व्यक्तिस्वातंत्र्याला स्वैरतेचे पंख फुटले आहेत. कुटुंबातील वात्सल्य, प्रेम, आपुलकी, माया आदी भावनांचे सदस्यांमधील परस्पर संबंध ठिसूळ झालेत. मूल्य, नीतिमत्ता, कौटुंबिक एकजीनसीपणा या भावनांच्या अनुबंधाची साखळी तुटेपर्यंत ताणण्याची, नकारात्मक विचार-भावनांची मानसिकता वाढली आहे. त्यामुळे या साखळीचे दुवे झिजून खूपच कमकुवत बनले आहेत. वेळप्रसंगी सांधूनही ते ठीकठाक, पूर्ववत होणे असंभव. अशा कौटुंबिक परिस्थितीचे वर्चस्व आजच्या पिढीतील व्यक्तीवर असलेले प्रकर्षाने जाणवते.

मनुष्य आत्मकेंद्री झाला आहे. कुटुंबाचा एक जबाबदार सदस्य म्हणून वागण्याची, आचरण करण्याची आपलीही काही जबाबदारी असते याचे त्याला भान नाही. सोयिस्करपणे त्याचा त्याला विसर पडला आहे. व्यक्तिनिष्ठ जीवनाचे व स्वकेंद्रित ठराविक मूल्यांचे वर्चस्व या व्यक्तीत आढळते. व्यक्तिस्वातंत्र्याचे स्तोम माजवून स्वैर स्वातंत्र्य उपभोगणे, मनमानेलपणे वागणे, कुटुंबातील अन्य सदस्यांना न जुमानणे, किंबहुना कमी लेखणे हा त्यांचा प्रकृतिस्वभाव व स्थायिभाव बनला आहे. एखादाच कुटुंबवत्सल कुटुंबातील सदस्य याला अपवाद असेल.
व्यक्तीचे समाजीकरण होत आहे. व्यक्तिमत्त्वाची बांधणी कुटुंबवत्सलतेशी निगडित राहिलेली नाही. समाजरचनेत स्थिरतेचा अभाव आढळतो. आजच्या व्यक्तीमध्ये कौटुंबिक मूल्ये, आचार-विचार, जीवनपद्धती व शैली याविषयी अनास्थेची भावना मूळ धरू लागली आहे. ती मुळासकट दूर होण्याचे सोडाच, दिवसेंदिवस कालानुरूप वृक्षवेलीवत वाढतच आहे. हा वेलू गगनावरी जाण्याच्या दिशेने पावले टाकत आहे, आणि तो भविष्यात गगनावरी जाईलही, कोणी भवितव्य सांगावे? संस्कृतीचे सातत्य जपून माणसे वागत नाहीत. कुटुंबापासून दूर जाणे पसंत करतात. त्यामुळे निर्माण झालेले सहजीवनातले हे मूलभूत प्रश्न ठरले आहेत.

माणसाला शेवटी जीवनात जगण्यासाठी लागणारा पैसा, संपत्ती, याचबरोबर सुख, समाधान व शांती हवी असते. आधुनिक जीवनशैलीनुसार जीवन कंठणाऱ्या माणसांना अतिव व्यस्त-व्यग्रतेमुळे (नोकरी- उद्योग- व्यवसायामुळे) समाधानाचे दोन श्वास घेण्यापुरताही अवधी मिळत नाही. म्हणून माणसे मंदिरात जाऊन भगवंताच्या सगुणरूपी सान्निध्यात काही क्षण घालवितात.
नवी व्यक्तिनिष्ठ विचारधारणा, जीवनशैली, स्वकेंद्रित मनोवृत्ती, जबाबदाऱ्यांच्या जाणिवेचा अभाव, व्यक्तिस्वातंत्र्याबाबतची अवास्तव संकल्पना नि त्यानुसार वर्तन व आचरण या गोष्टींमुळे कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडले आहे. त्याचा परिणाम कुटुंबातील सर्वच सदस्यांना भोगावा लागतो आहे, ही सत्य परिस्थिती आहे. वरवरचा बेगडी मुलामा काढून आमचे कुटुंब हे वात्सल्यस्वरूप आहे, प्रेम-माया आदी भावनांनी, अनुबंधांनी घट्ट नि स्थिर आहे असा बहाणा केला तरी वास्तवता व प्रत्येकाला येणारा अनुभव मनोभावे कोणी नाकारू शकत नाही.
कुटुंबातील सदस्यांची मानसिकता कितीही आधुनिकतेची वावटळे आली तरी कौटुंबिक एकता व एकजीनसीपणाशी फारकत घेणारी असणार नाही याची दक्षता प्रत्येक सदस्याने घ्यायला हवी. कुटुंब विभक्त झाले तरी संस्कृती व संस्कारांचा प्रभाव नि प्रेम, वात्सल्य यांच्या अतूट अनुबंधानी ते कायमचे अंतस्थ जोडलेले असले पाहिजे तरच कौटुंबिक व व्यक्तिगत सौख्य प्रत्येक व्यक्तीला प्राप्त होऊ शकते. हे सौख्य लाभले तरच जीवनात सुख, समाधान व शांती अनुभवता येईल. तशी मानसिकता जागृत ठेवून ती प्रत्यक्षात कार्यान्वित करायला हवी. कुटुंबाची नि समाजाची ही अमूल्य गरज आहे.