>> आयोगाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
राज्य निवडणूक आयोगाकडून येत्या आठवड्यात पंचायत निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून १८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंबंधी कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने पावसाळ्यानंतर पंचायत निवडणूक घेण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून या शिफारशीवर कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील १८६ ग्रामपंचायतीची मुदत येत्या १९ जून २०२२ रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी निवडणूक घेणे आवश्यक आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या ट्रिपल टेस्ट अहवालावरून पंचायत निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे. ओबीसी समाजावर आरक्षणाबाबत अन्याय होऊ नये म्हणून निवडणूक पावसाळ्यानंतर घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. पंचायत मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पंचायतीवर प्रशासकांची नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भाजप गोवा प्रदेशाच्या राज्य कार्यकारी समितीच्या शनिवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ट्रिपल टेस्टनंतर पंचायत निवडणूक घेण्याचा ठराव संमत करण्यात आलेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या ट्रिपल टेस्टच्या निवाड्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणूक घेण्यासाठी १८ जून २०२२ ही तारीख निश्चित करून प्रस्ताव सरकारला सादर केला होता. हा प्रस्ताव सरकारकडून फेटाळण्यात आला आहे.