पंचायत निवडणुकांसाठी ६२५६ उमेदवारी अर्ज

0
31

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सात दिवसांत एकूण ६२५६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम सातव्या दिवशी १४९९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मंगळवार दि. २६ जुलै रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांमध्ये काही उमेदवारांनी दुहेरी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामुळे अर्जांच्या छाननीनंतर वैध उमेदवारी अर्जांची संख्या स्पष्ट होणार आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १० ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ यावेळेत मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेतले जाणार आहे. निवडणूक होणार्‍या १८६ ग्रामपंचायतींमध्ये एकूण १५२८ प्रभाग आहेत आणि त्यासाठी ६२५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १८ ते २५ जुलैपर्यंत मुदत होती. पेडणे तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी ५१५ अर्ज, सत्तरीतील १२ पंचायतींसाठी ३५५ अर्ज, डिचोलीतील १७ पंचायतींसाठी ४८८ अर्ज, बार्देशातील ३३ पंचायतींसाठी १२६३ अर्ज, तिसवाडीतील १८ पंचायतींसाठी ६९१ अर्ज, फोंड्यातील १९ पंचायतींसाठी ७३३ अर्ज, सासष्टीतील ३३ पंचायतींसाठी ९९४ अर्ज, सांगेतील ७ पंचायतींसाठी २११ अर्ज, धारबांदोड्यातील ५ पंचायतींसाठी १७२ अर्ज, काणकोणातील ७ पंचायतींसाठी २४१ अर्ज, केपेतील ११ पंचायतींसाठी ३११ अर्ज, तर मुरगावातील ७ पंचायतींसाठी २८२ अर्ज दाखल करण्यात आले.

रात्री १० नंतर मद्य विक्रीस मनाई
उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायत क्षेत्रातील पब, बार, क्लब, शॅक्स, मद्यविक्री दुकान व इतर आस्थापनांमध्ये रात्री १० वाजल्यानंतर मद्य विक्रीवर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहेत. पेडणे तालुक्यातील हळर्ण, कासारवर्णे, चांदेल-हंसापूर, डिचोली तालुक्यातील हरवळे, तिसवाडीतील ताळगाव पंचायत आणि उत्तर गोव्यातील सर्व नगरपालिका, पणजी महानगरपालिका क्षेत्रात हे निर्बंध लागू होत नाहीत. या निर्बंधाचे पालन न करणार्‍या मद्यविक्री दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची मंगळवार दि. २६ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून छाननी केली जाणार आहे. बुधवार दि. २७ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात.

बार्देश तालुक्यातून सर्वाधिक अर्ज
पंचायत निवडणुकांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू होती. पंचायत निवडणुकांसाठी सर्वाधिक उमेदवारी अर्ज बार्देश तालुक्यातून दाखल झाले आहेत. त्या खालोखाल सासष्टी तालुक्यातून ९९४ अर्ज सादर झाले आहेत. सर्वात कमी अर्ज धारबांदोड्यातून (१७२) सादर करण्यात आले आहेत.

काही उमेदवारांची बिनविरोध निवड
डिचोली तालुक्यातील पिळगाव, मये, अडवलपाल, लाटंबार्से पंचायत क्षेत्रातून चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सत्तरी तालुक्यातील ठाणे, पिसुर्ले, माऊस, भिरोंडा, सावर्डे पंचायत क्षेत्रातून पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सासष्टीतील नागोवा, सुरावली, कावरे, बाळ्ळी या पंचायतीतील एक-एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. याबाबतची अधिकृत घोषणा अर्जांची छाननी झाल्यानंतरच होणार आहे.