कॉंग्रेसच्या चार खासदारांचे निलंबन

0
15

>> लोकसभेत आंदोलन केल्याने कारवाई

महागाईविरोधात सभागृहात फलक घेऊन निदर्शने केल्याबद्दल कॉंग्रेसच्या चार खासदारांना लोकसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी काल निलंबित करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वी आंदोलन न करण्याचा करण्याचा इशारा दिला होता. आंदोलन करायचे असेल, तर त्यांनी सभागृहाच्या बाहेर आंदोलन करावे, असेही त्यांनी बजावले होते; पण कॉंग्रेसच्या खासदारांनी महागाईविरोधातील आपले आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे कॉंग्रेसच्या ४ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

मणिकम टागोर, जोथिमणी, रम्या हरिदास आणि टी. एन. प्रतापन असे निलंबित करण्यात आलेल्या कॉंग्रेस खासदारांची नावे आहेत. निलंबनाची कारवाई केल्यानंतर चारही खासदारांनी संसद भवनासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जाऊन जोरदार घोषणाबाजी केली.

सोमवारी दुपारी ३ वाजल्यानंतर महागाईबाबत चर्चेसाठी तयार आहोत; परंतु सभागृहात फलक घेऊन केलेले आंदोलन सहन करणार नाही. तुम्हाला जर फलक दाखवून आंदोलन करायचे असेल, तर ते सभागृहाबाहेर करा, असे बिर्ला यांनी बजावले.