पंचवाडीत टँकर उलटून एक जण ठार

0
4

मापा-पंचवाडी येथे शुक्रवारी दुपारी पाणीवाहू टँकरची खडीवाहू ट्रकला धडक बसल्यानंतर तो टँकर एका कारला धडकून रस्त्यावर उलटला. त्यात टँकरमधील महमद उर्फ हसन अब्बास शिलेदार (42, रा. आनंदवाडी-सावर्डे) याचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील चंद्रावती कोरगावकर (70) व अन्य दोघे जण जखमी झाले. टँकरचालक व अन्य एक सुखरुप बचावला. टँकर रस्त्यावरच उलटल्याने जवळपास 3 तास फोंडा-सावर्डे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अपघातानंतर कुडचडे व फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनाम्यानंतर वाहतूक सुरळीत केली.

प्राप्त माहितीनुसार, जीए-01-झेड-1305 क्रमांकाचा टँकर सावर्डे येथून पंचवाडी येथे जात होता. मापा येथील अरुंद रस्त्यावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या जीए-09-यू-3646 क्रमांकाच्या ट्रकला टँकर धडकला. ट्रकला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण गेल्याने टँकरची धडक विरुद्ध दिशेने येणाऱ्या जीए-11-टी-4583 क्रमांकाच्या कारला बसून तो रस्त्यावर उलटला. त्यात टँकरमध्ये बसलेला महमद याचा जागीचा मृत्यू झाला, तर कारमधील तिघे जण जखमी झाले. जखमींना कुडचडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर सुमारे 3 तास सावर्डे ते फोंडा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या भागातून ये-जा करणाऱ्या प्रवाशी बसेस सुद्धा अपघातामुळे अडकून पडल्या. कित्येक प्रवाशांनी बसमधून मापा ते सावर्डेपर्यंत पायी प्रवास केला. अपघातानंतर कुडचडे व त्यानंतर फोंडा पोलिसांनी अपघात स्थळावर धाव घेतली. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला केल्यानंतर मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली.

दरम्यान, पणसुले-धारबांदोडा येथील धोकादायक जंक्शनवर गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कंटेनर रस्त्यावर कोसळला. या अपघातातून कंटेनरचालक सुखरुप बचावला.