नोकरी घोटाळा : आमदाराविरुद्ध तक्रार

0
10

>> नोकरीच्या मोबदल्यात रकमेची मागणी करणारा आमदार गणेश गावकरांच्या आवाजातील कथित ऑडिओ व्हायरल

सावर्ड्याचे आमदार आमदार गणेश गावकर आणि सरकारी नोकरीसाठी इच्छुक तरुण यांच्यात सरकारी नोकरीच्या बदल्यात रकमेबद्दल फोनवरून झालेल्या चर्चेचा कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी सुदीप ताम्हणकर यांनी बुधवारी सकाळी आमदार गणेश गावकर यांच्याविरोधात कुळे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलेी. राज्यात सध्या सरकारी नोकरी प्रकरण गाजत असताना अचानक मंगळवारपासून आमदार गणेश गावकर यांच्या आवाजातील एक कथित ऑडिओ चर्चेत आला. सदर ऑडिओ 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतरचा असल्याचे बोलले जात आहे.

व्हायरल व्हिडिओतील आवाज हा सावर्डे मतदारसंघांचे आमदार गणेश गावकर यांचा असल्याचा दावा केला जात असून, ते आपल्या कार्यकर्त्याकडे सरकारी नोकरीसाठी रक्कम मागत असल्याचे ऑडिओतून समोर येत आहे. फोनवरील संभाषणातून असे समोर येत आहे की, गणेश गावकर यांना सरकारी नोकरीच्या मोबदल्यात 1 लाख रुपये पोहचले असून, ते उर्वरित 6 लाख रुपये देण्याची मागणी संबंधित तरुणाकडे करत आहेत. याशिवाय सरकारी नोकरी मिळवून नंतर आपल्याविरुद्ध निवडणुकीवेळी प्रचार केल्याने त्या तरुणाला नोकरी अन्य कोणाला देण्याची धमकी दिली जात असल्याचे समोर आले आहे. सुदीप ताम्हणकर यांनी कुळे पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीची प्रत फोंडा उपअधीक्षक, मुख्यमंत्री व अन्य सबंधितांना देण्यात आली आहे.

सरकारी नोकरी घोटाळा राज्यात चांगलाच गाजत आहे. मुख्यमंत्र्यांनी लोकांना यासंबधी तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता आमदार गणेश गावकर यांच्याविरुद्धच्या तक्रारीची दखल घ्यावी. रक्कम देणाऱ्या व घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी सुदीप ताम्हणकर यांनी केली आहे.

पूजा नाईकची न्यायालयीन कोठडीत रवानगी
दरम्यान, केरी-फोंडा यथील श्रीधर सतरकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या पूजा नाईक यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश बुधवारी न्यायालयाने दिला. म्हार्दोळ पोलिसांनी पूजा नाईक यांना यापूर्वी सरकारी नोकरी देण्यासाठी फसवणूक प्रकरणात अटक केली होती.

नोकरी घोटाळ्यात आता आई-मुलाला अटक

>> पोलीस शिपायाच्या नोकरीच्या आमिषाने चिंबलमधील महिलेची 6 लाखांची फसवणूक

सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीच्या आरोपाखाली वास्को पोलिसांनी आई-मुलाला काल अटक केली. उमा पाटील आणि तिचा मुलगा शिवम पाटील (रा. बायणा-वास्को) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. चिंबल-रायबंदर येथील महिलेकडून 6 लाख रुपये उकळल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. वास्कोतील हे दुसरे प्रकरण असून, अजून अनेक प्रकरणे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वास्को पोलीस दलात शिपाई पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून उमा पाटील आणि शिवम पाटील याने एका महिलेची 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी चिंचवाडा-चिंबल, रायबंदर येथील चिंबल येथे राहणाऱ्या रश्मी चोपडेकर (46) या महिलेने दोन दिवसांपूर्वी वास्को पोलीस स्थानकावर दिली होती. त्यानुसार वास्को पोलिसांनी बुधवारी उमा पाटील आणि तिचा मुलगा शिवम पाटील (रा. झुआरी कॉम्प्लेक्स, बायणा) यांना या प्रकरणी अटक केली.

रश्मी चोपडेकर यांच्या मुलाला गोवा पोलीस दलात नोकरी देण्याचे आमिष उमा पाटील आणि शिवम पाटील याने दाखवले होते, असे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले.

सूरज नाईकची जामिनावर सुटका
शिक्षण खात्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नवेवाडे-वास्को येथील एका महिलेची 4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेला दुसरा संशयित सूरज नाईक याची मंगळवारी जामिनावर सुटका झाली. शिक्षण खात्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याच्या प्रकरणात यापूर्वी संशयित गोविंद मांजरेकर यालाही पोलिसांनी अटक केली होती. तोही जामिनावर सुटला आहे. सूरजला न्यायालयाने काही अटी घालून त्याची जामिनावर सुटका केली आहे.

वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करीत आहेत.