नॉर्थईस्ट युनायटेड-मुंबई सिटी लढत बरोबरीत

0
144

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) बुधवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यातील रंगतदार लढतीत २-२ अशी बरोबरी झाली. इंदिरा गांधी ऍथलेटीक स्टेडियमवरील लढतीत सर्व गोल पूर्वार्धात झाले.
नॉर्थइस्टने नवव्याच मिनिटाला आघाडी घेतली होती. ग्रीसच्या २७ वर्षांच्या पॅनागिओटीस ट्रीयाडीसने हा गोल केला होता. ट्युनिशीच्या ३१ वर्षीय अमीने चेर्मिटी याने नऊ मिनिटांत दोन गोल करीत मुंबईला आघाडी मिळवून दिली. घानाच्या असामोह ग्यान याने नॉर्थइस्टला बरोबरी साधून दिली. उत्तरार्धातही चुरशीने खेळ झाला, पण दोन्ही संघ निर्णायक गोल करू शकले नाहीत.

नॉर्थइस्टची पाच सामन्यांतील ही तिसरी बरोबरी आहे. त्यांची अपराजित मालिका कायम राहिली. त्यांनी दोन सामने जिंकले आहेत. नऊ गुणांसह एक क्रमांग प्रगती करीत त्यांनी चौथे स्थान गाठले. एफसी गोव्याला त्यांनी मागे टाकले. गोव्याचे ८ गुण आहेत. मुंबईने पाच सामन्यांतून एक विजय, दोन बरोबरी व दोन पराभव अशा कामगिरीसह ५ गुण मिळविले आहेत. त्यांनी केरला ब्लास्टर्स एफसीला (४ गुण) मागे टाकत सातवे स्थान गाठले. आघाडीवरील एटीके व जमशेदपूरचे प्रत्येकी १० गुण आहेत.

नवव्या मिनिटाला नॉर्थइस्टने खाते उघडले. डावीकडून थ्रो-इनवर राकेश प्रधानने टाकलेला चेंडू प्रत्यक्षात मुंबईचा बचावपटू सौविक चक्रवर्ती याच्यापाशी गेला, पण सौविकला चेंडूवर नीट ताबा मिळविता आला नाही. मग आपल्याकडे चेंडू येताच ट्रीयाडीसने नियंक्षण मिळवित अप्रतिम फटका मारत मुंबईचा गोलरक्षक अमरींदर सिंगला चकविले.

मुंबईने नऊ मिनिटांच्या अंतरात दोन गोल करीत आघाडी घेत जोरदार प्रत्यूत्तर दिले. २३व्या मिनिटाला महंमद लार्बीने चाल रचली. उजव्या बाजूला त्याचा पास येताच मोडोऊ सौगौने चेर्मिटीला क्रॉस पास दिला. मग अमीने याने सहा यार्डवरून चेंडूला नेटची दिशा दिली.

नऊ मिनिटांनी उजव्या बाजूला ४० यार्डावर मुंबईस फ्री किक मिळाली. ती घेत पाऊलो मॅचादोने मारलेला चेंडू नॉर्थइस्टचा बचावपटू निम दोर्जी याच्याकडे गेला. निमने किक मारण्यासाठी पाय उचलला, पण तो चकला. त्यामुळे चेंडू आपल्यापाशी येताच अमीने याने सहा यार्ड बॉक्समध्ये मुसंडी मारली आणि चेंडू अवघड उंचीवर असूनही शारिरीक संतुलन साधत सीझर्स किकच्या जोरावर लक्ष्य साधत अफलातून गोल केला.
पूर्वार्ध संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना मुंबईच्या मॅचादोने आपल्याच क्षेत्रात चेंडूवरील ताबा गमावला. याचा फायदा घेत मार्टिन चॅव्हेजने चाल रचत ग्यानला पास दिला. ग्यानने मग घोडदौड करीत नेटच्या दिशेने ताकदवान फटका मारला. हा चेंडू अमरींदरच्या हाताला लागूनही नेटमध्ये गेला. त्यावेळी स्थानिक प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

निकाल :
नॉर्थइस्ट युनायटेड एफसी : २ (पॅनागिओटीस ट्रीयाडीस ९, असामोह ग्यान ४२)
बरोबरी विरुद्ध मुंबई सिटी एफसी : २ (अमीने चेर्मिटी २३, ३२)