नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे काँग्रेसमध्ये नैराश्य

0
20

>> अनेक महिन्यांपासून गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे काम ठप्प; अन्‌‍ होतकरू नेत्यांचे निलंबन

लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच गोव्यातील एक प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे काम पूर्णपणे ठप्प झालेले असून, त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आजी-माजी नेत्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आणि नैराश्य देखील पसरले आहे. गेल्या सप्टेंबर महिन्याच्या मध्याला पक्षातील 8 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपशी हातमिळवणी केली होती. पक्षातून फुटलेल्या आमदारांमध्ये दिगंबर कामत, मायकल लोबो, आलेक्स सिक्वेरा, डिलायला लोबो, केदार नाईक, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई यांचा समावेश होता. युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्टा व कार्लुस फेरेरा हे तीनच आमदार पक्षाशी प्रामाणिक राहिले होते. त्यामुळे गोवा विधानसभेत पक्षाचा आवाज क्षीण बनलेला आहे.

या घडामोडीनंतर आता मागच्या बऱ्याच महिन्यांपासून गोवा प्रदेश काँग्रेसचे कामही ठप्प झालेले असून, गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर हे निष्क्रिय बनल्याने गोवा प्रदेश काँग्रेस समितीची स्थिती दयनीय बनली असल्याचे ह्या समितीतील काही पदाधिकाऱ्यांनी आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. प्रदेश काँग्रेस समितीचे काम ठप्प झाल्याने ज्वलंत विषयावर आवाज उठवण्याकडे राज्यातील एक प्रमुख विरोधी पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेसला अपयश येऊ लागले आहे. समितीचे कामच होत नसल्याने राज्यात पक्षातर्फे काढण्यात येणारे मोर्चे, आंदोलने पूर्णपणे बंद पडलेली आहेत. तसेच अमित पाटकर हे पत्रकार परिषदा घेऊन आता कोणत्याही ज्वलंत विषयावर आवाजही उठवत नसल्याचे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

पक्षातर्फे राज्यभरात होणाऱ्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध व जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणारे नेते जनार्दन भंडारी यांच्यासह प्रदीप नाईक, महेश म्हांबरे, खेमलो सावंत, ग्लेन काब्राल, हिमांशू तिवरेकर आदी तरुण रक्ताच्या नेत्यांवर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून निलंबित केल्यानंतर काणकोणपासून पेडणे आणि मुरगावपासून कुळेपर्यंत होणारी सगळी आंदोलने ठप्प झाली आहेत, असे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यामुळे आता गोव्यातील जनतेचे प्रश्न घेऊन लढण्यासाठी राज्यात कुणीच नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याचे या नेत्याने स्पष्ट केले. विशेष करून जनार्दन भंडारी यांची उणीव पक्षाला जाणवत असल्याचे या नेत्याने नमूद केले.

सध्या विविध मतदारसंघांत पक्षाच्या बूथ समितीच्या बैठका होत आहेत; मात्र ह्या बैठकांना संबंधित मतदारसंघातील हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच चार ते पाच कार्यकर्ते हजर राहत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याचे एका तरुण कार्यकर्त्याने सांगितले.
पक्षात काय चालले आहे, याची कल्पना पक्षश्रेष्ठींना आहे आणि ते योग्य वेळी काय तो निर्णय घेतील, असे आणखी एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

विधानसभेबाहेरही पक्षाची ताकद क्षीण
काँग्रेसमधून 8 आमदार फुटून भाजपमध्ये गेल्यानंतर पक्षाची विधानसभेतील ताकद क्षीण झाल्यानंतर जनार्दन भंडारी, महेश म्हांबरे, प्रदीप नाईक, खेमलो सावंत, ग्लेन काब्राल अशा तरुण नेत्यांनी पक्षाची कमान आपल्या हाती घेऊन राज्यभरात म्हादईसह, भ्रष्टाचार व अन्य मुद्द्यांवर आवाज उठवत आंदोलनाचे एक सत्रच सुरू केले होते. मात्र, त्याच नेत्यांना पक्षातून निलंबित केल्यामुळे विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही पक्षाची ताकद क्षीण झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाच्या एका तरुण कार्यकर्त्याने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली.