नूतनीकृत कला अकादमीचे शुक्रवारी उद्घाटन

0
11

>> कला-संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांची माहिती; आगामी इफ्फीच्या पार्श्वभूमीवर खुली करण्याचा निर्णय

गोवा कला अकादमीची नूतनीकरण केलेली इमारत साधारण दोन ते अडीच वर्षांनंतर नागरिकांसाठी पुन्हा खुली होणार आहे. शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या कला अकादमीचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती कला-संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी पाटो-पणजी येथील संस्कृती भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली. दरम्यान, गत पावसाळ्यात कला अकादमीच्या ज्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळले होते, तो खुला केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

गोवा कला अकादमीची इमारत नूतनीकरणासाठी वर्ष 2021 पासून नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. राज्यात होणाऱ्या आगामी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पार्श्वभूमीवर येत्या 10 नोव्हेंबरपासून कला अकादमी खुली करण्यात येणार आहे. इफ्फीच्या चित्रपटाच्या सादरीकरणाच्या काळात कला अकादमीच्या मुख्य सभागृहात कोणतीही तांत्रिक अडचण होऊ नये म्हणून आवश्यक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. कला अकादमीच्या मुख्य सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच कृष्णकक्ष विविध साधनसुविधांच्या साहाय्याने आकर्षक बनविण्यात आला आहे. कला दालन, बैठक कक्ष, परीक्षक कक्ष व अन्य सर्व विभाग सुरू केले जाणार आहेत, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.
कला अकादमीचा खुला रंगमंच तूर्त बंद ठेवला जाणार आहे. नूतनीकरणाच्या कामामध्ये खुल्या रंगमंचाचा समावेश नव्हता. तथापि, पावसाळ्यात जुलै महिन्यात खुल्या रंगमंचाचे छत कोसळले. त्याच्या दुरुस्तीच्या कामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.
अकादमीच्या मुख्य सभागृहातील ध्वनिक्षेपक यंत्रणा व अन्य यंत्रणेची चाचणी घेतली जाणार आहे. इफ्फी सुरू होण्यापूर्वी कला अकादमी आयोजकांकडे सुपूर्द केली जाईल, असेही गावडे यांनी सांगितले.

कला अकादमीच्या थिएटर आर्ट्स महाविद्यालयाचे वर्ग फोंडा येथील राजीव कला मंदिरात घेतले जाणार आहेत. सदर महाविद्यालय पणजीत हलविण्यात येणार नाही. या महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध करण्यावर विचारविनिमय केला जात आहे, असेही गावडे यांनी सांगितले. यावेळी कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, कला अकादमीचे सदस्य सचिव विनेश आर्लेकर यांची उपस्थिती होती.

50 कोटींच्या खर्चामुळे
नूतनीकरण चर्चेत

कला अकादमीच्या इमारतीचे अंदाजे 50 कोटी रुपये खर्चून नूतनीकरणाचा विषय बराच गाजला होता. इमारतीच्या नूतनीकरण कामासाठी निविदा जाहीर न करता कंत्राटदाराची निवड करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस, गोवा फॉरवर्डने केला होता. विरोधी पक्षांनी नूतनीकरणाच्या कामामध्ये गैरव्यवहाराचा आरोप करून कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना लक्ष्य केले होते. तसेच, चार्ल्स कुरैया फाऊंडेशनने सुध्दा कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाबाबत आवाज उठविला होता.

विधानसभेतही गाजला होता मुद्दा
गोवा विधानसभेत सुध्दा कला अकादमीच्या नूतनीकरणाचा प्रश्न बराच गाजला होता. गतवर्षी इफ्फीसाठी कला अकादमी खुली करण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र नूतनीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने खुली करण्यात आली नव्हती. जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनाच्या बरोब्बर एक दिवस अगोदर कला अकादमीच्या खुल्या रंगमंचावरील छत कोसळले होते, त्यावरून विरोधकांनी गैरव्यवहाराचा आरोप करत विधानसभेत मोठा आवाज उठविला होता.

सरकारने फेटाळले होते विरोधकांचे आरोप
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही, असे स्पष्ट केले होते. तसेच मंत्री गोविंद गावडे यांनी सुद्धा विरोधकांचे आरोप फेटाळून लावून कला अकादमीच्या नूतनीकरण कामाचे समर्थन केले होते.

द्घाटनानिमित्त ‘इथे ओशाळला मृत्यू’
कला अकादमीच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त संध्याकाळी 7 वाजता नागेशी-फोंडा येथील सिद्धीनंदन थिएटर या संस्थेतर्फे ‘इथे ओशाळला मृत्यू’ या ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. त्यात कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे हे भूमिका साकारणार आहेत.