निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची आज सांगता

0
22

>> १८६ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान

>> ५०३८ उमेदवार निवडणूक रिंगणात

>> यंत्रणा सज्ज

राज्यातील १८६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता सोमवार ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. बुधवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ यावेळेत मतदान घेतले जाणार आहे.
राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ५०३८ उमेदवार रिंगणात आहेत.

ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत ६४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे १४६४ प्रभागांत ही निवडणूक घेतली जाणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गेले अकरा दिवस जोरदार प्रचार सुरू आहे.

उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे. ग्रामपंचायत निवडणूक राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलेली आहे. विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी आपापले समर्थक निवडून येण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

घरोघरी प्रचार
पंचायत निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या बहुतेक सर्वच उमेदवारांनी घरोघरी प्रचारावर भर दिलेला आहे. उमेदवार गेले अनेक दिवस प्रत्येक मतासाठी प्रचार करत आहेत. काल रविवारी बहुतेक उमेदवारांनी लोकांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला. त्यामुळे कालचा रविवार हा प्रचारासाठीचा प्रमुख दिवस ठरला. काही ठिकाणी कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना बरोबर घेऊन गटागटाने उमेदवार प्रचार करताना रविवारी दिसून आले. आज सोमवार हा जाहीर प्रचारासाठी शेवटचा दिवस असल्यामुळे काल रविवारी बहुतेक उमेदवारांनी घरोघरी प्रचारावर मोठा भर दिलेला दिसून आला.

काही उमेदवारांनी प्रचार करताना मतदारांना विकासाची स्वप्ने दाखवली आहेत. आता उर्वरित दोन दिवसांत राज्यभर वातावरण ढवळून निघणार आहे. अनेक माजी सरपंच, पंच नेतेमंडळी रिंगणात आहेत त्यांचाही या निवडणुकीत कस लागणार असून त्यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेली आहे.

यंत्रणा सज्ज
राज्यातील सरकारी यंत्रणा ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी सज्ज झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या जनजागृतीसाठी समाज माध्यमाचा वापर केला जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रथमच लोगो तयार करून घेतलेला आहे.

तालुकानिहाय मतदार
राज्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदार संख्या तालुकानिहाय – बार्देश तालुका एकूण मतदार – १,५६,३०३ ( पुरुष – ७५,८०३, महिला – ८०,५००), तिसवाडी तालुका- एकूण – ८१,७८४ (पुरुष ३८८९७, महिला ४२८८६, तृतीयपंथी १), डिचोली तालुका – एकूण – ५१,२६२ ( पुरुष – २५,२३५, महिला २६,०२७), सत्तरी तालुका एकूण – ४०,६२३ (पुरुष २०,१६६ , महिला २०,४५७), पेडणे तालुका – एकूण – ५५,८९५ (पुरुष – २७,६९०, महिला २८,२०५ ) , फोंडा तालुका – एकूण – १,१६, ३१० (पुरुष – ५७,१२९, महिला ५९,१८१), धारबांदोडा तालुका – एकूण – २०,०९५ ( पुरुष ९,७०८, महिला १०,३८७), सांगे तालुका एकूण – २४,६४९ (पुरुष ११,७७९, महिला १२,८७०), सासष्टी – १,४६, ६५० (पुरुष ६९,६३९, महिला ७७,०११), केपे तालुका – एकूण ३४,८२२ (पुरुष १७,०१९, महिला – १७,८०३) , काणकोण तालुका – २७,२४४ ( पुरुष १३,३८४, महिला १३,८६०), मुरगाव तालुका – ४१,३८३ (पुरुष २०,५५२, महिला २०,८३१).