निळ्या डोळ्यांचे खलनायक

0
23
  • धनंजय जोग

पॉलिसीत बायको, मुले किंवा जवळचे नातेवाईकच नामांकित असतात. मी ज्या व्यक्तीचा नातेवाईक नाही त्याचा विमा उतरवणे आणि स्वतःला नामांकित करणे बरोबर आहे का? नीतितत्त्वात किंवा कायद्यात हे बसते का?

‘निळ्या डोळ्यांचे खलनायक’ हे आजचे शीर्षक अमेरिकेतील याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या गाजलेल्या केसवरून घेतले आहे. गेल्या शतकातील ही शोकांतिका-
कॉकेशियन वंशाच्या काही लोकांचे डोळे निळे असतात. अशा सहा जणांनी एका म्हाताऱ्या गृहस्थाची जीवन विमा पॉलिसी उतरवली. स्वतःचे नामांकन केले- त्याच्याशी नाते नसताना ‘नॉमिनी’ बनले. हेतू हा की गृहस्थ मरताच पॉलिसीचे पैसे मिळावे. म्हाताऱ्याचा मृत्यू अपेक्षेएवढ्या लवकर होईना! मग त्याचा खून करून अपघात भासवण्याचा प्रयत्न केला. न्यायात कधीकधी उशीर होतो, पण शेवटी न्याय मिळतोच- सहाहीजण फासावर चढले.

2015 सालची गोव्यातील दैनिकांत अशीच दु:खदायक बातमी : (कात्रण जपून ठेवले आहे). कारवारस्थित रमेश (सगळी नावे बदलली) ‘एचआयव्ही’ बाधित होता. तीन लोकांनी थोड्याच दिवसांत रमेशचा मृत्यू होईल या अपेक्षेने वेगवेगळ्या विमा कंपन्यांत त्याचा रु. 50/- लाखांचा विमा उतरवला. पण अमेरिकेतल्या केससारखाच रमेश लवकर मरेना! विम्याचे हप्ते भरणे त्रिकुटाला कठीण जाऊ लागले. रमेशची हत्या करून अपघात झाल्याचे भासवण्याचा तसाच प्रयत्न झाला. अर्थात कारस्थान उघडकीस आले. शंका येते की या तिघांनी अमेरिकेतील केस तर वाचलेली नाही ना?
या घटनांतून एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो. विम्याविषयी आपल्याला माहिती आहेच. व्यक्तीचा किंवा मिळकत/वस्तू इत्यादीचा विमा रोजच्या आयुष्यात आपण उतरवतो. जीवन विम्याचे सर्वसाधारण उदाहरण म्हणजे घरच्या कमावत्या माणसाचा विमा. त्याचा मृत्यू झाला तर ‘नॉमिनी’- नामांकित असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये हा हेतू. हाच सिद्धांत अपघात विम्यालासुद्धा लागू पडतो. कमावता माणूस कायमचा जायबंदी झाला तर तशीच वेळ येऊ शकते. अर्थात अशा पॉलिसीत बायको, मुले किंवा जवळचे नातेवाईकच नामांकित असतात- त्यानांच पैसे मिळावेत.

महत्त्वाचा प्रश्न असा : मी ज्या व्यक्तीचा नातेवाईक नाही त्याचा विमा उतरवणे आणि स्वतःला नामांकित करणे बरोबर आहे का? नीतितत्त्वात किंवा कायद्यात हे बसते का?
सुरुवातीच्या अमेरिका आणि कारवारच्या घटनांमधून या प्रश्नाचे गांभीर्य कळते. एक काल्पनिक उदाहरण बघू : एका कंपनी मालकाने दोनशे कामगारांना बडतर्फ केले आहे. कामगार वस्तीत चीड आणि तणावाचे वातावरण आहे. मालकाच्या जीवाला साहजिकच धोका आहे. मालकाचा मी ना नातेवाईक, ना संबंधित. मी मालकाचा जीवन विमा उतरवून स्वतःला नामांकित करावे का/करू शकतो का?
सुदैवाने आपण आज जी केस बघणार आहोत त्यात असा काही घातपाताचा हेतू नव्हता, तरी पण हाच प्रश्न समोर येतो : प्रवीण वीज खात्याची छोटी कंत्राटे घ्यायचा. त्याच्या कामगारांपैकी संजयचे काम रस्त्यालगतच्या खांबांवर चढून वीज तारा जोडणे, दुरुस्ती करणे असे होते. कंत्राटदार प्रवीणने अशी जोखमीची कामे करणाऱ्या आपल्या कामगारांचा- संजयसहित- ‘पर्सनल ॲक्सिडंट’ अर्थात ‘वैयक्तिक अपघात विमा’ उतरविला. विमा पॉलिसीमध्ये प्रवीणने स्वतःचे नाव प्रोपोजर/प्रस्तावक आणि नॉमिनी अशा दोन्ही ठिकाणी घातले. एक वर्षाचा कालावधी असलेल्या रु. 1 लाख विम्याचा वार्षिक रु. 213 हप्ता प्रवीणनेच भरला.
एके दिवशी कामगार संजय खांबावरून पडून जखमी झाला. सरकारी दवाखान्यात दाखल केले गेले, पण तिकडे त्याचे मरण ओढवले. प्रवीणने विमा कंपनीला जरूर ती कागदपत्रे देऊन रु. 1 लाख मागितले. कंपनीने नकार दिल्याने तक्रार ग्राहक आयोगासमोर आली. दोन्ही बाजूंनी आपापले म्हणणे आणि पुरावे सादर केले गेले. वकिलांनी युक्तिवाद ऐकविले.

विमा कंपनीचा बचाव असा की मृत्यू झाल्याने विम्याचे रु. 1 लाख देण्यास आम्ही बांधील आहोत. पण या रकमेवर खरा व कायदेशीर हक्क संजयचे कुटुंब/वारस यांचा आहे. त्यांनी जर प्रवीणच्या बाजूने ‘ना हरकत दाखला’ (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) दिले तरच त्याला पैसे देऊ. हे आमचे म्हणणे विम्याच्या मूलभूत सिद्धांताशी धरून आहे- मेलेल्या व्यक्तीच्या विम्याची रक्कम फक्त कुटुंब किंवा वारस यांनाच दिली जावी.
आम्ही पाहिले की तक्रारदार प्रवीण याने पॉलिसीमध्ये स्वतःलाच प्रस्तावक आणि नॉमिनी असे नेमून घेतले आहे. मयत संजयने प्रवीणला नामांकित केल्याचा पुरावा नाही. अशा पॉलिसींमध्ये मालकाला नामांकित करण्याचा उद्देश हा की, जर अपघात घडला आणि मेलेल्या कामगाराचे कुटुंबीय मालकाकडे आले तर विमा कंपनी कुटुंबीयांना भरपाई देऊ शकते. प्रवीणसारख्या छोट्या कंत्राटदाराला भरपाई स्वतःच्या खिशातून देणे परवडणार नाही. प्रवीणने जर कुटुंबाला भरपाई दिल्याचा पुरावा सादर केला तर विम्याची रक्कम त्याला मिळेल.
विमा कंपनीचा बचाव ऐकल्यावर प्रवीणने दोन व्यक्तींच्या सहीचे स्टॅम्पपेपरवरचे प्रतिज्ञापत्र व करार सादर केले. ओरिसा राज्यातील महिला व तिचा नवरा अशा या व्यक्ती. त्यातील महिला आपण दिवंगत संजयची बहीण असल्याचे म्हणते. प्रतिज्ञापत्रात ती लिहिते की, प्रवीणकडे आमची काहीही मागणी नाही. करारात असे म्हटले आहे की त्यांना प्रवीण याच्याकडून रु. 70 हजाराचा ड्राफ्ट आणि रु. 55 हजार रोख मिळाले आहेत.

उत्तरादाखल कंपनी म्हणाली की, करार व प्रतिज्ञापत्रावर सदर महिलेची सही नसून नुसता अंगठा आहे. अर्थात ती अशिक्षित आहे. कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याचा ही महिला खरोखरच संजयची बहीण असल्याचा दाखला समोर नाही. तिचा फोटोसुद्धा सादर केलेला नाही. कशावरून समजावे की ही संजयची बहीण आहे?
कंपनीचा संजयच्या कुटुंबाकडून ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ आणण्याचा आग्रह सयुक्तिक आहे का? अनेक उच्च कोर्टांच्या निवाड्यांत म्हटले आहे की जर वारस कोण आहे याविषयी वाद नसला तर विमा कंपनीने वारसा सर्टिफिकेटचा आग्रह धरू नये. याचाच अर्थ असा की जर असा वाद असला (आणि या प्रकरणात तो जरूर आहे!) तर विमा कंपनीची मागणी रास्त आहे. दिवंगत संजयचे वारस/कुटुंबीय कोण याचा कोणताही पुरावा आपल्यासमोर नाही. क्षणभर जरी मानले की करार/प्रतिज्ञापत्रातील महिला खरोखरच संजयची बहीण आहे, तरी तिच्याव्यतिरिक्त इतर कोणी भाऊ/बहिणी आहेत का? आई/वडील आहेत का? संजयचे लग्न झाले होते का? मुले आहेत का? असले तर यांपैकी एक किंवा अनेक खरे वारसदार असतील. याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही.
कमावत्या व्यक्तीचा जीव गेल्यास जी कठीण परिस्थिती उद्भवते ती शिथिल करण्याची ‘जीवन विमा’ ही एक जगमान्य व्यवस्था आहे. अशी व्यक्ती जर गेली तर या विम्यामुळे कुटुंबीयांची आर्थिक अडचण कमी होते. जीवनात अनपेक्षितता असतेच. विम्याने अशा अनपेक्षिततेवर कुटुंबीयांना थोडातरी आधार मिळतो.
आजच्या प्रकरणात प्रवीण व संजय हे नातेवाईक नक्कीच नव्हते. मग विमा उतरविण्यायोग्य हितसंबंध अर्थात इंश्योरेबल इंटरेस्टचा प्रश्न उद्भवतो. या सिद्धांतानुसार नॉमिनी (विम्याचे पैसे मिळणारी व्यक्ती) तीच असावी जिला विमाधारकाच्या मृत्यूने थेट आर्थिक व/किंवा भावनिक नुकसान होईल. जर असे नुकसान होत नसेल तर नामांकिताने विमा का उतरवावा? फायद्यासाठी? आणि फायद्यासाठी जर स्वतःच अपघात घडवून आणला तर?? वर पाहिलेल्या अमेरिका व कारवारातील घटनांमध्ये हेच झाले होते.
आणि म्हणूनच जीवन/अपघात विम्याचा सिद्धांत असा की संबंधित व्यक्तींनाच नामांकित केले जावे. विमा हा जुगार किंवा घोड्याच्या शर्यतीसारखा नाही. युरोपमध्ये 17/18 व्या शतकात राजाचा जीवन विमा कोणीही नागरिक उतरवू शकायचा- फक्त जुगार! महाराजांना काही झाले (उदा. फ्रेंच राज्यक्रांतीत संपूर्ण राजघराण्याची डोकी गिलोटीनखाली गेली) तर रक्कमेवर हक्क सांगायला नागरिक मोकळा. म्हणून त्या काळात तिकडे जीवन विम्यावरच बंदी घातली गेली.

‘इंश्योरेबल इंटरेस्ट’च्या सिद्धांतानुसार अमेरिकेतील सहा खुन्यांना जर विमा पॉलिसी उतरवताच आली नसती तर म्हातारा आणखी जगून नैसर्गिकरीत्या मरण पावला असता. हेच कारवारच्या रमेशलासुद्धा लागू होते. यामुळे हा सिद्धांत महत्त्वाचा आहे. साहजिकच अशा पॉलिसीमध्ये जवळचे नातेवाईक हेच नामांकित असावेत.
काही अपवाद जरूर आहेत- एखादी कंपनी आपल्या हुशार सीइओवर अवलंबून आहे. त्याच्यामुळेच कंपनीला फायदा होतो. प्रसंगी त्याच्या एकट्यामुळेच कंपनी चालते. दुसरे उदाहरण- एका चित्रपटनिर्मात्याने ‘सुपरस्टार’ अभिनेत्याला करारबद्ध केले आहे. या अभिनेत्याच्या नावावरच चित्रपट चालणार. कराराच्या काळात जर अभिनेत्यास काही झाले व चित्रपट अपूर्ण राहिला तर केलेला कोट्यवधीचा खर्च वाया जाणार. म्हणून कंपनीने ‘सीइओ’चा आणि निर्मात्याने अभिनेत्याचा- जरी स्वतःशी नाते नसले तरी- जीवन/अपघात विमा काढणे सयुक्तिक ठरते. याला ‘की परसन इन्श्युरन्स’ म्हणतात.
आजच्या प्रकरणात हे स्पष्ट आहे की प्रवीणची कंपनी संजयवर अशा तऱ्हेने अवलंबून नव्हती. संजय करायचा ते काम प्रवीणचे इतर काही कामगार करू शकत होते. संजयच्या निधनाने प्रवीणचे आर्थिक किंवा भावनिक नुकसान झाले असे नक्कीच म्हणता येणार नाही. नातेवाईक किंवा ‘की परसन’ या दोन्ही श्रेणीत प्रवीण हा संजयचा ‘नॉमिनी’ असू शकत नव्हता.

अमेरिकेत दुसऱ्या एका अशाच गाजलेल्या प्रकरणात (मिलिकेन वि. हॅनर) तेथील सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की, विमाधारकाशी भावनिक (नातेवाईक) किंवा आर्थिक (की परसन) संबंध नसणाऱ्या माणसाने स्वतःचे नामांकन करणे हे सार्वजनिक हिताविरुद्ध आहे.
विमा कंपनीचे कर्तव्य होते की असा संबंध आहे का आणि संजयची प्रवीणला नामांकित करायची संमती आहे का हे तपासणे. कंपनीने हे केले नाही. मुळात संजयला आपल्या नावावर अशी पॉलिसी काढली गेल्याचे तरी माहीत होते का? प्रश्न अनुत्तरित राहतो.
आम्ही फिर्याद फेटाळली. संजयच्या मृत्यूमुळे प्रवीणला रु. 1 लाख मिळण्याचा हक्क बिलकुल नाही. चुकीचे नामांकन असलेली ही पॉलिसीच आम्ही रद्दबातल ठरवली. कंपनीला आदेश दिला की प्रवीणने भरलेले हप्त्याचे रु. 213 परत द्यावे.
एखाद्या वाचकाला या प्रकरणाविषयी किंवा ग्राहक कायद्यासंबंधी प्रश्न असल्यास मी थोडक्यात उत्तर देऊ शकेन. त्यासाठी वरपक्षेसऽूरहेे.लेा या ई-मेलवर संपर्क साधावा.