नव्या झुआरी पुलावर नियमभंग; 144 जणांना 72 हजारांचा दंड

0
2

नव्या झुआरी पुलावरून राजधानी पणजीहून मडगावच्या दिशेने जाण्यास केवळ अवजड वाहनांनाच परवानगी आहे. असे असतानाही नियमभंग करून अन्य वाहनेही या पुलावरून मडगावच्या दिशेने जात असल्याचे दिसून आल्याने काल वाहतूक पोलिसांनी सदर वाहने अडवून चालकांना दंड ठोठावला. या कारवाईत काल चारचाकी वाहने, दुचाकी वाहने आदी मिळून 144 वाहनचालकांना चलन देऊन पोलिसांनी 72,500 रुपये एवढा दंड वसूल केला.

नियमभंग करीत या पुलावरून पणजीहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनात पोलीस खात्याच्या ‘एटीएस’ वाहनासह काही सरकारी वाहनांचाही समावेश होता. या वाहनांनाही कारवाईला सामोरे जावे लागले. काल सकाळपासून दुपारपर्यंत सुमारे 300 वाहनांना या कारवाईला सामोरे जावे लागले. 144 वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला, तर 150 हून अधिक वाहनमालकांच्या पत्त्यावर नोटीस पाठवण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. झुआरी नदीवरील नवा पूल पणजीहून मडगावला जाण्यासाठी फक्त अवजड वाहनांसाठी (12 टन वजनापेक्षा अधिक) खुल केलेला आहे. इतर वाहनांसाठी तो खुला करण्यात आलेला नाही; मात्र, मडगाव व वास्कोहून पणजीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी तो खुला आहे.