- विलास रामनाथ सतरकर
(मुख्याध्यापक)
डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालय, कुजिरा
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीमुळे गोव्यातील शिक्षणव्यवस्थेत मोठे सकारात्मक बदल घडत आहेत. नवीन शैक्षणिक आराखड्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत अधिक संधी मिळत असून, त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे. शिक्षक, पालक आणि समाजाच्या सक्रिय सहभागामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी गोवा राज्य सज्ज झाले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020) हे भारताच्या शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवणारे धोरण आहे. 34 वर्षांनंतर शिक्षणव्यवस्थेत मोठे बदल होणार आहेत. यातून शालेय आणि उच्च शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मूलभूत तत्त्वे (फंडामेंटल प्रिन्सिपल्स)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची मूलभूत भूमिका शिक्षण अधिक समावेशक, लवचीक आणि गुणवत्तापूर्ण करणे ही आहे. त्याची प्रमुख तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत :
- सर्वांसाठी समान आणि समावेशक शिक्षण ः शिक्षणाच्या समान संधी सर्वांसाठी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा फायदा व्हावा हा उद्देश आहे. ग्रामीण भाग, आदिवासी, महिला आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न करणे याद्वारे अपेक्षित आहे.
- गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ः फक्त परीक्षा आणि गुणांवर भर न देता विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा, तर्कशक्तीचा आणि निर्णयक्षमतेचा विकास करणे हे त्यातील एक उद्दिष्ट आहे.
- शिक्षक प्रशिक्षण आणि विकास ः शिक्षक हा शिक्षणव्यवस्थेचा केंद्रबिंदू मानला जातो, आणि त्यामुळे शिक्षकांच्या सततच्या प्रशिक्षणावर (कंटिन्यूअस प्रॉफेशनल डेव्हलोपमेंट- सीपीडी) भर दिला जात आहे.
- जीवनकौशल्ये आणि कौशल्याधारित शिक्षण ः विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता, त्यांना व्यावहारिक जीवनासाठी तयार करणे हा एक उद्देश आहे. त्यासाठी कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), संशोधन आणि उपक्रमशीलता, आर्थिक साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण यांवर भर देण्यात येणार आहे.
- तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ः डिजिटल शिक्षणासाठी ऑनलाइन साधने उपलब्ध केली जातील. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ई-लर्निंग प्लॅटफॉर्म विकसित करणे हाही एक उद्देश आहे.
- परीक्षा प्रणालीत बदल आणि मूल्यांकन सुधारणा ः विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभर केलेले कार्य महत्त्वाचे; केवळ अंतिम परीक्षेवर भर नाही. त्यामुळे सातत्यपूर्ण मूल्यांकन व क्षमता आधारित समग्र प्रगतिकार्डवर भर देण्यात येणार आहे. फक्त पाठांतरावर भर न देता सृजनशीलता आणि समजुतीच्या आधारे मूल्यमापन होईल. बोर्ड परीक्षा अधिक लवचीक होणार आहे.
शालेय शिक्षणातील प्रमुख बदल
नवीन 5+3+3+4 शैक्षणिक संरचना ः शालेय शिक्षण चार टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे. हे टप्पे पुढीलप्रमाणे- पायाभूत स्तर (फाऊंडेशन स्टेज 5 वर्षे- पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिली व दुसरी), पूर्वतयारी स्तर (प्रिपेरटरी स्टेज 3 वर्षे- इयत्ता तिसरी ते पाचवी), पूर्व माध्यमिक स्तर (मिडल स्टेज 3 वर्षे- इयत्ता सहावी ते आठवी) आणि माध्यमिक स्तर (सेकंडरी स्टेज 4 वर्षे- इयत्ता नववी ते बारावी)
संपूर्ण शिक्षणप्रक्रियेत आकलनाधारित शिक्षण (कम्पिटन्सी बेस्ड लर्निंग) राहणार आहे.
गोव्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी
गोव्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने शिक्षणपद्धतीत सकारात्मक बदल घडत चालेले आहेत. 2023-24 वर्षी फाऊंडेशन स्टेजच्या पहिल्या वर्गापासून, म्हणजे बालवाटिका 1 (नर्सरी) या वर्गापासून अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
गेल्या वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये बालवाटिका 2 (केजी- 1), माध्यमिक स्तराचा पहिला वर्ग (सेकंडरी स्टेज) म्हणजे इयत्ता नववी या वर्गात याची अंमलबजावणी सुरू झाली, तर या वर्षापासून बालवाटिका 3 (केजी- 2), सेकंडरी स्टेजचा दुसरा वर्ग म्हणजे इयत्ता दहावी व मिडल स्टेजचा पहिला वर्ग म्हणजे इयत्ता 6 वी यांच्या अंमलबजावणीला येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याची निर्मिती करण्यात आली आहे व त्याद्वारे अंमलबजावणीकरिता योग्य मार्गदर्शन करण्यात आले आहे. ‘एनसीएफ’चा (नॅशनल करिक्यूलम फ्रेमवर्क) उद्देश वर्गातील शिक्षणाच्या विविध पैलूंची पुनर्रचना करणे आणि शालेय शिक्षणाची पुनर्रचना करणे हा आहे. राष्ट्रीय अंमलबजावणी आराखड्याच्या धर्तीवर व मार्गदर्शनानुसार ‘राज्य अंमलबजावणी आराखडा’ तयार करण्यात आला आहे.
फाऊंडेशन स्टेजमध्ये पंचकोशात्मक विकासाचा समावेश
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 अंतर्गत पंचकोशात्मक विकास ही संकल्पना शिक्षणाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. भारतीय तत्त्वज्ञानात वर्णिलेल्या पंचकोश सिद्धांतावर आधारित शिक्षणप्रणालीचा स्वीकार करण्यात आला आहे. याचा उद्देश मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा आहे.
पंचकोशावर आधारित कृती आणि शैक्षणिक उद्दिष्टांचे मॅपिंग करण्यासाठीची पुस्तिका गोवा ‘एससीईआरटी’ने तयार केली आहे.
- अन्नमय कोश (फिजिकल डेव्हलोपमेंट)
शारीरिक विकासामध्ये खेळ, नृत्य, योगा आणि व्यायामाचा समावेश आहे. मूलभूत शारीरिक कौशल्ये विकसित करण्यासाठी खेळांवर आधारित शिक्षणावर भर आहे. संतुलित आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे मुलांमध्ये पौष्टिक आहाराचे महत्त्व आणि स्वच्छतेच्या सवयी रुजवणे हे उद्दिष्ट ठेवून काही उपक्रम या पुस्तिकेत दिलेले आहेत. लहान हालचाली (सूक्ष्म गती कौशल्य) आणि मोठ्या हालचाली (स्थूल गती कौशल्य) यांमधून विविध शारीरिक क्रियाकलापांद्वारे हात-डोळा समन्वय विकसित करणे हे उद्दिष्टही फाऊंडेशन स्टेजमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. - प्राणमय कोश (एनर्जी डेव्हलप्मेंट- जीवनशक्ती विकास)
- योग आणि श्वसन तंत्र (ब्रिथिंग एक्सरसाइज) : यामध्ये लहान मुलांसाठी साध्या श्वसनक्रियांचा समावेश आहे.
- संगीत, नृत्य आणि हालचाली (मूव्हमेंट रिदम) : मुलांच्या ऊर्जा व्यवस्थापनासाठी नृत्य आणि गाणी.
- निसर्गाशी जवळीक : मैदानी खेळ, झाडे लावणे, निसर्ग निरीक्षण यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
- मनोमय कोश (मेन्टल इमोशनल डेव्हलप्मेंट- मानसिक आणि भावनिक विकास)
- कथाकथन आणि संवाद कौशल्य : मुलांच्या विचारशक्तीला चालना देण्यासाठी गोष्टी सांगणे आणि संवाद यावर भर देण्यात आला आहे.
- भावनांची ओळख आणि व्यवस्थापन : शिक्षक आणि पालकांनी मुलांच्या भावनिक गरजांकडे लक्ष देऊन सकारात्मक वातावरण निर्माण करणे.
- विज्ञानमय कोश (इंटलॅक्च्युरल डेव्हलप्मेंट- बौद्धिक विकास)
- अनुभवाधारित शिक्षण (एक्सपिरिअन्शीअल लर्निंग) : प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देणे.
- नवीन कल्पनांचा विचार (क्रिटिकल थिंकिंग) : प्रश्न विचारण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे.
- मातृभाषा व बहुभाषिक शिक्षण : भाषा कौशल्यांचा विकास, विचार आणि सृजनशीलता वाढवणे यासाठी विविध भाषांचा समावेश.
- आनंदमय कोश (स्पिरिच्युअल मोरल डेव्हलप्मेंट- आध्यात्मिक आणि नैतिक विकास) ः
- नैतिक मूल्ये आणि संस्कार : सद्गुण, सहानुभूती, जबाबदारी, ईमानदारी यांचा समावेश.
- ध्यान आणि मन:शांती (माईंडफुलनेस) : शांत राहण्याच्या आणि एकाग्रता वाढवण्याच्या तंत्रांचा परिचय मुलांना या वयातच करून दिला जाणार आहे.
- सृजनात्मकता आणि आत्मअभिव्यक्ती : कला, हस्तकला, संगीत आणि मुक्त अभिव्यक्तीसाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध केले जाणार आहेत.
मिडल स्टेज
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 अंतर्गत मिडल स्टेज हा शिक्षणाचा तिसरा टप्पा मानला जातो, जो इयत्ता 6 वी ते 8 वीपर्यंत लागू आहे. या टप्प्याद्वारे विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक आणि अनुभवाधारित शिक्षणावर भर देण्यात येणार आहे.
मिडल स्टेजला तीन भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र यांबरोबरच कलाशिक्षण, कौशल्य शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि शारीरिक शिक्षण याचाही अंतर्भाव केला गेला आहे.
यासाठी लागणारी सर्व पुस्तके ‘एनसीआरटी’ नवी दिल्ली यांनी तयार केलेली आहेत. शिक्षणाला अधिक बौद्धिक, सृजनशील आणि कौशल्याधारित बनवण्यासाठी खालील 3 प्रमुख घटकांवर भर देण्यात आला आहे.
- कला शिक्षण (आर्ट एज्युकेशन)
- कला शिक्षण हे केवळ सृजनात्मक अभिव्यक्तीसाठी नसून, ते संपूर्ण शिक्षणप्रक्रियेस अधिक आनंददायी आणि प्रभावी बनवते.
- संगीत, चित्रकला, हस्तकला, नृत्य आणि नाटक यांचा अभ्यासक्रमात समावेश.
- संस्थात्मक आणि लोककलांचा समावेश.
- कला समाविष्ट शिक्षण : गणित, विज्ञान, समाजशास्त्र यांसारख्या विषयांना कला माध्यमातून शिकवणे.
- संवाद कौशल्ये आणि सृजनशीलतेला चालना : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा विकास होण्यासाठी खुल्या पद्धतीने शिकवणे.
- कला शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, समन्वय कौशल्य सुधारते आणि ते अधिक आनंदाने शिकू शकतात.
- व्यावसायिक शिक्षण (व्होकेशनल एज्युकेशन)
- एनईपी 2020 नुसार इयत्ता 6 वीपासून व्यावसायिक शिक्षणाची ओळख करून दिली जाते.
- इंटर्नशिप आणि प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण : स्थानिक उद्योग, कारागीर आणि लघुउद्योगांशी जोडणी.
- कृषी, संगणक प्रोग्रामिंग, इलेक्ट्रॉनिक्स, ग्रीन टेक्नॉलॉजी, कोडिंग आणि रोबोटिक्स, निमेशन, किचन गार्डन, बायोडिवर्सिटी रजिस्टर, कुकिंग विदाऊट फायर यांसारख्या कोणत्याही तीन प्रोजेक्टवर मुलांनी काम करणे अपेक्षित आहे.
- व्यावसायिक शिक्षणामुळे विद्यार्थी भविष्यात स्वावलंबी होतील, रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करतील आणि त्यांना शिक्षणासोबतच उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
- शारीरिक शिक्षण व मानसिक आरोग्य (फिजिकल एज्युकेशन ॲण्ड वेल बिईंग)
- मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षण अनिवार्य आहे. यात योग, खेळ, मैदानी उपक्रम यांचा समावेश करण्यात आला आहे.
- टिमवर्क, नेतृत्वगुण, शिस्त आणि सहकार्य विकसित करण्यासाठी गटाधारित खेळ यांचाही समावेश शारीरिक शिक्षणात करण्यात आला आहे. नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या शिक्षणावर भर देण्यात आला आहे.
- सांस्कृतिक खेळ (ट्रेडिशनल स्पोर्टस्) आणि आधुनिक खेळ (मॉडर्न स्पोर्टस्) यांचा समतोल राखण्यात आला आहे.
दहा बॅगलेस दिवस
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये दहा बॅगलेस दिवस ही संकल्पना आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता, त्यांना विविध अनुभवात्मक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
- शैक्षणिक वर्षभरात किमान 10 दिवस असे ठेवले जातील, ज्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत दप्तर आणावे लागणार नाही. त्या दिवशी त्यांना व्यावहारिक, सर्जनशील आणि कृती-आधारित शिक्षणाचा अनुभव दिला जाईल.
10 बॅगलेस दिवसांत कोणते उपक्रम राबवले जावेत यासंदर्भात मार्गदर्शन तत्त्वे ‘एनसीईआरटी’ने दिली आहेत. - विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. जसे की बागकाम, हस्तकला, स्वयंपाक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संगणक प्रोग्रॅमिंग इत्यादी.
- विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळे, विज्ञान केंद्र, सेंट्रल लायब्ररी, कारखाने, शेती प्रकल्प आदी ठिकाणी नेले जाईल.
- चित्रकला, नृत्य, संगीत, अभिनय यांच्या कार्यशाळा घेतल्या जातील.
- आपल्या शहरात किंवा गावात चालणाऱ्या समाजसेवेच्या प्रकल्पांत सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाईल.
माध्यमिक विभाग (सेकंडरी स्टेज)
गोवा राज्यात इयत्ता 9 साठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2024-25 या शैक्षणिक वर्षात लागू करण्यात आले आणि ते या वर्षी इयत्ता 10 मध्येही सुरू राहणार आहे. एनईपीच्या अंमलबजावणीअंतर्गत तीन भाषा, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या मुख्य विषयांसोबतच चार नवीन विषय- आंतरशाखीय अभ्यास, व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण आणि शारीरिक शिक्षण यांचा समावेश करण्यात आला.
गोवा सरकारने ‘एनईपी’च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शक्यतो जास्तीत जास्त शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण शिक्षक आणि कला शिक्षण शिक्षक उपलब्ध करून देण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केलेला आहे. कला आणि संस्कृती खात्याअंतर्गत नेमणूक केलेल्या संगीत, नृत्य व नाट्य शिक्षकांचा या अंमलबजावणीसाठी बराच उपयोग झाला आहे.
गोवा शालान्त मंडळाने परीक्षेच्या स्वरूपात विविध बदल केले असून त्यात इयत्ता नववीसाठी बोर्ड परीक्षेची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच, ‘एनईपी’च्या सुरळीत अंमलबजावणीसाठी विविध विषयांमध्ये काही सवलती देण्यात आल्या आहेत. ज्या शाळांमध्ये पोर्तुगीज, फ्रेंच किंवा तत्सम विदेशी भाषा शिकवली जायची त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व शाळांसाठी ते विषय चालू ठेवण्याची मुभा सरकारने दिली आहे.
तालुकानिहाय बैठका ः एक यशस्वी प्रयोग
गेल्या वर्षी इयत्ता नववीकरिता- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करण्याआधी- गोव्यातील सर्व मुख्याध्यापकांची एक बैठक शिक्षण सचिव आणि शिक्षण खात्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. तसेच यावर्षीसुद्धा इयत्ता सहावीला याची अंमलबजावणी होणार असल्याने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही ठिकाणी गोव्यातील मुख्याध्यापकांची बैठक घेऊन त्यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच गेल्या वर्षी इयत्ता नववीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केल्यानंतर गोव्यातील शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, शालान्त मंडळाचे अध्यक्ष, ‘एससीईआरटी’चे संचालक व शिक्षण खात्यातील सर्व उच्च पदाधिकारी प्रत्येक तालुक्यात जाऊन शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, पालक-शिक्षक संघ पदाधिकारी आणि ज्येष्ठ शिक्षक अशांबरोबर चर्चा करून अंमलबजावणीत येऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणी व त्या दूर करण्याचे प्रयत्न करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. गोव्याच्या इतिहासात अशा प्रकारच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शैक्षणिक मुद्द्यांबद्दल चर्चा करणे व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणे असा यशस्वी प्रयोग पहिल्यांदाच झालेला आहे.
त्याच धर्तीवर या वर्षीसुद्धा शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, शालान्त मंडळ अध्यक्ष व इतर सर्व शिक्षण पदाधिकारी परत एकदा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन लोकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत.
शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळा
गेल्या वर्षी इयत्ता नववीच्या सर्व विषयांच्या शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावर्षीही संपूर्ण मार्च महिना शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे. इयत्ता दहावीला शिकवणारे शिक्षक व इयत्ता सहावीला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
इयत्ता सहावीची पूर्ण पूर्वतयारी करण्यासाठी सुमारे 140 शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञ यांनी दिवाळीच्या सुट्टीत स्वतः सुट्टी न घेता ‘एससीईआरटी’मध्ये येऊन यासाठी लागणारी पूर्वतयारी केलेली आहे. ‘एनसीईआरटी’च्या पाठ्यक्रमात स्थानिक भाग जोडणे, कोकणी आणि मराठी विषयाची नवीन पुस्तके लिहिणे, शिक्षकांच्या मार्गदर्शन शिबिरासाठी आवश्यक साहित्यनिर्मिती करणे अशा प्रकारची विविध कामे या दिवाळीच्या सुट्टीत पूर्ण केली आहेत. या प्रशिक्षण वर्गात गोव्यातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी एनसीईआरटी, नवी दिल्ली येथील पाठ्यक्रम मंडळात प्रमुखपणे कार्यरत असलेली मंडळी मार्गदर्शक म्हणून लाभली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी पहिल्यांदाच एकत्र बसली. वर्षारंभीच्या सहा महिन्यांपूर्वी अशी पूर्ण व पूर्वतयारी करणारी घटना याआधी कदाचित घडली नसावी. गोव्यातील शिक्षकांनी राष्ट्रीय धोरण अंमलबजावणीसाठी दिलेले योगदान व केलेले सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. गोव्यातील काही गणित आणि विज्ञान या विषयातील शिक्षकांना भारतीय विज्ञान शिक्षण संस्था बेंगलोर येथे अकरा दिवसांच्या कार्यशाळेसाठी पाठवण्यात आले होते.
डिसेंबर महिन्यात गोव्यात एक फार मोठा राष्ट्रीय परिसंवाद या विषयावरती आयोजित करण्यात आला होता. त्यात गोव्यातील साधारण 250 शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञांनी भाग घेतला. परिसंवादात मार्गदर्शन करण्यासाठी देशभरातील विविध ‘एसीईआरटी’चे संचालक, ‘एनसीईआरटी’चे सर्व पदाधिकारी, ‘एनआयईपीए’च्या व्हाइस चान्सलर, केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेचे संचालक व इतर राष्ट्रीय पातळीवरील शिक्षणतज्ज्ञ उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षकाला खूप महत्त्व दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने गोव्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, व्यवस्थापन ज्या पद्धतीने काम करत आहे ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे.
सर्वसमावेशक शिक्षण आणि समतोल विकास
‘एनईपी 2020′ नुसार समावेशक शिक्षण (इन्क्लुसिव्ह एज्युकेशन) महत्त्वाचे मानले गेले आहे. गोवा राज्यातील शाळांमध्ये विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी (चिल्ड्रन विथ स्पेशल निड्स- सीडब्ल्यूएसएन) योग्य शैक्षणिक सुविधा, संसाधने आणि प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची समान संधी मिळणार आहे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीमुळे गोव्यातील शिक्षणव्यवस्थेत मोठे सकारात्मक बदल घडत आहेत. नवीन शैक्षणिक आराखड्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत अधिक संधी मिळत असून, त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होत आहे. शिक्षक, पालक आणि समाजाच्या सक्रिय सहभागामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी गोवा राज्य सज्ज झाले आहे.
कुठलीही नवीन गोष्ट करताना अडचणी या येणारच, पण त्या अडचणींवर मात करत पुढे जाणे व सकारात्मक दृष्टीने मार्गक्रमण करणे हा खरा शिक्षणाचा मूळ गाभा आहे आणि त्यासाठीच आलेल्या सगळ्या अडचणींवर एकत्रितपणे सामना करत, गोव्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षणाचा धोरणाचा फायदा व्हावा या ध्येयाने शिक्षण क्षेत्रातील सर्वजण काम करत आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा!