नववी ते बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

0
172

>> दहावीबाबत २९ मार्च रोजी निर्णय

कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) पार्श्‍वभूमीवर शिक्षण खात्याने नववी ते बारावीच्या २१ मार्चपासूनच्या परीक्षा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलल्या आल्या आहेत.

नवीन ते बारावीच्या परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. यासंबंधीचा आदेश शिक्षण संचालिका वंदना राव यांनी काल जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या चर्चेच्या वेळी नववी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्याची सूचना केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शिक्षण खात्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून नववी ते बारावीच्या परीक्षा अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्याची सूचना केली. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पहिला ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे.

दहावीच्या परीक्षेबाबत २९ रोजी निर्णय
पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेनंतर नववी ते बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावीच्या परीक्षेबाबत दि. २९ मार्च रोजी निर्णय जाहीर केला जाणार आहे. तर नववी व अकरावीच्या परीक्षेबाबत ३१ मार्च रोजी पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तसेच बारावीच्या परीक्षेबाबत ३१ मार्च रोजी निर्णय घेऊन परिस्थितीनुसार वेळापत्रक जारी केले जाऊ शकते. तांत्रिक, महाविद्यालयातील परीक्षांबाबत २९ मार्चला आढावा घेतला जाणार आहे. बारावी पेपरच्या तपासणीच्या काम स्थगित ठेवले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.