नवलाई नववर्षाची

0
99
 • प्रा. रमेश सप्रे

तसं पाहिलं तर नववर्षाचं द्वार हे अलिबाबाच्या बंद गुहेच्या दारासारखं आहे. आत प्रवेश केला तर संपत्तीच संपत्ती! म्हणजे यशच यश, सत्ताच सत्ता… यासाठी हवं नियोजन (प्लॅनिंग) नि आयोजन (ऑर्गनायझेशन्). नुसतं कोणापुढे हात पसरून किंवा तोंड वेंगाडून ‘प्रयोजन (स्पॉन्सरशिप्)’ कशाला मागायचं?

माणूस इथून तिथून सारखाच. बघा ना, आपल्याकडे म्हणतात ‘नव्याची नवलाई नऊ दिवस’. तर त्यांच्याकडे म्हणतात ‘नाइन डेज् वंडर्’. म्हणजे बाहेरून जरी फरक दिसला तरी स्वभाव, मनोवृत्ती सर्वसाधारण सारखीच. आपला संदर्भ आहे अर्थातच् नववर्षाचा आरंभ. चालू वर्षाला निरोप देताना म्हणायचं ‘रिंग आउट द ओल्ड’ म्हणजे घंटानादात चालू (संपणार्‍या) वर्षाला निरोप. तसंच नववर्षाचं स्वागत करताना म्हणायचं ‘रिंग इन् द न्यू’ म्हणजे घंटानादाच्या साक्षीनं किंवा साथीनं नववर्षाचं स्वागत!
कल्पना वाईट नाही घंटानादानं हे निरोप व स्वागत समारंभ साजरे करायची. याचबरोबर दिव्यांच्या प्रकाशाच्या साक्षीनं दीपाराधना करत मावळत्या वर्षाला निरोप दिला तर? अन् दीपप्रकाशाच्या साक्षीनं उगवत्या सूर्याचं दीपोत्सव करत स्वागत केलं तर?
एकदम दृष्टीच बदलून जाते. पुरे झालं काळोखाचं कीर्तन. आता सुरू करुया प्रकाशाचं प्रवचन. खरंच, ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश… गिरीशिखरांतुनी, दर्‍याखोर्‍यातुनी, चराचरातुनी वाहे प्रकाश प्रकाश! महाप्रकाश!’
तसं नवं काय असतं हो? सूर्याला विचारलं तर तो हसेल. आपण मात्र ३१ डिसेंबरचा वर्षाचा अखेरचा सूर्यास्त नि १ जानेवारीला नववर्षाचा पहिला सूर्योदय… अशी छाया (प्रकाश)चित्रं काढायची. क्वचित या मावळत्या उगवत्या आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर सेल्फी घ्यायची नि इतरांना दाखवायची, नव्हे पाठवायची.
भिंतीवरची दिनदर्शिका बदलली की आपलं काळावरचं वर्चस्व सिद्ध होतं का? इतकंच काय घड्याळ मनगटावर बांधलं की आपण काळाला बांधू शकतो? नाही. कालदर्शक घड्याळं काळाचा स्वामी कधीही बनू शकणार नाहीत. तसं पाहिलं तर भ्रमणध्वनी (मोबाइल) आल्यानंतर आता घड्याळंही कालबाह्य होऊ लागलीयत.
पण काळ कधी कालबाह्य होईल का? काळाबाबतची एक गोष्ट मात्र लक्षात ठेवू या की काळ कितीही लांबरुंद असला तरी अनादिअनंत नाही. काळाला आरंभ आहे तसाच किंवा म्हणूनच त्याला अंतही आहे. दोन घटनांमधील अंतराला काळ म्हणतात. म्हणून पृथ्वीवरची मानवी सृष्टी संपली की घटना कोणत्या घडणार? नि काळालाही काय अस्तित्व असणार? असो.
यशस्वी, प्रभावी जीवनासाठी चिंतन केलं जातं ते काळाच्या व्यवस्थापनाचं. आपण कोण एवढे टिकोजीराव लागून गेलो आहोत ज्यांचं साक्षात् काळावर वर्चस्व आहे आणि आपण काळाचं व्यवस्थापन करु शकतो? प्रत्यक्षात आपण आपल्या जीवनाची व्यवस्था व्यवस्थित करत असतो. खरं ना?
काळाला मागच्या बाजूनं टक्कल आहे असं म्हणतात. म्हणून काळाला पकडायचं असेल तर सूत्र आहे – ‘कॅच् द टाइम् बाय इट्‌स फोरलॉक्स’ म्हणजे काळाच्या मस्तकावर पुढच्या बाजूला जे काही केस आहेत त्या झुलपांना (फोरलॉक्स) धरून काळाला पकडता येतं. त्याच्यावर स्वामित्व मिळवता येतं. याचा सोपा सरळ अर्थ आहे – काळाच्या मागे राहण्यापेक्षा, काळाच्या पुढे राहायला शिकायचं. म्हणजे एखाद्या घटनेपूर्वीच (उदा.- परीक्षा, खेळाची कसोटी इ.) तयार व्हायचं नि राहायचं.
तसं पाहिलं तर नववर्षाचं द्वार हे अलिबाबाच्या बंद गुहेच्या दारासारखं आहे. आत प्रवेश केला तर संपत्तीच संपत्ती! म्हणजे यशच यश, सत्ताच सत्ता… यासाठी हवं नियोजन (प्लॅनिंग) नि आयोजन (ऑर्गनायझेशन्). नुसतं कोणापुढे हात पसरून किंवा तोंड वेंगाडून ‘प्रयोजन (स्पॉन्सरशिप्)’ कशाला मागायचं?
नववर्षासाठी असा संकल्प करायला काय हरकत आहे?

 • जे काही करायचं, साधायचं असेल ते स्वतःच्या हिंमतीवर करीन. एखादं नवं आस्थापन (स्टार्ट अप्) स्थापन करायचं असेल तर स्वयंपूर्ण रीतीनं करीन.
 • एका नव्या वृक्षाचं बीजारोपण करु या. ट्री म्हणजे टी आर् ई ई – यात …
  टी ः म्हणजे टाइम- वेळ, काळ जो आपल्या हातात आहे.
  आर् ः म्हणजे रिसोर्सेस म्हणजेच आपली स्वतःची साधनसामग्री!
  ई ः म्हणजे एनर्जी – आपल्यात असलेली शक्ती (मुख्यतः इच्छाशक्ती)
  ई ः म्हणजे एफर्ट्‌स – प्रयत्न नि प्रयोग.
 • समर्थ रामदास आपल्याला आवाहन करताहेत –
  प्रसंग हा तुफान रे | प्रयोग- प्रयत्न मान रे |
  अखंड सावधान रे | अखंड सावधान रे ॥
  क्षितीजाकडून किनार्‍याकडे येणारं जहाज क्रमाक्रमानं दिसू लागतं. सर्वप्रथम त्याच्यावरचं निशाण (फ्लॅग) दिसतं नंतर मधला भाग, शेवटी पूर्ण जहाज दिसतं. तसं ज्ञानोबा माउलीच्या शब्दात म्हणायचं तर नव्या वर्षाची घडी घातलेली असते. ती हळुहळू विघडी – उघडी (अन्‌फोल्ड) होत जाते.
  तसं आपल्यात एकदम क्रांतिकारक परिवर्तन घडेल अशी अपेक्षा न करता शनैः शनैः (हळुहळू .. क्रमाक्रमानं) पण स्थिर परिवर्तन कसं घडेल याचा विचार नि तसा आचार करत राहिलं पाहिजे.
  जुन्या वर्षाला श्रद्धांजली अर्पून नववर्षाला अर्घ्य अर्पण करायचं असेल तर नुसता ‘हॅपी न्यू इयर’चा उपचार नको. तर प्रत्येक क्षण आनंदात साजरा करायचा संकल्प करायला हवा. ‘लेट्‌स सेलेब्रेट ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ लाइफ इन द न्यू इयर!’
  नववर्षाची भूपाळी अशी असायला काय हरकत आहे?
  नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशु |
  मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ॥
  लक्षात ठेवू या मनाचिये अंधाराचा (जगाचिये अंधाराचा नव्हे.)