नवऱ्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी; पत्नीला तूर्त दिलासा

0
8

>> बाणस्तारी अपघात : मेघनाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 16 रोजी सुनावणी

बाणस्तारेी येथील भीषण अपघात प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मर्सिडीज चालक श्रीपाद ऊर्फ परेश सिनाई सावर्डेकर याच्या पोलीस कोठडीत फोंडा प्रथम श्रेणी न्यायालयाने काल वाढ केली. त्याला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला अपघात प्रकरणी मर्सिडीज कारच्या मालक मेघना सावर्डेकर हिला न्यायालयाने तूर्त दिलासा दिला असून, तिला तूर्त अटक न करण्याचे निर्देश म्हार्दोळ पोलिसांना दिले आहे. तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 16 ऑगस्टला होणार आहे.

रविवारी बाणस्तारी पुलावर झालेल्या अपघातात मर्सिडीज कारने पाच वाहनांना धडक दिली होती, त्यात तिघांचा मृत्यू, तर तिघेजण जखमी झाले होते. बाणस्तारी अपघात प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेल्या परेश सावर्डेकर याला सुरुवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती संपल्याने त्याला काल फोंडा प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता त्याला आणखी पाच दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री दिवाडीवासीयांनी म्हार्दोळ पोलीस स्थानकावर धडक देत मेघना सावर्डेकर हिच्या अटकेची मागणी केली होती. अपघातावेळी मेघना हीच कार चालवत असल्याचा दावा नागरिकांनी केला होता. त्यानंतर म्हार्दोळ पोलिसांनी बुधवार सकाळपर्यंत तिला अटक केले जाईल असे आश्वासन दिले होते.

या पार्श्वभूमीवर अटकेच्या शक्यतेने मेघना सावर्डेकर हिने फोंडा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयासमोर अटकपूर्व जामिनासाठी काल अर्ज दाखल केला. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने मेघना सावर्डेकर हिला तूर्त अटक न करण्याचे निर्देश म्हार्दोळ पोलिसांना दिले. त्यामुळे तूर्त मेघनाला दिलासा मिळाला असून, अटकेपासून काही दिवस तरी संरक्षण मिळाले आहे. या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या 16 ऑगस्ट रोजी होणार आहे.
दरम्यान, काल देखील दिवाडीतील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांची भेट घेऊन कारच्या मालक मेघना सावर्डेकर हिला अटक करण्याची मागणी केली.