- (योगसाधना- ५८४, अंतरंगयोग- १६९)
- – डॉ. सीताकांत घाणेकर
बहुतेकवेळा मानवाच्या कृत्रिम स्वभावामुळे आपण कुठल्याही परिस्थितीला इतरांना जबाबदार ठरवतो. म्हणून आपल्या मनाला व्यवस्थित मातेच्या प्रेमाने समजवावे लागते. आध्यात्मिकतेत मनाला स्वतःच्या मुलाप्रमाणे मानावे अशी भावना आहे.
संपूर्ण विश्वात प्रत्येक जिवंत प्राण्यासमोर काही ना काही समस्या असते. वैयक्तिक, सामाजिक, नैसर्गिक अशा विविध समस्या त्याच्यापुढे येत राहतात. आज या कलियुगात मानवाची नीतिमत्ता भ्रष्ट होत चालली आहे. अर्थात याला अपवाद आहेतच. पण या एकूण वातावरणामुळे सर्वांना काही ना काही ताणतणावांना सामोरे जावे लागतेच. प्रत्येकाच्या व्यवसायात, पेशात, नोकरीत तशी अशांतीच असते. त्यामुळे तो बेचैन होतो. त्याची झोप व्यवस्थित होत नाही. त्यातून अनेक मनोविकार त्याला जडतात. त्याशिवाय चुकीच्या जीवनपद्धतीमुळे काही पीडा त्याला त्रास करतात, चिंता वाढवतात. शास्त्रकार म्हणतात-
चिता चिंता समाप्रोक्ता, बिन्दुमात्रं विशेषता|
सजीवं दहते चिंता, निर्जीवं दहते चिता॥
खरेच, एका लहानशा बिंदूची ताकद बघा. जमीन-अस्मानाचा फरक. हे माहीत असूनदेखील चिंता चालूच असते- आजची अन् उद्याची, आपली अन् कुटुंबाची, समाजाची, विश्वाची… त्यातच असेही म्हटले जाते- ‘मन चिंती ते वैरी न चिंती|’
प्रत्येकाच्या धकाधकीच्या जीवनात एका जागेवर शांतपणे बसून विचार करायला वेळच नसतो. विसावा म्हणून मग अनेकजण कुठल्यातरी शांत ठिकाणी अथवा निसर्गरम्य जागेवर थोडे दिवस जातात. काहीजण शांतीसाठी चार-पाच दिवस कुठल्यातरी खास कार्यक्रमाला जातात. तिथे ताणतणाव कसा हाताळावा याचे शिबीर असते. थोडातरी विरंगुळा, मनःशांती. रोजच्या जीवनापासून सुटका. केव्हा केव्हा शाळा-कॉलेजला सुट्टी असली तर लहानमोठ्या सहली काढतात. काहीतरी नवे शिकायला मिळते आणि मौजमस्ती होते.
काहीजण या प्रक्रियेला ‘रिट्रिट’ असे म्हणतात. तसे पाहिले तर रिट्रिटचा अर्थ आहे ‘माघार.’ अर्थात थोडावेळ रोजच्या व्यवहारापासून माघार. म्हणून त्याचा हेतूदेखील बघायला हवा. ‘मनःशांती’ हा मुख्य मुद्दा आहे.
आपण असे घरापासून दूर जातो, फिरतो, विविध नावाजलेली ठिकाणं बघतो. काही ऐतिहासिक, काही शैक्षणिक… मौजमस्ती करतो. काही दिवसांनी परत येतो व रोजच्या व्यवहारात परत एकदा गुंतून जातो… यात वावगे काही नाही. पण मुख्य मुद्दा हा की, आपली चिंता परत सुरू होते. आपण परत परत तर अशी सुटी घेऊन जाऊ शकत नाही.
या कठीण समस्येवर एक चांगला उपाय म्हणजे शास्त्रशुद्ध व नियमित ध्यान.
आपण नवरात्रीवर विचार करताना अष्टशक्तींवर विचार केला. त्यांतील पहिली शक्ती म्हणजे माघार घेण्याची शक्ती, विस्तार संकीर्ण करण्याची शक्ती, संयम ठेवण्याची शक्ती. या शक्तींची देवी म्हणजे पार्वतीदेवी. त्यानंतर बाकीच्या सात शक्ती वापरायच्या आहेत.
‘माघार घेणे’ याबाबत उत्कृष्ट उदाहरण आपण बघितले होते ते म्हणजे कासवाचे. काही संकट-समस्या समोर दिसली की कासव आपले चार पाय व डोके आपल्या मजबूत अशा कवचात घेतो. पुढे तो विचार करीत असेल की पुढे काय करावे? आपणदेखील तेच करायचे आहे.
१. कुठल्याही परिस्थितीवर अथवा भीती, क्रोध या भावनांद्वारे लगेच प्रतिक्रिया न दर्शवता थोडा वेळ माघार घ्यावी. कारण क्रोधामुळे आपल्याकडून कटू शब्द निघण्याची अथवा चुकीची क्रिया करण्याची शक्यता वाढते.
२. त्यानंतर शांतपणे आपल्या विचारांवर व त्यामुळे तयार झालेल्या भावनांवर लक्ष केंद्रित करावे.
३. आपल्या आत्मिक गुणांची उजळणी करावी. आत्मा सर्वप्रथम पवित्र आहे, तद्नंतर ज्ञानस्वरूप, सत्यस्वरूप, प्रेमस्वरूप, शांतीस्वरूप, सुखस्वरूप, आनंदस्वरूप, शक्तीस्वरूप आहे.
यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या ध्यानपद्धतीनुसार अनेक वेळा आपली आत्मशक्ती कमी पडते. त्यामुळे परस्पर शिवशंकराशी जुडावे. तो तर आपला मातापिता, सद्गुरू, शिक्षक आहे. तो सर्व शक्तिमान आहे. त्याच्याकडे जुडल्यामुळे आमची आत्मशक्ती वाढते. या सर्व शक्तीनिशी परत एकदा परिस्थितीवर अथवा भावनेवर विचार करावा. अशा प्रक्रियेनंतर प्रतिक्रिया योग्य होण्याची शक्यता वाढते. अनेकवेळा समस्येला योग्य उपाय सापडतो.
यावेळी एक गोष्ट मुख्य व अति सूक्ष्म असते ती म्हणजे स्वतःचा अहंकार व तोदेखील सूक्ष्म. त्यामुळे प्रतिक्रिया तीव्र असू शकते आणि परिस्थिती आणखी चिघळू शकते.
एक म्हण आहे-
आपला तापट स्वभाव आपल्याला त्रासात घालतो,
आपला अहंकार आपल्याला त्या परिस्थितीत स्थित करतो.
आणि एकदा अहंकार नियंत्रणाबाहेर गेला की परिस्थिती चिघळते. मग विनाश अटळ असतो. परत पूर्वस्थितीत येणे अत्यंत कठीण असते. कारण अनेकांचे छोटे-मोठे अहंकार आड येतात. त्यामुळे अपशब्द, तंटे, भांडणे सुरू होतात व चिरकालपर्यंत टिकतात.
याची अनेक उदाहरणे आहेत-
- महाभारतात कौरव-पांडव यांच्या समस्या.
- रामायणात रावणाचा स्वभाव व अहंकार.
- आजच्या काळातील विविध राष्ट्रांमध्ये झालेली युद्धे.
- लोकसभा व राज्यसभेमध्ये घडणार्या घटना.
- अनेकांच्या कौटुंबिक जीवनात घडत असलेले प्रसंग.
म्हणूनच सुज्ञ, सज्जन, बुद्धिमान व्यक्तीने प्रामाणिकपणे पाळायचे नियम म्हणजे- - अहंकार हा शारीरिक पातळीवर असतो, त्यामुळे वय, नाते, पद, अनुभव, प्रतिष्ठा… यांचा निर्णयावर परिणाम होऊ शकतो.
- मी आत्मस्वरूप आहे म्हणून माझ्या सर्व गुणांची मी शक्यतो उजळणी करून आठवण ठेवणार.
- सर्वांना आपल्या जीवनात शांती, सुख, आनंद यांची अपेक्षा आहे. आज आध्यात्मिक अभ्यास सहसा केला जात नाही म्हणून हे सर्व कठीण वाटते. पण दरसमस्येच्या वेळी नियमित सराव केला तर ते सोपे जाते. एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीला जी शांती लाभते, त्यामुळे ती व्यक्ती आपल्या आत्म्याच्या नैसर्गिक गुणांकडे वळते. मग तिला हे चांगले व्यसन जडते. कुठल्याही समस्येवेळी, बैठकीमध्ये आपला हा स्वभाव ती विसरत नाही. कारण तिच्या मनावर दृढ सुसंस्कार होतात.
बहुतेकवेळा मानवाच्या कृत्रिम स्वभावामुळे आपण कुठल्याही परिस्थितीला इतरांना जबाबदार ठरवतो. म्हणून आपल्या मनाला व्यवस्थित मातेच्या प्रेमाने समजवावे लागते. आध्यात्मिकतेत मनाला स्वतःच्या मुलाप्रमाणे मानावे अशी भावना आहे.
विषय सोपा करण्यासाठी सर्व संत-महापुरुषांच्या कथा, चरित्रे वाचून त्यांवर अभ्यास करावा. उदाहरणार्थ-
- संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, संत कबीर, संत नामदेव वगैरे…
- येशू ख्रिस्त क्रुसावर जातानादेखील शांत होता. त्याने कोणताही अपशब्द काढला नाही वा रागावला नाही. उलट अत्याचारकर्त्यांना क्षमा करण्याची याचना करतो.
- भगवान बुद्ध ही शांतीची प्रतिमा.
- श्रीकृष्ण शांतीदूत बनून कौरवांकडे गेला व आपल्या ज्ञानपूर्ण भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांना सुनावले. हेदेखील स्पष्ट केले की, माघार घेणे म्हणजे अन्याय सहन करणे नाही. कौरवांनी त्याचे काहीदेखील ऐकले नाही. त्यानंतर घडलेले महायुद्ध व त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच ज्ञात आहेत.
योगसाधकांनी बिकट परिस्थितीच्या वेळी मध्ये-मध्ये गरज असेल तेव्हा १०-१५ मिनिटे ध्यान करून आपल्या मूळ स्थितीत जाऊन परमेश्वराशी संपर्क साधावा व आपली आत्मशक्ती वाढवावी.
(संदर्भ ः प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यविद्यालय यांचे साहित्य)