ध्यानातून सुख-शांतीची प्राप्ती

0
9

योगसाधना ः 646, अंतरंगयोग- 232

  • डॉ. सीताकांत घाणेकर

अष्टांगयोगामध्ये ‘ध्यान’ ही सातवी पायरी आहे. ध्यान व्यवस्थित व्हायचे असेल तर आधीच्या सहा पायऱ्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व पालन हवे, तरच ध्यानामध्ये अत्युच्च प्रतीचा आनंद, सुख, शांती, समाधान मिळेल.

अष्टांगयोग (राजयोग)- आठ अंगांचा योग- यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. योगसाधनेमध्ये या सर्व अंगांचा शास्त्रशुद्ध अभ्यास आवश्यक आहे. तसेच अन्य तीन योगमार्गांचे ज्ञानदेखील अपेक्षित आहे. ज्ञान मिळवल्यानंतर त्याप्रमाणे ते आचरणात आणणे जीवनविकासासाठी आवश्यक आहे- जेणेकरून मानवी जीवनाच्या सर्व समस्यांना व संकटांना व्यक्ती सहज सामोरी जाऊ शकेल.
बहुतेकजण अष्टांगयोगातील आसन, प्राणायाम व ध्यान यांचाच उपयोग करतात. तेदेखील फक्त शारीरिक पैलू सांभाळून. तसाच तो कर्मकांडात्मक करतात. त्या पैलूंमागील तत्त्वज्ञान समजून घेत नाहीत. व्यायामासारखाच योग केला जातो, म्हणूनच अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत.
अनेकजण सांगतात की मी नियमित ध्यान करतो. ध्यान म्हणजे एका विशिष्ट आसनात बसून, मुद्रा करून डोळे मिटणे नव्हे. त्यावेळी व्यक्ती कसले, कुणाचे ध्यान करते हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी ध्यानाचे तत्त्वज्ञान समजून घेणे आवश्यक आहे.

अष्टांगयोगामध्ये ‘ध्यान’ हे सातवे अंग आहे. पहिल्या सात पायऱ्या व्यवस्थित पार केल्या तरच ध्यान व्यवस्थित होईल. ध्यानापूर्वी ‘धारणा’ हे अंग आहे. ‘धारणा’ म्हणजे ‘धारण करणे.’ म्हणजे आधीच्या पाच पायऱ्यांत जे ज्ञान मिळाले आहे ते संपूर्णपणे स्वतःच्या आचरणात आणणे. तरच मग ध्यान म्हणजे चित्तएकाग्रता व्यवस्थित होईल, नाहीतर आपले ‘माकडमन’ इकडून-तिकडे फिरतच राहील- बिलकूल अनियंत्रित. तर मग असे ध्यान करण्याचा फायदा काय?

ध्यान करण्याचे विविध मार्ग आहेत-
1) विपश्यना ः येथे सर्व लक्ष स्वतःच्या श्वासावर केंद्रित करायचे असते. तसे केल्याने शरीरात जे सूक्ष्म बदल होतात त्यांची नोंद घ्यायची असते. हे ध्यान बौद्धमार्गातील आहे.

2) ॐ कार ध्यान ः वेगवेगळ्या तऱ्हेने ॐ म्हणायचा असतो.

3) मंत्र ध्यान ः येथे विविध मंत्र म्हटले जातात. ‘ॐ गं गणपतये नमः’, ‘ॐ नमः शिवाय’, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय.’ गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, तसेच कुठल्याही देवाचा अथवा देवीचा आपण मंत्र म्हणू शकतो. पण त्या आराध्य देवतेचे दर्शन डोळ्यांसमोर ठेवले तर मंत्राचा फायदा जास्त होतो.
वरील दोन्ही पद्धतीत स्वरांमधील कंपने फारच महत्त्वाची असतात. त्यासाठी ते भावपूर्णतेने म्हणणे आवश्यक असते. आवाज कोमल असायला हवा. मंत्र फार मोठ्याने व कर्मकांडात्मक म्हणू नये.

4) भजन ध्यान ः या प्रकारात विविध छोटी छोटी एक-दोन ओळींची भजने अत्यंत भावपूर्ण रीतीने- भगवंताला संपूर्ण समर्पित होऊन, चित्त एकाग्र करून गायली जातात. ज्या देवताचे भजन म्हणतो त्या देवतेची मूर्ती अंतर्मनासमोर आणली तर जास्त परिणामकारक होते. संत लोक अशी भजने म्हणत असत. इतिहासकार सांगतात-
‘संत नामदेव करी कीर्तन
समोर नाचे देव पांडुरंग’
नामदेवाना विठ्ठलाचे दर्शन व्हायचे. आपला भाव उत्कृष्ट असला तर असे दर्शन घडू शकेल.

5) चक्रध्यान ः मानवी शरीरातील शक्तीची स्थाने म्हणजे शक्तिचक्रे- सप्तचक्रे- प्रत्येक चक्राचा विशिष्ट मंत्र म्हणून त्या चक्रावर ध्यान केले तर योगसाधनेत चांगले अनुभव येतात.
सप्तचक्रे अशी (वरून खाली)- 1. सहस्रार, 2. आज्ञा चक्र, 3. विशुद्ध चक्र, 4. अनाहत चक्र, 5. मणिपूर चक्र, 6. स्वाधिष्ठान चक्र, 7. मुलाधार चक्र.
पाश्चात्त्य वैद्यकीय शास्त्राप्रमाणे मानवाच्या शरीरात ज्या संप्रेरक ग्रंथी आहेत (एंडोक्रायीन ग्लॅन्ड्स) त्यांचे स्थान व चक्रांचे स्थान जवळजवळ मिळतेजुळते असेच आहे.
या ग्रंथी (वरून खाली) ः 1. पिट्यूटरी, 2. पाइनल, 3. थायरॉईड, 4. थायमस, 5. स्वादुपिंड, 6. एड्रेनल, 7. अंडाकोश.

6) स्वरध्यान ः यामध्ये संगीतातील स्वरांचा उपयोग केला जातो- सा, रे, ग, म, प, ध, नी, सा- सप्तस्वरांतील एक-एक अक्षर गाता गाता एका-एका चक्रावर ध्यान केंद्रित केले जाते. शास्त्रकार सांगतात की, कोमल आवाजामुळे विशिष्ट स्पंदने उत्पन्न होतात व विविध सूक्ष्म व सुखदायक अनुभव येतात.
योगशास्त्राप्रमाणे मणक्याच्या खालच्या टोकाजवळ ‘कुंडलिनी’ ही एक अदृश्य व अद्भुत शक्ती आहे. योगसाधना करून ती शक्ती जागृत करतात. हळूहळू वर येऊन ती सहस्रार चक्रापर्यंत पोचते. हा अनुभव फार वरच्या पातळीचा. ही कुंडलिनी जागृती एका प्रशिक्षित सद्गुरूकडूनच शिकायची असते. तशीच प्राथमिक स्तरावरील योगसाधकाने करायची नसते. फायदे तसे नुकसानदेखील होऊ शकते.

7) आत्मा-परमात्मा ध्यान ः आत्मा- एक छोटा बिंदूस्वरूप मानला जातो. तो भृकुटीच्या मध्यात वास करतो. परमात्मा- परमधामामध्ये सर्व आत्म्यांबरोबर वास करतो. तो तेजस्वी ज्योतीस्वरूप, निर्गुण, निराकार आहे. परमधामात पूर्ण शांती असते व सोनेरी-लाल प्रकाश असतो. या ध्यानामध्ये आत्मा परमात्म्याकडे चित्त एकाग्र करून त्याच्याशी संवाद साधतो. आत्मा परमात्म्याला परम मातापिता, सद्गुरू मानतो. त्यामुळे तो त्याच्याकडे संवाद साधतो. आपल्या समस्यांचे वर्णन करतो. त्याच्याकडून मार्गदर्शन मागतो. त्याशिवाय त्याच्या शक्ती स्वतःमध्ये सामावतो. या शक्ती आहेत- पवित्रता, ज्ञान, सत्य, प्रेम, शांती, सुख, आनंद. त्यामुळे आत्मा मास्टर शक्तिमान बनतो.

हे ध्यान ब्रह्ममुहूर्तावर करणे जास्त परिणामकारक व उपयोगाचे आहे. सकाळी साडेतीन ते साडेपाचपर्यंत. कारण त्यावेळी नेटवर्क साफ असतो. भगवंताच्या नेटवर्कचे अनेक फायदे आहेत. नेटवर्क व्यस्त नसतो, स्वीच ऑफ नसतो. कव्हरेजच्या बाहेर नसतो, नेटवर्क संपूर्ण उपलब्ध असतो. संपूर्ण वेळ मिळतो. बॅटरी डिसचार्ज नसते. फ्री रोमिंग सवलत असते.

मुख्य म्हणजे योग्यवेळी हे ध्यान करणे आवश्यक असते. खरे म्हणजे ती वेळ अगदी शांत असते. एकदा सवय झाली की खरेच अत्यंत आनंदाचा अनुभव येतो- चिदानंद, आत्मानंद- उच्च कोटीचा आनंद. माऊंट आबूच्या प्रजापिता विश्वविद्यालयाच्या केंद्रामध्ये असे ध्यान शिकवले जाते.
मला तर हे ध्यान अत्यंत उपयुक्त वाटते. शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाला एका विशिष्ट तऱ्हेचे ध्यान आवडत असेल. आपल्या आवडीप्रमाणे ते करावे. पण भाव व श्रद्धापूर्वक करणे आवश्यक आहे.

अष्टांगयोगामध्ये ‘ध्यान’ ही सातवी पायरी आहे. ध्यान व्यवस्थित व्हायचे असेल तर आधीच्या सहा पायऱ्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व पालन हवे, तरच ध्यानामध्ये अत्युच्च प्रतीचा आनंद, सुख, शांती, समाधान मिळेल. पण त्यासाठी योग्य योगसाधना आवश्यक आहे. नियमिततादेखील हवी.
एकदा ध्यान व्यवस्थित झाले की आठवी पायरी- समाधी- आपोआप शक्य होईल. प्रत्येक योगसाधकाने या सुखद अनुभव व अनुभूतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत.