ध्यानातून सत्‌‍युगाकडे…!

0
11

योगसाधना- 586, अंतरंगयोग- 171

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आज मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे अहंकार. याचे सहकारी आहेत- पद, प्रतिष्ठा, पैसा… पण या सर्व गोष्टी शरीरासाठी आहेत, जे एक दिवस नष्ट होणार आहे. चिरकाल टिकणारा आहे तो फक्त आत्मा. तो यातील काहीही घेऊन जात नाही. तो घेऊन जातो ते संस्कार व कर्म.

प्रत्येक माणसाच्या जीवनात विविध तऱ्हेच्या व्यक्ती येतात. कुटुंबात, शेजाऱ्यांत, कार्यालयात, समाजात, विश्वात… या सगळ्यांत वावरत असताना एक गोष्ट लक्षात येते की, प्रत्येक व्यक्तीची प्रामाणिक अपेक्षा असते की इतरांनी आपल्या इच्छेप्रमाणे वागावे.
उदा. कुटुंबात पालकांना वाटते की आपल्या मुलांनी चांगले वागावे, कुटुंबाच्या संस्कारांचे पालन करावे. पती-पत्नीला वाटते की, दुसऱ्याने माझ्या मताप्रमाणे वागावे. तसेच शेजाऱ्यांनी चांगला शेजारधर्म पाळावा. कार्यालयात पदाधिकाऱ्यांना वाटते की, सर्व सेवकांनी, कामगारांनी व्यवस्थित काम करावे, आज्ञेचे पालन करावे. कामगारांना वाटते की त्यांना वरिष्ठांकडून चांगली वागणूक मिळावी. समाजातदेखील परस्परांकडून तशीच अपेक्षा असते.
ही अशी अपेक्षा करणे यात काहीही वावगे नाही. शेवटी प्रत्येकाला आनंदात, सुखात जीवन जगायचे असते. पण तसे घडत नाही. यातून आपली मनःशांती बिघडते. त्यामुळे वादावादी, भांडणे होतात. अशावेळी आपण ज्या अष्टशक्तींचा विचार करतो त्यांचा उपयोग होतो. अशी प्रत्येक घटना घडते त्यावेळी लगेच या शक्तींवर विचार करून त्याप्रमाणे आपण वागणे आवश्यक असते.
दुसरी व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही, तिला पाहिजे तशी ती वागते, असे आपण म्हणतो. अशावेळी आपण फक्त तिच्या आजच्या जन्माचा विचार करतो. म्हणजे तिचे वयस्थान, अनुभव, शिक्षण वगैरे. पण आध्यात्मिकशास्त्राप्रमाणे विचार केला तर शास्त्रकार असे सांगतात की, त्या व्यक्तीचे याआधी शेकडो जन्म विविध परिस्थितीत झाले आहेत. त्यामुळे तिच्यावर अनेक संस्कार मागच्या जन्माचेदेखील आहेत. त्यामुळे त्यावेळी आपली पहिली शक्ती वापरून थोडी माघार घ्यावी, मन शांत ठेवावे म्हणजे इतर शक्तींवर विचार करता येतो.

त्या व्यक्तीच्या तशा वागण्यावर लगेच प्रतिकार व्यक्त न करता समेट करण्याचा विचार करावा. तिच्यावर थोडी दया दाखवावी व क्षमा करावी. अनेकवेळा ती व्यक्ती तशी विचित्र वागली म्हणून आपण त्या व्यक्तीला बदलू शकत नाही; त्या व्यक्तीऐवजी दुसरी व्यक्ती आणू शकत नाही.
हा विषय समजावण्यासाठी शास्त्रकार वृक्षाचे व त्याच्या बिजाचे एक छान उदाहरण देतात. वृक्षाची बिजे जरी एकसारखी दिसली तरी आतून ती एकच तऱ्हेची असतील याची खात्री नाही. बिजामध्ये काहीतरी कमतरता आहे म्हणून तो वृक्ष तसा झाला. आता तो मोठा झाला, त्यामुळे आहे तसाच त्याचा स्वीकार करायला हवा. कारण ती कमतरता जन्मापासूनची आहे. हाच कायदा व्यक्तीलादेखील लागू आहे याची जाणीव नसल्यामुळे आपण त्या व्यक्तीवर ओरडतो, शिक्षा करतो. त्यामुळे स्वतःलाही त्रास होतो आणि ती व्यक्ती सुधारेल असेही नाही. अशावेळी सहनशक्तीचा फायदा होतो. त्या व्यक्तीचा दोषांसह स्वीकार करावा. जेव्हा अशी घटना पती-पत्नीमध्ये घडते तेव्हा सहनशक्तीचा अवलंब करावाच लागतो. मागच्या पिढीत हे सहज घडत होते. अनेकवेळा बहुतेक महिला म्हणताना मी ऐकले आहे- ‘आम्ही अमुक-अमुक गोष्टी घडल्या तरी सुखात राहत होतो!’ खरे म्हणजे त्यावेळी संस्कारच असे होते की जीवनातील परिस्थितीशी तडजोड करण्यातच लोक सुख मानत होते.

आजच्या युगात असे घडताना दिसत नाही. त्यामुळे घटस्फोट होतात. काहीजण पुनर्विवाह करण्याचा विचार करतात. पण तिथेदेखील तीच समस्या येऊ शकते. अनेकवेळा आपण म्हणतो- ‘मी क्षमा केली!’ पण ती मनापासून असते का? केव्हा केव्हा आपण वरवर क्षमा करतो, पण ती घटना विसरत नाही. त्यामुळे परिस्थितीत वरचेवर बदल अवश्य दिसतो, पण ती बदलत मात्र नाही. याचे कारण म्हणजे, या सर्व गोष्टी बाह्यमनाच्या पायरीवर असतात. अंतर्मनात नकारात्मक विचार चालूच असतात. दिवसातून अनेकवेळा ती घटना आठवते व विचार चालू राहतात. त्यामुळे हा विषय अंतर्मनाच्या पातळीवर व त्यापुढे जाऊन आत्मिक पातळीवर हाताळायला हवा. ही प्रक्रिया अगदी सूक्ष्म असते. त्यासाठी नियमित शास्त्रशुद्ध सद्विचारांचा अभ्यास करणे, त्यावर चिंतन करणे आवश्यक आहे. यासाठी योगसाधनेत एक उत्तम उपाय आहे ते म्हणजे ध्यान. येथे आत्म्याच्या विविध गुणांची उजळणी करायची असते. उदा. पवित्रता, ज्ञान, सत्व, प्रेम, शांती, सुख, आनंद, शक्ती…
माऊंट अबूच्या प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या विश्वविद्यालयातर्फे विविध साहित्य रोज प्रसारित केले जाते. त्या साहित्याचा अभ्यास व चिंतन केले तर स्वभाव, संस्कार बदलणे ही गोष्ट मुळीच कठीण नाही.

आज मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे अहंकार. याचे सहकारी आहेत- पद, प्रतिष्ठा, पैसा… पण या सर्व गोष्टी शरीरासाठी आहेत, जे एक दिवस नष्ट होणार आहे. चिरकाल टिकणारा आहे तो फक्त आत्मा. तो यातील काहीही घेऊन जात नाही. तो घेऊन जातो ते संस्कार व कर्म.
ध्यान करताना एक विचार नेहमी मनी ठेवावा. तो म्हणजे- ‘मी संपूर्ण निरहंकारी आत्मा आहे!’ म्हणूनच आत्म्याचे गुण लक्षात आणायचे म्हणजे व्यक्ती देहभानापासून मुक्त होऊन आत्मिक स्मृतीमध्ये जाते. त्यावेळी ‘मी’ म्हणजे शरीर नसून ‘आत्मा’ आहे याची जाणीव हळूहळू व्हायला लागते. तद्नंतर मानवी मूल्यांवर चिंतन केले असता आपोआप शांती, प्रेम, स्नेह हे गुण उदयास घेण्यास प्रारंभ होतो. अर्थात ही प्रक्रिया अगदी सूक्ष्म असते, त्यामुळे संपूर्ण शांतता- बाहेरील व अंतर्मनातील- आवश्यक आहे. तसेच चित्ताची पूर्ण एकाग्रता हवी. त्यासाठीच ध्यान करण्याची उत्कृष्ट वेळ शास्त्रकारांनी निश्चित केली आहे ती म्हणजे, ब्रह्ममुहूर्त (अमृतवेळा). सकाळी साडेतीन ते पाच. या जाणिवेचा अभ्यास जसजसा वाढत जातो तसतशी व्यक्तीची दुर्बलता कमी होऊन आत्मशक्ती वाढते. ती व्यक्ती आत्मस्वरूप होते. तिला चिदानंदाचा अनुभव यायला लागतो.
म्हणून शंकराचार्य म्हणतात-
‘चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहं’
या अवस्थेत असताना त्या व्यक्तीला डोळे उघडून परत जगात यावे असे वाटत नाही. तीच ही समाधी अवस्था असेल ज्या अवस्थेत अनेक संत व महापुरुष जात असत.
येथे संत कबीरांची आठवण येते-
करत करत अभ्यास के जडमति होत सुजान;
रसरी आवत जात ते सिल पर परत निशान

  • जशी एक दोरी (विहिरीवर) परत परत येऊन गेल्यामुळे शिळेवर निशाण पडते, तसाच जडबुद्धीदेखील सुजाण होऊ शकतो. त्यासाठी आवश्यक आहे- जीवनविकासाची सदिच्छा, नियमित शास्त्रशुद्ध अभ्यास, चिंतन व साधना. अशी साधना केली तर अवश्य संस्कार बदलतील. अपेक्षाभंग झाला तरी वाईट वाटणार नाही. समोरची व्यक्तीदेखील आपली वागणूक बदलेल. जीवनातील विविध समस्यांना योग्य उपाय सापडेल.
    योगसाधकांबरोबर आम्हीही सर्वजणांनी असे केले तर विश्वात कलियुगाचा अंत होऊन सत्‌‍युगाचे आगमन होईल.
    (संदर्भ ः प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांचे साहित्य)