धोनीचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन अशक्य

0
130

>> किरमाणी यांनी व्यक्त केले मत

भारताला दोन विश्वचषके आणि एक चॅम्पियन्स चषक जिंकून दिलेला महेंद्रसिंह भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार असून अजून आपल्या भावी योजनांबद्दल काहीही बोलला नसला तरी तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही, असे मत १९८३ सालच्या जगज्जेत्या संघाचा यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी व्यक्त केले.
भारताचा माजी कर्णधार असलेला धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेट खेळलेला नाही.

त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत मागील काही काळात बरीच चर्चा होत आहे. बुधवारी संध्याकाळी ‘धोनी रिटायर्स’ असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत होता. त्या संदर्भात बोलताना किरमाणी यांनी धोनीला त्याच्या निवृत्तीबाबत चांगले माहीत असेल, असे स्पष्ट केले. तो शांत आहे. त्याने आपल्या भावी योजनांबद्दल काहीही बोललेले नाही. परंतु मला वाटत नाही की तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. त्याने आपली सर्व स्वप्ने आणि ध्येय गाठलेली आहेत. त्याच्याकडे आता आणखी साध्य करण्यासारखे काहीही शिल्लक नाही आहे. असे असले तरी निर्णय त्याने घ्यायचा आहे. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या बातम्यांनुसार तो आयपीएल खेळण्यास बराच उत्सुक आहे. शक्यतो यंदाचा आयपीएल त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आयपीएल असू शकतो, असे किरमानी यांनी एशियानेट न्यूजेबलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

किरमानी हे सुनील गावस्कर, बिशनसिंग बेदी आणि कपिल देव यांच्या नेतृत्वात खेळले आहेत. परंतु त्यांच्या मते धोनी हाच भारताचा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार आहे. आपण ज्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलेलो आहे त्यांचा मला आदर आहे. परंतु या सर्वांपेक्षा मी धोनीला सरस ठरवीन. हे सत्य आहे. ते स्वीकारवेच लागेल, असे किरमानी यांनी सांगितले.