धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आठ फुटीर आमदारांविरोधात तक्रार

0
9

कॉंग्रेस पक्षाच्या ८ फुटीर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करून देवासमक्ष घेतलेली शपथ मोडून नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार स्वप्नेश शेर्लेकर आणि रोशन माथाईश यांनी पणजी पोलीस स्थानकात काल नोंदविली.

पणजी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद न केल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा स्वप्नेश शेर्लेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

नागरिकांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांना देवालय, चर्च, मशीद आदी धार्मिक स्थळांत जाऊन पक्षांतर न करण्याची शपथ घेण्याची सूचना केली नव्हती. तरीही त्यांनी धार्मिक स्थळात जाऊन शपथ घेतली आणि ती मोडली. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. कॉंग्रेसच्या ८ फुटीर आमदारांनी धर्माची चेष्टा केली आहे, असेही शेर्लेकर यांनी सांगितले. दरम्यान, फुटीर आमदारांच्याविरोधात सुदीप ताम्हणकर व इतरांनी पर्वरी पोलीस स्थानकात यापूर्वीच तक्रार दाखल केली आहे.