धार्मिक दंगे का?

0
29

गेल्या आठवड्यात रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सवाच्या काळात देशाच्या विविध भागांमध्ये उद्भवलेल्या जातीय दंगे उसळण्याच्या घटना चिंतित करणार्‍या आहेत. एकूण आकडेवारी तपासली तर १० एप्रिलला झालेल्या रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, गुजरात आणि आपल्या गोव्यातही वास्कोमध्ये धार्मिक तणाव उद्भवला. त्यानंतर गेल्या शनिवारी १६ एप्रिलला झालेल्या हनुमान जयंतीच्या वेळी दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात पुन्हा दंगे आणि धार्मिक तणाव निर्माण झाल्याचे दिसले. देशाच्या विविध भागांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा धार्मिक तणाव निर्माण होण्याची बहुधा ही बाबरी पाडली गेल्यानंतरची पहिलीच घटना असावी. त्यामुळे एवढे धार्मिक तणावाचे वातावरण का निर्माण होते आहे व त्यामागे नेमके कोण आहेत याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सवांना गालबोट लावणार्‍या ज्या ज्या घटना घडल्या, त्या सर्वांचे स्वरूप साधारणतः एकाच प्रकारचे दिसते. या उत्सवांच्या निमित्ताने काढल्या गेलेल्या मिरवणुकांवर दगडफेक होणे व त्यातून दोन धार्मिक गटांमध्ये हिंसाचार माजणे असेच साधारण या दंग्यांचे स्वरूप राहिले आहे. कोणी कोणाची आधी कुरापत काढली हा पोलीस तपासाचा विषय आहे, परंतु ज्या प्रकारे पूर्वनियोजितपणे केल्यागत हा संघर्ष झडलेला दिसतो त्याकडे पाहिल्यास या विषयाकडे क्षुल्लक घटना म्हणून दुर्लक्ष न करता त्याच्या खोलात जाण्याची व त्यामागे काही घटकांचे एखादे षड्‌यंत्र असावे का हे तपासण्याची आवश्यकता आहे. झालेला हिंसाचार हा गुजरात व गोव्यासारखे काही अपवाद सोडल्यास बहुतांशी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांत झालेला आहे ही देखील एक उल्लेखनीय बाब आहे. देशातील तेरा विरोधी पक्षांनी या दंग्यांसंदर्भात एक संयुक्त पत्रक जारी केले आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर मौन का बाळगले आहे असा सवाल केला. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत्प्रकाश नड्डा यांनी विरोधकांच्या सत्ताकाळात देशात सर्वाधिक दंगे झाल्याची आकडेवारी देताना ६९ मधील गुजरात दंगल, ८० ची मुरादाबाद दंगल, ८४ ची भिवंडी दंगल, ८७ ची मीरत दंगल, ८९ ची भागलपूर दंगल, ९४ ची हुबळी दंगल अशी जंत्रीच दिली आहे. खरे तर जातीय दंग्यांची ही यादी अशीच वाढवायची झाली तर २००२ ची गुजरात दंगल, २०१३ ची मुझफ्फरनगर दंगल, २०२० ची दिल्ली दंगल अशी वाढवता येईल. परंतु कोणता राजकीय पक्ष सत्तेवर होता आणि कोणता विरोधात होता याचा हिशेब न मांडता, मुळात अशा प्रकारच्या जातीय दंगली का उद्भवतात याचा विचार झाला पाहिजे. बहुतेक दंगली धार्मिक वा राजकीय कारणांखातर पेटवल्या जातात आणि त्याचा फायदा मात्र समाजकंटक उठवत असतात असेच आजवर दिसून आले आहे. यात बळी जातो तो सामान्य माणूस. सर्वसामान्य जनता, त्यांचे छोटे मोठे व्यवसाय यांची या दंग्यांमध्ये आहुती पडते. समाजकंटक तलवारी परजतात, दगडफेक करतात; रक्त सांडते ते मात्र निरपराधाचे. दंगल, अशांतता यातून निर्माण होणारी असुरक्षितता विकासाला बाधक ठरते ती वेगळीच. कोणताही गुंतवणूकदार अशा प्रकारच्या असुरक्षित वातावरणामध्ये आपली कोट्यवधींची गुंतवणूक करायला धजावणार नाही. त्यामुळे विकासाला मोठी खीळ अशा दंग्यांतून बसत असते. दंगलींमधून वैयक्तिक मालमत्तेचे मोठे नुकसान तर होत असतेच, परंतु त्यातून होणारे देशाचे आर्थिक नुकसान फार मोठे असते.
आपल्या देशामध्ये जातीय दंग्यांचे प्रमाण वाढताना दिसते आहे. धर्माधर्मांमधील अविश्वास वाढताना दिसत आहे. या विषयाला पडद्याआड न ढकलता त्यामागील कारणांचा तटस्थतेने शोध घेणे गरजेचे आहे. एखादी राष्ट्रद्रोही शक्ती हे दंगे भडकवते आहे का? त्यासाठी धार्मिक मुखवटा धारण करून राहिली आहे का याचाही शोध घेतला गेला पाहिजे. आपल्या गुप्तचर यंत्रणा अधिक सतर्क झाल्या पाहिजेत. कोणत्याही ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो याची पूर्वकल्पना आपल्या यंत्रणांना कशी येत नाही आणि त्यानुसार खबरदारीच्या उपाययोजना कशा घेतल्या जात नाहीत याचे खरोखर आश्चर्य वाटते. सणाउत्सवांच्या निमित्ताने एकमेकांची कुरापत काढून दंगे भडकावण्याचे हे लोण असेच पसरत राहिले तर या देशात राहणे कठीण होईल. त्यामुळे सर्व जातीधर्मांच्या सुबुद्ध नागरिकांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची जरूरी आहे. राजकीय पक्षांसाठी अशा प्रकारचे धार्मिक तणाव हे मतांच्या ध्रुवीकरणाचे भले साधन वाटत असेल, परंतु यातून देश दुभंगतो आहे याचे भान ठेवले गेले पाहिजे. देश जोडणारे स्वर दिवसेंदिवस क्षीण होत चालले आहेत हे खेदजनक आहे.