द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती

0
21

>> राष्ट्रपतीपदी विराजमान होणार्‍या पहिल्या आदिवासी महिला; मोठ्या मताधिक्याने विजय

राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी काल पार पडली. या निवडणुकीसाठी ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला होता. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात लढत होती. मात्र मुर्मू यांनी सिन्हा यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत ७१९ खासदारांसह देशभरातील ४०२५ अधिक आमदारांनी मतदान केले होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मुर्मू आघाडीवर होत्या. तिसर्‍या फेरीपर्यंत मुर्मू यांना वैध मतांपैकी ५० टक्के मते मिळाली.

राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत देशभरातील एकूण १७ खासदारांची मते फुटली. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केले. परिणामी मुर्मू शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्या आणि त्यांचा विजय झाला. मुर्मू यांच्या विजयानंतर भाजपने देशभर जल्लोष साजरा केला.
या विजयासह मुर्मू यांना देशाच्या दुसर्‍या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला आहे. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता.
द्रौपदी मुर्मू या २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. दरम्यान, देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी समाप्त होणार आहे.

पंतप्रधानांकडून मुर्मू यांना विजयाच्या शुभेच्छा

या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुर्मू यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच मुर्मू यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले. मुर्मू यांनी मंत्री आणि आमदार म्हणून चांगली कामगिरी केलेली आहे. झारखंडच्या राज्यपाल असताना देखील त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पडली होती. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतरही त्या देश विकासाच्या प्रवासात देशाचे नेतृत्व करतील, याचा मला विश्वास आहे, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

कोण आहेत द्रौपदी मुर्मू?

द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. झारखंडच्या राज्यपाल म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार्‍या त्या पहिल्या राज्यपाल आहेत. मुर्मू या ओडिसा राज्यातील आहेत. द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत, तर दुसर्‍या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.

नगरसेविका ते राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ मध्ये झाला. मुर्मू या ओदिशा जिल्ह्यातील मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्त्व करतात. सरकारी कार्यालयात त्या लेखनिक मधून कार्यरत होत्या. मुर्मू यांनी मोफत अध्यापनाचे काम केले. त्यानंतर त्या राजकारणात आल्या. द्रौपदी मुर्मू यांनी नगरसेविका म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. तसेच रायरंगपूरच्या उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. तसेच भाजपच्या उमेदवारीवर २००० आणि २००९ मध्ये आमदार म्हणून त्या निवडून आल्या.

गोव्यातून द्रौपदी मुर्मू यांना वाढीव मतदान

>> मुख्यमंत्र्यांचे भाकीत ठरले खरे

राष्ट्रपती निवडणुकीत गोव्यातून एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना वाढीव मतदान झाल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. मुर्मू यांना अपेक्षेपेक्षा ३ मते जास्त मिळाली. त्यामुळे विरोधी कॉँग्रेस पक्षाच्या आमदारांची ३ मते मुर्मू यांना मिळाली की अन्य कोणाची, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना २५ पेक्षा जास्त मते मिळतील, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यांचे हे वक्तव्य अखेर खरे ठरले. मुर्मू यांना भाजप व मित्रपक्षांच्या २५ आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. प्रत्यक्षात त्यांना २८ मते मिळाली.
कॉंग्रेसमधील ज्या गटाने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच गटातील आमदारांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल संपूर्ण गोमंतकीयांच्या वतीने आपण द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन करतो. देशासाठी हा ऐतिहासिक दिवस असून, आदिवासी समाजातून स्वकर्तृत्वावर पुढे आलेली एक महिला प्रथमच जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारणार आहे.

  • डॉ. प्रमोद सावंत,
    मुख्यमंत्री.