Home Featured दोन लाचखोर पोलिसांना अटक; एसीबीची मडगावात कारवाई

दोन लाचखोर पोलिसांना अटक; एसीबीची मडगावात कारवाई

0

मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर व हेड कॉन्स्टेबल मोहम्मद हुसेन या दोघांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी रात्री रंगेहाथ पकडले होते. त्याच्या केबिनमध्ये 25 हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. 2 लाखांची खंडणी आणि दरमहा 25 हजारांचा हप्ता अशी मागणी दोघांनी तक्रारदाराकडे केली होती.

बेळगाव येथील एका मटण व्यापाऱ्याला गोव्यात रेल्वेने मांस पुरवठा केल्याच्या खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकी देत त्याच्याकडे 2 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच रेल्वेने मांसाची वाहतूक करण्यासाठी दरमहा 25 हजार रुपये हप्त्याची मागणी सुनील गुडलर याने केली होती. त्यानंतर व्यापाऱ्याने तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल पैसे घेताना दोघांना पकडले.

गेल्या 30 मार्च रोजी गोवा एक्सप्रेस रेल्वेने मडगाव येथे आणलेला मांसाचा साठा पोलिसांनी जप्त केला होता. त्याचा तपास करताना रेल्वे पोलीस स्थानकावरील निरिक्षक सुनील गुडलर याने बेळगाव येथून मटण विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. मडगाव रेल्वे स्थानकात जप्त केलेले मांस त्यांचे असल्याचे सांगून आपणाकडे पुरावा असल्याची धमकी दिली. तुमच्याविरोधांत गुन्हा दाखल करावा लागेल. जर तसे नको असेल, तर 2 लाख रुपये द्यावे लागतील आणि बेकायदा मांस व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा 25 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली होती, असे सदर तक्रारदार व्यापाऱ्याने सांगितले.

कोणताही आपला गुन्हा नसताना पोलीस निरीक्षक सुनील गुडलर खंडणीची मागणी करतो, अशी तक्रार सदर व्यापाऱ्याने एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची खात्री करून नंतर कारवाई करण्यात आली. हेड कॉन्स्टेबल मोहम्मद हुसेन याने मोबाईलवरून व्यापाऱ्याशी संपर्क साधत 25 हजार रुपये रेल्वे पोलीस स्थानकात घेऊन येण्यास सांगितले. या दोघांमधील संवाद रेकॉर्ड करण्यात आला होता.

सुनील गुडलरला निलंबित करणार : मुख्यमंत्री

राज्यात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. भ्रष्टाचारविरोधी विभागाने लाच प्रकरणी अटक केलेल्या कोकण रेल्वे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर याला सेवेतून निलंबित केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. सुनील गुडलर याला यापूर्वी देखील गैरव्यवहार प्रकरणामध्ये निलंबित केले होते. त्यामुळे त्याची कसून चौकशी केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.