देशात कोरोना रुग्णांची संख्या १३ हजाराजवळ

0
147

>> ४२० रुग्णांचा मृत्यू तर १५१४ जणांना डिस्चार्ज

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १२ हजार ७५९ एवढी झाली आहे. १५१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत देशभरात कोरोनामुळे ४२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजण्यात येत असून याबाबत जागतिक आरोग्य संघटनेशीही चर्चा झाल्याचे  केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले. लॉकडाउनच्या ३ मेपर्यंतच्या कालावधीत उपाययोजनांसाठी आम्हाला अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने यावेळी सांगितले.

२४ तासांत २८ मृत्यू

दरम्यान, गेल्या २४ तासात २८ मृत्यूंची नोंद झाली आहे मात्र मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. गेल्या २४ तासात ८२६ कोरोना पॉझिटिव्ह देशात आढळले आहेत. त्यामुळे आता देशातली कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार ७५९ झाली आहे.

३२५ जिल्ह्यांत कोरोना नाही

देशभरातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही अशी माहिती केंद्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. देशाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. देशात १७० जिल्हे हॉटस्पॉट आहेत. तिथे कोरोनाचा प्रादु्र्‌भाव रोखण्यासाठी जे जे आवश्यक प्रयत्न आहेत ते करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत देशभरात २ लाख ९० हजार ४०१ लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत, अशीही माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली.

 

२४ रुग्णांमागे १ पॉझिटिव्ह

कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण तपासणी प्रक्रियेतून निसटू नये, असा आमचा प्रयत्न आहे. चाचणीसंदर्भात घालून दिलेल्या निकषांनुसार प्रत्येकाची चाचणी होत असल्याची आम्हाला खातरजमा करायची आहे. लक्षणे असलेल्या २४ रुग्णांपैकी केवळ १ रुग्ण जण पॉझिटिव्ह आढळत आहे. आम्ही आधीपासूनच उचललेल्या पावलांचे हे स्पष्ट संकेत आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने यावेळी दिली.

दरम्यान, चीनहून आलेल्या किट्‌स संदर्भात बोलताना मंत्रालयाने रॅपिड अँटीबॉडी टेस्ट निरीक्षणावर देखरेख ठेवण्यासाठी आहेत, त्या आजाराच्या निदानासाठी नाहीत. त्यामुळे, या चाचण्यांच्या किट्स दोषपूर्ण असण्याची चिंता नाही. त्यांचा संबंध रोगप्रतिकारशक्तीशी जोडला गेला होता असे स्पष्टीकरण दिले.

उन्हाळ्यात कोविड-१९ चा संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नसल्याचे यावेळी मंत्रालयाने स्पष्ट केले.