देशातील लोक राजकारण्यांपेक्षा शहाणे : पवार

0
4

>> इंदिरा गांधींच्या पराभवाचा दाखल देत अप्रत्यक्षरित्या भाजपला सुनावले

देशातील सामान्य माणूस राजकारण्यांपेक्षाही शहाणा आहे. 1975 ते 1977 या काळात लोकांनी शक्तिशाली इंदिरा गांधीचा पराभव केला. त्यानंतर राजीव गांधींचाही पराभव केला. संसदीय लोकशाही पद्धत दुबळी करणे हे आम्ही मान्य करणार नाही हेच तेव्हाच्या निकालातून लोकांनी सांगितले आणि सत्ताबदल केला, असे वक्तव्य करीत लोक काय करू शकतात याची आठवणच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला करुन दिली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित काल एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. आम्हा लोकांचा देशाच्या सामान्य माणसावर विश्वास आहे. आम्ही राजकारणी; पण आमच्यापेक्षा देशाचा सामान्य माणूस अधिक शहाणा आहे. आम्ही चुकीच्या मार्गावर गेलो, तर लोक शहापणाने रस्ता दाखवतात 1977 साली आपण हे पाहिले, असे पवार म्हणाले.

लोकांनी संसदीय लोकशाही महत्वाची असल्यामुळे ती दुबळी होत चालली हे लक्षात आल्यानंतर प्रचंड शक्तिशाली असलेल्या इंदिरा गांधी यांचा देखील पराभव केला. त्यानंतर ज्यांच्या हाती सत्ता दिली, त्यांनी 18 ते 19 महिन्यानंतर देश चालवण्याची जबाबदारी नीट पाडली नाही. त्यानंतरच्या काळात मोरारजी भाई आणि चरणसिंह यांच्यानंतर पुन्हा लोकांनीच इंदिरा गांधीच्या हाती लोकांनी सत्ता दिली. लोक शहाणपणाचे निर्णय घेतात, असेही पवार म्हणाले.

यावेळी पवारांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचा दाखला देखील दिला. कोणी कितीही बलाढ्य असला तरी जनतेने मनात आणले तर त्याचा पराभव निश्चित आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपने सर्व शक्ती वापरूनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. कर्नाटकच्या निकालाने हीच बाब अधोरेखित केली, असेही पवार म्हणाले.