25 C
Panjim
Saturday, September 26, 2020

देवत्वाच्या कुशीत विसावलेली मनाली

– सौ. पौर्णिमा केरकर

मनालीला आम्ही पोहोचलो तेव्हा दुपार झाली होती. चित्ताला आकर्षित करणार्‍या आणि निसर्गाविष्काराचे लोभस दर्शन घडविणार्‍या या प्रदेशाविषयी मनात एक उत्सुकता भरून राहिली होती. त्यामुळे दुपारी पोहोचलो तरीही मनालीचे मनोरम दृश्य पाहून थकवा कोठल्या कोठे पळून गेला. तसं पाहायला गेलो तर संपूर्ण हिमाचल प्रदेशाचा प्रवास जेवढा रोमांचकारी तेवढाच लोभस आणि मोहक. ऋतू-ऋतूंतील या राज्याचे बदलत जाणारे सृष्टिवैभव अगदी न्यारेच… अवर्णनीय असेच!

शिवालिक आणि धौलाधर यांच्या पर्वतशृंखला म्हणजे एकामागून एक सतत उलगडत जाणार्‍या डोंगररांगा. त्यांमधूनच नागमोडी वळणाचा उंचच उंच जाणारा रस्ता. एका बाजूला सरळसोट कडा तर दुसर्‍या बाजूला खोल दरी. सरळसोट उंचच उंच देवदार वृक्ष, अधूनमधून डोकावणारी घरे, डोंगररांगांत कडेकपारीत शांतपणे विसावलेली गावे, तेथील माणसांना ये-जा करण्यासाठी निसर्गनिर्मित पाऊलवाटा. लांबून बघताना दाट हिरवाईत पांढर्‍या रंगाच्या वळणावळणाच्या चढउतारांच्या या पाऊलवाटा अनोख्याच भासतात.
‘मनाली’ हे नावच मोठं देखणं व नाजूक असं. हिमाचल प्रदेश ही दर्‍याखोर्‍यांची भूमी. काश्मीर हे तर आपल्या देशाचे भूनंदनवन. खूप जणांना वाटते की, जन्माला येऊन जर काश्मीरच्या रूपाने धरतीवरचा स्वर्ग आम्ही अनुभवला नाही तर जीवन व्यर्थ! पण तेथील अतिरेकी, दहशतवाद्यांची भीती मनात नेहमीच दाटलेली असते म्हणून काही वेळा ही इच्छा दबूनच राहते. मध्यंतरी तर दहशतवाद्यांच्या सावटाची भीती इतकी गडद झाली होती की हे अलौकिक सौंदर्य शापितच राहणार का? असा मनाला प्रश्‍न पडायचा. या अशा स्थितीमुळे काश्मीरचे दरवाजे पर्यटकांसाठी हळूहळू बंद होऊ लागल्यावर ‘कुलू- मनाली’ हे भारताचे पर्यायी नंदनवन म्हणून नावारूपास येऊ लागले. हिमाचल प्रदेश हे राज्यच मुळी प्रसन्न, विलोभनीय. निसर्गसौंदर्याच्या अनुपम आविष्काराचे मोठे देणे विधात्याने जणू काही या प्रदेशालाच बहाल केले आहे. देवभूमी हिमाचलचे हे आकर्षण म्हणूनच सतत ओढ लावणारे आहे.
मनाली पर्यटकांना जसे भुरळ घालणारे आहे, तसेच इतिहास संशोधकांना, गिर्यारोहकांना, प्रेमीयुगुलांना, संस्कृतीप्रेमींना तेवढ्यात आत्मीयतेने आपल्याकडे खेचून घेणारे आहे. दिल्लीपर्यंत रेल्वेचा प्रवास. त्यानंतर बसने पुढे मनालीपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात बियास नदीची खळखळणारी नादमयता येता-जाता आपल्या सोबतीला असतेच. विमानाने प्रवास केला तर सरळ कुलूला जाता येते. पुढे सारा पहाडी मार्ग. त्यामुळे बस, टॅक्सी किंवा सुमोसारख्या वाहनाशिवाय पर्यायच नाही. तनामनाला खुणावणार्‍या राखाडी रुपेरी कडांच्या, पांढर्‍याशुभ्र चकाकणार्‍या बर्फाच्या पर्वतरांगा मनालीला जाताना पहिल्यांदाच नजरेच्या टप्प्यात आल्या होत्या. त्यावेळचा आनंद मनात न मावणारा होता. मनालीला जाण्याचा माझा विचार हा फक्त पर्यटनापुरता मर्यादित नव्हता तर तेथील पर्वतरांगांतील ‘देवटिब्बा’ या पॉईंटवरती ‘इकोट्रेक’च्या सोबतीने चढण्यासाठीच पहिल्या प्रथम मनालीचा विचार करण्यात आला. आमच्या ग्रुपमध्ये असलेले सर्वच सहप्रवासी अतिशय उत्साही आणि एकमेकांना सहकार्य करणारे असल्याने प्रवास सुखकर झाला. त्यामुळेच प्रवासात मध्ये-मध्ये बस थांबवून निसर्गसौंदर्याचा यथेच्छ आनंद आम्ही लुटला.
बर्फाळ प्रदेशातील हा तसा पहिलाच प्रवास असल्याने गारव्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गरम लोकरीचे कपडे कोणाकोणाच्या सांगण्यावरून घेतल्याने साहजिकच बॅगेचे वजन वाढले. पण त्याला काही पर्याय नव्हता. मे महिना हा मनालीला पर्यटनासाठी जाण्याचा योग्य कालखंड. फेब्रुवारीमध्ये तर मोठ्या प्रमाणात बर्फ असल्याने या परिसरात बर्फमहोत्सव साजरा केला जातो. नितळ, शांत, प्रसन्न सकाळ अनुभवायची तर मनाली हेच योग्य ठिकाण. सिक्कीमचा ‘शांगू लेक,’ ‘दार्जिलिंग’ यांसारखे थंड-बर्फाळ प्रदेश अनुभवले तरी त्या परिसरात एक गडद दाटलेपण जाणवले. त्यामुळे मनाला हवी तशी प्रसन्नता लाभली नाही. रुपेरी कडांचे बर्फाच्छादित डोंगर हे याही प्रदेशाला लाभले होते, पण तरीसुद्धा मनालीची प्रांजळ प्रसन्नता खूप वेगळी वाटली. ऋषिमुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मनालीच्या डोंगरकपारी म्हणजे या देवांचे खोरे (व्हॅली ऑफ गॉड) असेच संबोधले जाते.
या प्रदेशाचे एक बरे आहे. येथली प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आपण ज्या हॉटेलमध्ये उतरतो त्यापासून फार लांबचा प्रवास करण्याची गरज नाही. कुठल्याही ठिकाणी जरी निवास असला तरी बुद्धिष्ट मॉनेस्ट्री व त्या पार्श्‍वभूमीवर उभे असलेले सरळसोट देवदार वृक्षांनी सजलेले हिरवेगार डोंगर, उंचच उंच एकमेकांत गुंतलेले राखाडी रंगाचे, वरती पांढरी बर्फाची टोपी मिरविणारे डोंगर. ऊन-पाऊस-थंडी यांचा लपाछपीचा खेळ तर या प्रदेशाची खास ओळखच झालेला आहे. त्यामुळे मधूनच सूर्याची किरणे डोकावली की अंगात घातलेले गरम कपडे काढून ठेवण्यासाठी आपण पुढे सरसावतो, तोच थंडीची एक हलकी लाट आपल्या अंगावर शहारे आणते. असे होत असतानाच अचानक पावसाची रिमझिम सुरू होते… त्यामुळे अंगावर भरगच्च कपडे घालून मिरविणे हाच फक्त पर्याय ठरतो. पर्यटक म्हणून या सार्‍या गोष्टी आपल्याला अडचणीच्या ठरत असल्या तरी पहाडी प्रदेशातील लोकमानसाची ती जीवनशैली बनलेली आहे. सपाट परिसरच नसल्याने डोंगरचढतीवरच वेगवेगळ्या टप्प्यांवर गावं वसवलेली दिसतात. त्यामुळे दरदिवशी येथील लोकांना चढ-उतार केल्याशिवाय पर्यायच उरत नाही. येथील लोकमानसाच्या लवचीक, काटक, कणखर देहयष्टीचे गमक त्यांच्या दैनंदिन जीवनव्यवहाराशीच निगडीत आहे. देवदेवतांचा निवास असलेल्या मनालीची ओढ आणि तिचं पावित्र्य तेथील प्रेक्षणीय स्थळांमुळे ठळकपणे आठवत राहते.
कोणे एके काळी म्हणे पुरात बुडून गेलेल्या या विश्‍वाला पुन्हा नव्याने वसवले होते ते मनूने. या मनूच्या नावावरूनच या स्थळाला नाव मिळाले ते ‘मनाली.’ या प्रसंगाची स्मृती जागविणारे ‘मनुमंदिर’ ही मनालीची खास ओळख म्हणता येईल. मनुस्मृतीच्या माध्यमातून असंख्य जाचक बंधने स्त्रियांवरती लादली गेलेल्या मनूचे मंदिर पाहताना हे विचार डोळ्यांसमोर फेर धरू लागले. वसिष्ठमुनींच्या नावानेच वसिष्ठ गाव वसलेला. या गावाचे महत्त्व तेथे असलेल्या नैसर्गिक गंधकयुक्त दोन गरम पाण्याच्या कुंडांमुळे वाढलेले आहे. वाफाळलेल्या पाण्याची ही कुंडे औषधी म्हणून प्रसिद्ध असून अनेक प्रकारचे चर्मरोग बरे होतात असे सांगितले जाते. त्यामुळे हजारोंच्या संख्येने माणसे येथे खास आंघोळ करण्यासाठी येतात. एक कुंड पुरुषांसाठी, तर दुसरे स्त्रियांसाठी राखीव आहे. या दोन्ही ठिकाणी नेहमीच गर्दी दिसते. अतिथंड, बर्फाळ प्रदेशातील नैसर्गिक गरम पाण्याची कुंडे हा तर एक चमत्कारच मानावा लागेल. परंतु आपण एवढे कपाळकरंटे की हे अद्भुत लावण्य, हा वारसा येणार्‍या पिढीसाठी राखून न ठेवता मागचा-पुढचा काहीही विचार न करता अस्वच्छच करून टाकतो. इथेही नेमके तेच घडताना दिसते. निसर्ग आपल्याला भरभरून देतो खरे, परंतु त्याचा आस्वाद कसा नि किती घ्यायचा याबाबत आपण आजपर्यंत अज्ञानीच राहिलेलो आहोत असेच खेदाने म्हणावे लागते.
वसिष्ठ कुंडापासून जवळच राममंदिर आहे. रामायणाची स्मृती जागवणाराच हा परिसर. नितांत रमणीय वातावरण असल्याने ऋषीमुनींनी ही जागा ध्यानधारणेसाठी निवडली असावी. इथल्या उत्तुंग गिरिशिखरांत व अथांग दर्‍याखोर्‍यांत त्यांना चिरंतनत्वाचा साक्षात्कार घडला. घनदाट जंगल इथे असल्याने प्राचीन काळात राक्षस कुळातील लोक शिकार करायचे. कालांतराने पशुपालक समाज इथे स्थिरावला. त्याने शेती विकसित केली व जगण्याला स्थैर्य आलेे असे एकंदरीत रचनेवरून जाणवते. भीमपत्नी ‘हिडींबा’चे मंदिर हे या परिसराचे आणखी एक वेगळेपण म्हणावे लागेल. मनालीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले हे हिंडींबा मंदिर पर्यटकांचे हिलस्टेशनच झालेले आहे. मंदिर बांधायचे ते एखाद्या सालस, सोज्वळ, अतिसुंदर अशा लावण्यमयी देवीचे; परंतु एवढ्या सुंदर प्रदेशात मंदिर बांधले तरी कोणाचे तर एका राक्षसी कुळात जन्मलेल्या हिडींबेचे! तिला ना रूप ना समाज. त्यामागेसुद्धा एक कथा सांगितली जाते. विजनवासात असताना फिरत फिरत पांडव मनालीला पोहोचले. तिथे हिडींबेचा भाऊ हिडींब याने त्यांच्याशी युद्ध छेडले. त्यात तो भीमाच्या हातून मारला गेला. हिडींबा भीमाच्या शौर्यावर भाळली. त्याच्याशी तिने लग्न केले. त्यानंतर घटोत्कच जन्माला आला. त्याचीही स्मृती जागवणारे स्थळ तेथे जवळच आहे. विजनवास संपल्यानंतर पांडव स्वगृही परतले, परंतु हिडींबा त्यांच्याबरोबर आली नाही. तिने तिथेच घोर तपश्‍चर्या केली. त्यातून तिला देवत्व प्राप्त झाले. ‘हिडींबा मंदिर’ हे त्याचेच प्रतीक. या मंदिराची रचनाच एवढी देखणी आहे की पाहात राहावे. सरळसोट उंचच उंच महाकाय वृक्ष, वर्षभर पडणारा पाऊस, ऋतुपरत्वे असलेला बर्फ, तरीही चार टप्प्यांतील पूर्ण लाकडी छप्पर आजही अबाधित आहे. बुनियाद दगडी, मातीचा लेप असलेली. त्यानंतरची रचना लाकडाची. वरचा कळसरूपी टोकदार भाग ‘पितळ’ धातूची रचना असलेला. आत दगडी मूर्ती, पावलांचे ठसे. समोर एक दोरखंड पापी माणसांना जखडून ठेवण्यासाठी. मुख्य दरवाजावर दुर्गामाता कोरीवकामातून अभिव्यक्त होते. एवढ्या दुर्गम भागात स्थित असलेले हे मंदिर पर्यटकांना, इतिहास संशोधकांना, अभ्यासकांना थक्क करून सोडते. या मंदिराचा परिसर बघितल्यानंतर ‘रोझा’ चित्रपट आठवला. या चित्रपटातील काही भागांचे चित्रीकरण इथेच झालेले आहे.
मनालीच्या भटकंतीत आणखी काही ठिकाणे भावली. स्मरणात राहिली ती म्हणजे रोहतांगपास, सोलंग व्हॅली, नेहरू कुंड, स्लब हाऊस, बुद्ध मंदिर, हिमालयन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, बाजारापासून जवळच असलेलं राखीव जंगल. रोहतांगपास हा उंचीवरचा बर्फाळ डोंगर. येथे वैविध्यपूर्ण खेळ करून मजा लुटता येते खरी पण त्यासाठी आपल्याला मनाची तयारी करावी लागते. मग शरीर तो गारठा सहन करण्यासाठी सहज तयार होते. येथूनच पुढे लेह-लडाखचे अनोखे विश्‍व उलगडविण्यासाठीचा रस्ता जातो. पर्यटकांचे फार मोठे आकर्षण असलेले ‘रोहतांगपास’ ठिकाण अनुभवले. अगदी सकाळच्या प्रहरी उठूनच हा प्रवास करावा लागतो, अन्यथा आपण ट्रॅफिकमध्येच अडकतो. घोड्यावरूनसुद्धा प्रवास करता येतो. हा प्रवास जोखमीचा असला तरी आनंददायी आहे. सोलंग व्हॅलीतून उलगडत गेले ते अनोखे निसर्गलावण्य. ‘रोप-वे’चा वापर त्याच्यासाठी करावा लागतो. रिव्हर राफ्टींग, रिव्हर क्रॉसिंगचा थरार मनालीत ठिकठिकाणी अनुभवता येतो. मनालीची घरे ठेंगणी. आपण पाटीवर अक्षरे गिरवतो तशा स्लेट्‌सचा वापर करून घराची छप्परे तयार झालेली आहेत; जेणेकरून बर्फ पडला की तो सरळ घरंगळत खाली यायला हवा. घराघरांतील अंगणात गुलांबाचे ताटवे अगदी ताजे टवटवीत होते. आम्ही कितीही मेहनत केली तरी असे गुलाब फुलणेच मुश्किल. ते असंख्य रंग, झुपके डोळे भरून पाहून घेतले तरीही मन भरलेच नाही. येथे ठिकठिकाणी रस्त्यावर भटके कुत्रे दिसले तेही लांब केसांचे. सुंदर सहजपणाने त्यांना उचलून आणावे असेच. चित्रातल्यासारखी आखीव-रेखीव घरे. दारादारातील परसबागेत, डोंगरउतारावर असलेली आताच कोठे फळे तयार होत असलेली सफरचंदांची झाडे, बागा. लालचुटूक सफरचंदे असलेली झाडे पाहायची असतील तर जुलै-ऑगस्ट हाच सिझन आहे. चेरी, स्टॉबेरी, फ्लमस् या फळांचा पोटभरून आस्वाद घेतला. प्रत्यक्ष झाडावरील चेरी काढून खातानाचा व अशी लालचुटूक छोटी छोटी चेरी लगलेल्या झाडांना बघतानाचा आनंद हा शब्दातीत होता. नाही म्हटले तरी मनालीने मनाला पुरती भुरळ घातली होती. व्यासमुनींच्या नावाने खळाळत राहाणारी, कधी रौद्रभीषण रूप दाखवणारी तर कधी धीरगांभीर्याने अविचल वाहणारी बियास-ब्यास नदी मनालीच्या येता-जातानाच्या प्रवासात सोबतीला असतेच. याच नदीच्या काठावर वसलेली संस्कृती इतिहासाचा वारसा आज मिरविताना दिसते. या भूमीला पावित्र्याचा स्पर्श झालेला आहे. ऋषिमुनींच्या तपःसाधनेने ती तेजःपुंज बनलेली आहे. मंत्रोच्चाराचे सामर्थ्य इथल्या दर्‍याखोर्‍यांत गुंजताना ऐकू येत आहे. मनालीचे सौंदर्य आकंठ प्राशून घेताना आपण तनामनाने नितळ, पारदर्शी होत जातो.

STAY CONNECTED

844FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

विदारक साटेलोटे

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...

ड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी

>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...

प्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन

प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...

२५ हजारांवर कोरोनामुक्त

>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...

पणजी परिसरात नवे २२ रुग्ण

पणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...

ALSO IN THIS SECTION

ड्रग्जप्रकरणी आज दीपिकाची चौकशी

>> एनसीबीचा दीपिका ड्रग्ज ग्रुप ऍडमिन असल्याचा संशय अभिनेता सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावलेल्या अभिनेत्री...

प्रसिद्ध पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांचे निधन

प्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम (७४) यांचे काल निधन झाले.बालसुब्रह्मण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी त्यांना...

२५ हजारांवर कोरोनामुक्त

>> काल ७२४ बरे, ३ मृत्यू, ५१९ पॉझिटिव्ह राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह ७२४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत...

पणजी परिसरात नवे २२ रुग्ण

पणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे २२ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची संख्या ३४० एवढी झाली आहे. सांतइनेज, मिरामार, कांपाल, सांतइनेज बांध, आल्तिनो,...

केंद्र सरकारकडून कदंबला १०० इलेक्ट्रिक बसगाड्या

>> प्रकाश जावडेकर यांची माहिती केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत गोवा राज्य कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला १०० इलेक्ट्रिक ई बसगाड्या...