दृष्टिकोनाचा मंगलस्रोत

0
7
  • डॉ. सीताकांत घाणेकर

विश्वाकडे चौफेर नजर फिरवली तर आपल्याला वेगवेगळी दृश्ये, घटना दिसतात. काही चांगल्या, तर काही वाईट; काही प्रेरणादायक, तर काही भयानक; काही सकारात्मक, तर काही नकारात्मक. प्रत्येकजण स्वतःच्या ज्ञानाप्रमाणे आपले मत बनवतो; त्यामुळे मतेदेखील विविध असतात. कारण शेवटी ‘व्यक्ती तितक्या प्रकृती!’
एक गट मानतो- हे कलियुग आहे, त्यामुळे असे घडणे साहजिकच आहे. आपण सामान्य मानव- परिस्थितीचा गुलाम- पराधीन आहे पुत्र मानवाचा! वास्तविक हा नकारात्मक दृष्टिकोन आहे.
दुसरा गट मानतो- हे विश्व व त्यातील अनेक घटना हे एक नाटक आहे. जसे शेक्सपियरने म्हटले आहे तसे. आपण या नाटकातील पात्रे आहोत. आध्यात्मिक ज्ञानाप्रमाणेदेखील हे ठीक आहे. प्रत्येकाच्या संचित-प्रारब्धाप्रमाणे त्याला तो-तो ‘रोल’ प्राप्त होतो आणि प्रत्येकाने तो तसा वठवावाच लागतो. पण हादेखील थोडा नकारात्मकच दृष्टिकोन आहे.

तिसरा गट म्हणतो- हे कलियुग अवश्य आहे, पण आम्हीच त्याला जबाबदार आहोत. कारण आपले ज्ञान उचित नाही. त्यामुळे विचार-बोल-कर्म ठीक नाही. म्हणून आपण विविध तऱ्हेचा कचरा सृष्टीत टाकतो. त्यामुळे घाण व प्रदूषण होणारच.
आपण इतरांना दोष देतो. जसे की, कचरा घेऊन जाणाऱ्याला आपण ‘कचरावाला’ म्हणतो. खरे म्हणजे आपणच कचरेवाले आहोत. तो साधा मानव; पण तो ‘सफाईवाला’ आहे.

त्यामुळे अनेक ज्ञानी पुरुष या विषयाचा अभ्यास करतात, मनन-चिंतन करतात, त्यावर उपाय काढतात आणि इतरांना कथन करतात. पण त्याआधी ते स्वतः आचरणात आणतात. हेच आताचे काही विद्वान, सत्पुरुष, महापुरुष, संतपुरुष.
सुख-दुःख, यश-अपयश, चांगले-वाईट, पवित्र-अपवित्र… हे सर्व प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. आजच्या शिक्षणात सर्व तऱ्हेचे ‘कोन’ शिकवले जातात. त्रिकोण, चौकोन, षट्कोन, अष्टकोन वगैरे. हे तर पाहिजेतच; पण एक कोन शिकवला जात नाही तो म्हणजे ‘दृष्टिकोन!’ अध्यात्मविद्येत या ‘दृष्टिकोना’ला सर्वात अधिक महत्त्व देतात. त्यामुळे योगशास्त्रात इतर पैलूंबरोबर ‘यम-नियम’ या अष्टांगयोगातील पहिल्या दोन अंगांवर जास्त भर द्यायला सांगतात.

यम ः व्यक्ती आणि समाजासाठी सद्वर्तनाचे आदेश. अहिंसा- सत्य- अस्तेय- ब्रह्मचर्य- अपरिग्रह. नियम ः आत्मशुद्धीसाठी आत्मशासनाचे आदेश. शौच- संतोष- तप- स्वाध्याय- ईश्वरप्रणिधान. तद्नंतर इतर अंगे- आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी.
दुर्दैवाने बहुतेकजण या मुख्य अंगांवर ध्यान देत नाहीत, अभ्यास करत नाहीत. खरे म्हणजे यम-नियम हे नैतिकतेचे शिक्षण आहे. त्यांचे कटाक्षाने पालन केले तर आपले व विश्वाचे जीवनच बदलून जाईल. सगळीकडे सदाचार-आनंद-शांती नांदेल.
वैश्विक योगदिन- 21 जून- या दिवसाचे सुरुवातीचे ब्रीदवाक्य होते- ‘सहयोग व शांतीसाठी योग.’ तद्नंतर दरवर्षी ते बदलत आले.

आरोग्यासाठी योग- मानवतेसाठी योग
विचार छान आहे. विश्वाला याची अत्यंत जरूरी आहे. पण तसे दृश्य सहसा दिसत नाही- व्यक्तीत, कुटुंबात, समाजात, विश्वात. कारण आपण मुख्य तत्त्वज्ञानावर ध्यान देत नाही. त्यामुळे बीज अशुद्ध, अशक्त राहते. मग वृक्षदेखील तसाच होणार. म्हणून पूर्वजांनी नैतिकता, शुभसंस्कार यांना जास्त महत्त्व दिले.

स्वामी विवेकानंद योगसाधनेबद्दल अत्यंत उपयुक्त विचार सांगतात-
‘तत्त्वज्ञानाशिवाय योगसाधनेला मूळ नाही, योगसाधनेशिवाय तत्त्वज्ञानाला फळ नाही.’
चांगले फळ यायला हवे तर आधी बी व नंतर वृक्षाला चांगले मूळ आवश्यक असते. स्वामीजी पुढे म्हणतात की, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, अष्टांगयोग- हे चारही मार्ग अत्यावश्यक आहेत व अष्टांगयोगातील यम-नियम अत्यंत उपयुक्त आहेत. त्याशिवाय जीवनविकास नाही, जीवनमुक्ती नाही.

आज जगात प्रत्येकाला समस्या आहेत. त्यामुळे सर्वांची- सामान्यांची, श्रीमंतांची, विद्वानांची द्विधावस्था होताना दिसते. प्रत्येक ठिकाणी दर घटनेच्या वेळी विविध मते असतात.

  • कुटुंबात पालक-मुले यांच्यात एकमत अनेक विषयांवर नसते. उदा. कुठले शिक्षण- कुठला विभाग, ज्यामुळे चांगली नोकरी मिळेल, व्यवसाय चांगला चालेल. घरदार, संसार सुखात चालेल?
  • पती-पत्नी यांच्यामध्ये तर अनेक विषय आहेत. मुले व्हावीत की नाही, किती असावी, पुत्र की कन्या, केव्हा व्हावीत- लग्नानंतर लगेच की संसार थोडा स्थिरस्थावर झाल्यावर. तद्नंतर त्यांचे शिक्षण- गावात की बाहेर- भारतात की परदेशात?
  • सासू- सून यांच्यामध्ये एकमत असणे म्हणजे तसे कठीणच. याची कारणे अनेक आहेत. पण मुख्य म्हणजे त्यांच्या माहेरचे संस्कार. त्यालाच भर म्हणून मागील अनेक जन्मांचे संस्कार.

या अनेक समस्यांमागे, मतभेदांमागे बहुतकरून आपण म्हणतो- पिढ्यान्‌‍पिढ्यांचे वैचारिक अंतर. थोड्या अंशी खरे आहे. ते असणारच. म्हणून त्याला उपाय म्हणजे एकमेकांशी चर्चा व विचारविनिमय करून जास्तीत जास्त सर्वसंमत असा मधला रस्ता शोधणे. त्यामुळे कुटुंबात समन्वय राहतो. सुख-समाधान नांदते.
प्रख्यात तत्त्ववेत्ता खलिल जिब्रान यासंदर्भात पालकांना सांगतात- ‘आपण सर्व पालक लक्षात ठेवा की तुमची मुले तुमची निजी संपत्ती नाही. ती तुमच्या माध्यमातून या जगात अवश्य आली; परंतु तुमचे आणि त्यांचे विचार एकच असायला हवेत असा आग्रह धरू नका. त्यांचे विचार भविष्यकाळातले असतील. त्याप्रमाणे सृष्टिकर्त्याने त्यांना तशी बुद्धीदेखील दिली आहे. म्हणून आपले मागील पिढीतील विचार त्यांच्यावर लादू नका. त्यांच्या भवितव्यासाठी त्या शक्तीचा वेगळाच प्लॅन असेल. त्यांना संपूर्ण समजून घ्या. चांगले संस्कार अवश्य द्या.’
खरेच किती तथ्य आहे या विचारात. पालकांनी व कुटुंबातील ज्येष्ठांनी मुलांना सत्य-असत्य, धर्म-अधर्म, चांगले-वाईट अवश्य समजून सांगावे. स्वतःचे कितीतरी दशकांचे विविध अनुभव त्यांना सांगावेत. नकारात्मकतेतून दूर नेऊन त्यांना सकारात्मकतेकडे वळवावे. नवी पिढी तशी समर्थ आहे. त्यांच्या अनेक प्रागतिक कल्पना असतील. चांगल्या कल्पनांना प्रोत्साहन देणे हेच पालकाचे उत्तम कर्तव्य आहे.
आयुष्यात लहान-मोठ्या चुका सगळेच करतात. स्वतःची चूक झाली तर लगेच क्षमा मागावी आणि इतरांची चूक झाली तर माफी करावी. पुष्कळवेळा सहज घडणारी कुटुंबातील घटना… सर्वजण हॉलमध्ये कार्यक्रम बघत असतात. त्याचवेळी स्वयंपाकघरातून काचेचे भांडे पडल्याचा आवाज येतो. बाहेर बसलेल्या व्यक्ती विचारतात- ‘कुणी टाकले भांडे?’ आणि तीच व्यक्ती आत असली तर अगदी उत्स्फूर्तपणे म्हणते- ‘माझ्याकडून भांडे पडले!’

बारीक विचार केला तर कळते- शेवटी क्रिया तीच- नकळत घडलेली. पण दृष्टिकोन वेगळा- ‘दुसऱ्याने पाडले’, ‘माझ्याकडून पडले.’
अध्यात्मशास्त्रामध्ये एक गोष्ट टाळायची असते, तो म्हणजे अहंकार, अभिमान (स्वतःचा). स्वमान अवश्य असावा, नाहीतर न्यूनगंड वाढेल; पण अहंकार नको. तसेच दुसऱ्याचा सन्मान म्हणजे परसन्मानदेखील आवश्यक आहे. शारीरिक पातळीवर जरी दोन व्यक्ती भिन्न असल्या तरी आध्यात्मिक पातळीवर एकच आहेत. संस्कार अवश्य वेगळे असतील.
हा दृष्टिकोन मनबुद्धीत वाढला तर प्रत्येकाला दुसऱ्याचे सद्गुण व सत्कर्म दिसेल. जसे चंद्राचे काळे डाग न बघता त्याचा पांढराशुभ्र प्रकाश दिसेल. कमळाचा चिखल न दिसता आकर्षक रंग दिसेल, सुगंध कळेल.
योगसाधकांचा असा दृष्टिकोन आहेच. तो त्यांनी इतरांना समजवावा. त्यातून एक सुंदर विश्व निर्माण होईल.
(संदर्भ ः खलील जिब्रान- ‘द फ्रोफेट’)