दीड वर्षीय मुलाच्या ‘मृतदेहा’मुळे खळबळ

0
11

मरड-म्हापसा येथे आग विझविताना म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांना काल सायंकाळी 5.30 च्या सुमारास एका दीड वर्षाच्या बालकाचा पुरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. या घटनेची माहिती म्हापसा शहरात पसरताच एक खळबळ उडाली.


पोलिसांकडून मिळालेल्या माहतीनुसार, ज्या मुलाचा मृतदेह सापडला आहे, तो मुलगा तापाने आजारी होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या परप्रांतीय पालकांनी तीन दिवसांपूर्वी मरड-म्हापसा येथे एका ठिकाणी खड्डा काढून त्याचा मृतदेह पुरला होता. सदर समाजात बालकांचे मृतदेह पुरण्याची प्रथा आहे. ज्या खड्ड्यात हा मृतदेह पुरला होता, तो खड्डा खूप खोल नव्हता. परिणामी मोकाट कुत्र्यांनी तो मृतदेह बाहेर काढला होता. काल संध्याकाळी याच ठिकाणी आग लागली होती, ती विझवण्यासाठी म्हापसा अग्निशमन दलाचे जवान गेले असता त्यांना अर्धवट स्थितीत पुरलेला मृतदेह निदर्शनास आला. त्यावर त्यांनी म्हापसा पोलिसांना यांची माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी, निरीक्षक परेश नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा केला. सध्या सदर मुलाचा मृतदेह बांबोळी येथील इस्पितळात ठेवण्यात आला आहे.