दावे – प्रतिदावे

0
12

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये पाकिस्तानातील लष्कर आणि हवाई दलाच्या अकरा तळांना भारतीय क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले अशी माहिती भारताच्या वतीने देण्यात आलेली असताना पाकिस्तानने मात्र आणखी आठ तळांना भारताने लक्ष्य केल्याची माहिती उघड केली आहे. पाकिस्तानचा एकंदर खोटारडेपणा लक्षात घेता आपल्याला झालेल्या नुकसानाची माहिती अशी आपणहून जगापुढे आणण्याची शक्यता कमी आहे. परंतु तरी देखील पाकिस्तान ज्या अर्थी आपल्या आणखी आठ तळांनाही भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान लक्ष्य केले होते असे स्वतःहून सांगतो आहे, त्या अर्थी त्यामागे निश्चित काही हेतू असेल. भारताने आपल्यावर आक्रमकपणे हल्ला करण्याची कशी आगळीक केली हे जगाला दाखवण्याचा हा प्रयास असू शकतो. परंतु पाकिस्तान देत असलेली माहिती खरी आहे असे मानले तर अठ्ठेचाळीस तासांत भारताला आपल्या पायांशी लोळण घ्यायला लावण्याची भाषा करणारा पाकिस्तान आठ तासांत कसा गडगडला आणि युद्धबंदीसाठी धावाधाव करू लागला त्याची साक्ष ह्यातून मिळेल. त्यामुळे पाकिस्तानने केलेला हा दावा खरा असो अथवा खोटा असो, दोन्ही बाजूंनी त्या देशाचे पितळच उघडे पडते आहे. पाकिस्तानने सांगितले त्याप्रमाणे भारताने जाहीरपणे सांगितलेल्या अकरा ठिकाणांव्यतिरिक्त पेशावर, झांग, हैदराबाद (सिंध), गुजरात (पंजाब), गुजरानवाला, बहावलनगर, अटक आणि चोर ह्या आठ ठिकाणांनाही भारताने लक्ष्य केलेले असेल, तर आपल्या हवाई दलाच्या पराक्रमाची ती यशोगाथा म्हणावी लागेल, कारण अटक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून सातशे किलोमीटरवर आणि पेशावर हजार किलोमीटरवर आहे. एकेकाळी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय सैन्यदलांनी लावलेले हे अटकेपार झेंडे निश्चित अभिमानास्पद म्हणावे लागतील. आपल्या सैन्यदलांच्या या पराक्रमाची गाथा गौरविण्याऐवजी आपल्याकडी अनेक नतद्रष्ट त्या भरपूर पुराव्यांनिशी जगासमोर मांडल्या गेलेल्या कारवाईतील त्रुटी शोधण्यासाठी भिंगे लावून बसलेले दिसत आहेत. आपली किती विमाने पडली असे विचारत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे एक सहकारी राना इहसान अफझल यांनी भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केले, तर चीन ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखेल अशी धमकी दिली होती. त्यावर काल आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वासर्मा यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ब्रह्मपुत्रेचा उगम जरी तिबेटमध्ये होत असला तरी तिच्या प्रवाहामध्ये जास्तीत जास्त भर ही ती भारतामध्ये प्रवेशल्यानंतरच पडत असते हे त्यांनी आकडेवारीनिशी सांगितले आहे. ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहातील जेमतेम तीस टक्के पाणी हे तिबेटमधून म्हणजेच चीनमधून वाहत येते. त्याचा बाकी प्रवाह हा ईशान्येतील भारतीय राज्यांमधून येणाऱ्या नद्यानाल्यांतून आणि तेथे पडणाऱ्या मोसमी पावसातूनच प्रवाहित होत असतो हे त्यांंनी दाखवून दिले आहे. तिबेटमध्ये अत्यंत तुरळक म्हणजे वर्षाकाठी जेमतेम चार ते बारा इंच पाऊस पडत असतो हे त्यामागचे कारण आहे. त्यामुळे त्या प्रवाहामध्ये भारतीय प्रदेशात पडणाऱ्या पावसाचे योगदान 86 टक्के असते असे ह्यासंबंधीच्या शास्त्रीय अभ्यासांतील आकडेवारी सांगते. अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मेघालय या राज्यांतून वाहून येणाऱ्या नद्यानाले ब्रह्मपुत्रेला येऊन मिळतात. लोहित, मानस, कोपिली आणि इतर नद्या ब्रह्मपुत्रेचा प्रवाह विस्तारतात. खासी, गारो, जैंतिया टेकड्यांवरून वाहून येणारे पाणीही त्यात मिळते. त्यामुळे उद्या चीनने जरी ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखले, तरी ब्रह्मपुत्रेचा प्रवाह थांबणार नाही हेच हिमंता बिस्वासर्मा यांच्या प्रतिपादनातून आणि ह्या विषयावर झालेल्या अभ्यासातून स्पष्ट होते. चीन तिबेटमध्ये बडे बडे जलऔष्णिक प्रकल्प उभारू पाहतो आहे. जगातील सर्वांत मोठ्या यारलुंग त्सांगपो धरणाची उभारणी चीन करतो आहे. त्याला भारताने आक्षेप घेतलेला आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने पश्चिमवाहिनी नद्यांचे प्रवाह रोखले तर चीन भारतात प्रवेशणाऱ्या ब्रह्मपुत्रेचा प्रवाह रोखून धरील ही कल्पना अद्याप तरी पाकिस्तानातूनच मांडली गेलेली आहे. चीनने त्याला आजवर पुष्टी दिलेली नाही. परंतु जरी चीनने असा आततायीपणा केला, तरी भारताची हानी होणार नाही, उलट आसाममध्ये निर्माण होणारी पूरस्थिती नियंत्रणात येईल असे बिस्वासर्मा म्हणत आहेत. अर्थात, ह्याच बिस्वासर्मांनी गेल्या जानेवारीत चीनच्या धरण प्रकल्पामुळे ईशान्य भारतात पाण्याअभावी कसा हाहाकार माजेल ह्याचे चित्र मांडले होते. त्यामुळे ह्या दाव्या प्रतिदाव्यांतील नेमके काय खरे ठरेल हे सांगणे ह्या घडीस तरी अवघड आहे. युद्धस्य कथा रम्यः म्हणून ह्या साऱ्या दाव्या – प्रतिदाव्यांची चिकित्सा करणेच शहाणपणाचे ठरेल.