दाम्पत्याकडून 30 जणांना 20 कोटी रुपयांना गंडा

0
6

शेअर्समध्ये पैसे गुंतवून भरपूर परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 30 लोकांना सुमारे 20 कोटी रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपाखाली गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने नुवे येथील मायरन रॉड्रिग्ज व त्याची पत्नी दीपाली परब यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

2011 ते 2022 या कालावधीत या दाम्पत्याने लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळले. पैसे शेअर बाजारमध्ये गुंतवून भरपूर परतावा मिळवून देण्याचे आमिष शेकडो लोकांना दाखवण्यात आले. आपण स्टॉक ब्रेकर व गुंतवणूक सल्लागार असल्याचे सांगून हे दाम्पत्य त्यांच्याकडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पैसे घेत असे. आतापर्यंत त्यांच्याविरुद्ध 30 जणांनी पोलिसांत तक्रार नोंदवलेली असली, तरी ह्या दाम्पत्याने अशा प्रकारे शेकडो लोकांना फसवले असल्याचा आरोप आहे.

या दाम्पत्याने आपणाला मूळ रक्कम आणि त्यावरील परतावाही दिला नसल्याचा आरोप करीत 30 जणांनी त्यांच्याविरूद्ध आर्थिक गुन्हा शाखेत तक्रार नोंदवली आहे. या 30 लोकांनी हे दाम्पत्य आम्हाला एकत्रित 20 कोटी 83 लाख 90 हजार एवढी रक्कम देणे असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी नावेली येथील एका ज्येष्ठ नागरिकानेही सदर जोडप्यावर त्यांनी आपणाला 36 लाख रुपयांना गंडवल्याचा आरोप केला होता. सदर ज्येष्ठ नागरिकानेही त्याच्याकडे शेअर बाजारात गुंतवण्यासाठी पैसे दिले होते.