दाबोळी भरारी पथकातील दोघा पोलिसांचे निलंबन

0
9

>> 16 लाख रुपये उकळल्याचे प्रकरण; अन्य चौघांना अटक व सुटका

लोकसभा निवडणुकीसाठी दाबोळी मतदारसंघात भरारी पथकात नेमणूक केलेल्या दोघा अधिकाऱ्यांनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून दोघा परप्रांतीय व्यावसायिकांकडून 16 लाख रुपये उकळल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला होता. या प्रकरणात त्या दोघांना दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले होते. त्यानंतर काल त्या पथकात समावेश असलेल्या हवालदार विनायक कळंगुटकर व आनंद नाईक या दोघा पोलिसांना निलंबित करण्यात आले. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.

दरम्यान, या प्रकरणात मुरगाव नगरपालिकेचा अभियंता अनिरुद्ध पवार आणि वीज खात्यातील कारकून नितेश नाईक यांच्यासह केशव कवणेकर व चंदन यादव यांना अटकही करण्यात आली होती. काल न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.
बुधवारी वेर्णा पोलिसांनी दाबोळी भरारी पथकतील अनिरुद्ध पवार व नितेश नाईक यांना अटक केली होती. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत त्या परप्रांतीय व्यावसायिकांकडून 16 लाख रुपयांची रक्कम जप्त केली होती. मात्र ही रक्कम सरकारी तिजोरीत जमाच केली नव्हती.

सविस्तर माहितीनुसार, उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांना या घटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांना उपरोक्त जप्तीबद्दल आयकर विभागाने फोन केला व जप्त केलेल्या पैशांचे काय झाले याची चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण घटनेची माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना दिली, त्यानंतर उभय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या एका बैठकीत तक्रारदार अशोक चौधरी व पवनकुमार वर्मा यांनी भरारी पथकातील दोघांनी 16 लाख रुपये रक्कम जप्त केल्याची माहिती दिली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.

एक निलंबित पोलीस 8 दिवसांपूर्वीच खात्यात रुजू
काल दाबोळी भरारी पथकात संरक्षणासाठी नियुक्त केलेल्या हवालदार विनायक कळंगुटकर व आनंद नाईक यांना निलंबित केले. त्या दोघांतील आनंद नाईक हा पोलीस कर्मचारी आठ दिवसांपूर्वीच पोलीस खात्यात नोकरीवर रुजू झाला होता. या प्रकरणी निलंबित केलेल्यांची एकूण संख्या आता चार झाली आहे.