दाबोळीत 6 विहिरींत चक्क पेट्रोल!

0
13

व्हडलेभाट-चिखली येथील प्रकार; चाचणीदरम्यान पाण्याने घेतला पेट

दाबोळी मतदारसंघातील व्हडलेभाट-चिखली (माटवे) येथील अंदाजे सहा विहिरींतील पाण्याला चक्क पेट्रोलचा वास येऊ लागला आहे. चिखली पंचायत क्षेत्रातील प्रभाग 2 मधील 6 पैकी एका विहिरीत पूर्णपणे पेट्रोलचा साठा जमला आहे. राज्य अग्निशमन दल व मुरगाव तालुका आपत्कालीन व्यवस्थापनाने त्याला दुजोरा दिला आहे.

घटनास्थळी इंडियन ऑयल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखल होत विहिरीच्या पाण्याची चाचणी केली. यावेळी अग्निशमन दलाने घेतलेल्या चाचणीदरम्यान विहिरीतील पाण्याला आग लागली. त्यामुळे या विहिरीत पेट्रोलच असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, यापूर्वी पाणीच असणाऱ्या विहिरीत आता पेट्रोल कसे, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

चिखली पंचायतीच्या प्रभाग 2 मधील व्हडले भाट (माटवे) येथील अंदाजे 6 विहिरींमध्ये पेट्रोलजन्य साठा जमल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. व्हडलेभाट येथील ज्येष्ठ नागरिक ज्योकिम सातांन फर्नांडिस यांच्या घरालगतच्या विहिरीत मोठ्या प्रमाणात पेट्रोल आढळले आहे. मुरगाव अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप बिचोलकर यांनी विहिरीतील पाणी काढून त्याची चाचणी घेतली असता विहिरीतील पाण्याला आग लागली. ज्योकिम यांच्या विहिरीत पूर्णपणे पेट्रोल जमा झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान व मुरगाव आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे अधिकारी जातीने लक्ष
घालत आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या चतुर्थीच्या दिवसांत सुध्दा येथील विहिरीच्या पाण्याला पेट्रोलचा वास येत होता. त्यामुळे येथील रहिवाशी विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करीत नव्हते. या परिसरात अंदाजे 6 पेक्षा जास्त वैयक्ति विहिरी आहेत. त्यातील काही विहिरींची चिखली पंचायतीत नोंद केली आहे.

ज्योकिम यांची विहीर त्याच्या घरांच्या बाजूला असून, त्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा साठा झाला आहे. सोमवारी झुआरीच्या इंडियन ऑयल कंपनीला चिखली येथील विहिरीत पेट्रोलचे घटक आढळले असल्याचे कळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ज्योकिम यांच्या विहिरीतील पाण्याचे नमुने गोळा केले.
मंगळवारी (दि .28) रोजी झुआरी इंडियन ऑयल कंपनी आपला अहवाल मुरगाव मामलेदार आणि आपत्कालीन व्यवस्थापन समितीला देणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून
प्राप्त झाली आहे.