दाबोळीतील चोरी प्रकरणी चौघांना उत्तरप्रदेशात अटक

0
16

गेल्या महिन्यात दाबोळी-जयरामनगर येथील राजू गुप्ता यांच्या निवासस्थानी रोख रक्कम व दागिने मिळून लाखो रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणी तक्रार दाखल होताच वास्को पोलिसांनी शोधकार्य सुरू ठेवले होते. अखेर बैज्जोई संभल येथे उत्तर प्रदेश पोलिसांनी अन्य एका चोरी प्रकरणात चौघांना ताब्यात घेताच त्यांनी गोव्यात चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर वास्को पोलिसांनी मुद्देमालासह चौघा चोरट्यांना अटक करून गोव्यात आणले.

राजू गुप्ता यांच्या घरात 15 जानेवारीला चोरट्यांनी रोख व दागिने लंपास केले होते. त्यांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. वास्कोचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांना उत्तर प्रदेश बैज्जोई येथे अन्य एका प्रकरणात पकडलेल्या चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम गोव्यात कबुली दिल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर वास्को पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार संतोष भाटकर, दामोदर मयेकर, रोहन बिट्ये व इतरांनी उत्तर प्रदेशला जाऊन चोरट्यांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख व दागिने मिळून 12 लाख रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला. ही टोळी उत्तरप्रदेश मध्ये अनेक मोठ्या गुन्ह्यात सहभागी आहे. या प्रकरणी मूळ उत्तरप्रदेश येथील जितेंद्र नेताराम बेडिया (30), विजय मोहनलाल (20), उमेश मोहनलाल (20), रोहित देवसिंग (19) यांना अटक केली आहे.