जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफचे जवान एका चेकपोस्टजवळ तपासणी करत होते. त्याच दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील गोंगू क्रॉसिंगजवळ रविवारी दुपारच्या सुमारास पोलीस आणि सीआरपीएफकडून संयुक्तपणे वाहनांची तपासणी सुरू होती. या दरम्यान, दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे एएसआय यांनी प्राणांचे बलिदान दिले.