‘दम लागणे’ का ‘दमा’?

0
55
 • डॉ. मनाली महेश पवार

मे महिन्यातील पहिला मंगळवार हा ‘जागतिक दमा दिवस’ म्हणून सर्वत्र पाळला जातो. दम्याविषयी जनजागृती करणे हे या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. दमा हा विकार नसून एक प्रवृत्ती आहे. हा दमा विकार चिवट जरी असला तरी त्यावर आपण यशस्वीरीत्या मात करू शकतो.

मे महिन्यातील पहिला मंगळवार हा ‘जागतिक दमा दिवस’ म्हणून सर्वत्र पाळला जातो. दम्याविषयी जनजागृती करणे हे या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. दमा हा विकार चिवट जरी असला तरी त्यावर आपण यशस्वीरीत्या मात करू शकतो.
दमा हा विकार नसून एक प्रवृत्ती आहे. आजही समाजामध्ये दम्याविषयी खूप गैरसमज आहेत. धाप म्हणजे दमा हा एक मोठा गैरसमज समाजामध्ये रुजू आहे. धाप लागली किंवा दम लागला की तो दमाच आहे असे समजून चालणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे एखाद्या माणसाने ‘आपल्याला दम लागतो’ असे कुणाला सांगितले तर प्रत्येकजण ‘तुला दम्याचाच आजार आहे’ असे विधान करून मोकळे होतो. ‘माझ्या शेजाऱ्याला असाच त्रास होतो’ किंवा ‘माझ्या अमुक-अमुक नातेवाइकालाही असाच त्रास आहे’ अशाप्रकारची अनेक उदाहरणे देऊन त्रास होणाऱ्या व्यक्तीच्या मनावर ‘दमा’ बिंबवतात. तोही मग आपल्याला ‘दमा’ आहे हे मान्य करतो व डॉक्टरांना स्वतःच निदान करून औषधोपचार करायला सांगतो.
खरे तर दमा या आजारात ‘धाप’ किंवा ‘दम’ लागत असला तरी दम लागणे, धाप लागणे म्हणजे दमा हा आजार नव्हे, हे येथे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. दम लागणे हे दमा विकारातील एक लक्षण आहे व हे दम लागणे हे लक्षण पाण्डू रोगातही दिसते व हृदयरोगातही दिसते किंवा कडनी विकारातही दिसू शकते. म्हणून एखाद्याला दम लागत असेल तर डॉक्टरांकडे जाण्याचा योग्य सल्ला द्यावा.
दमा या आजारामध्ये श्वसननलिका अरुंद होतात, आकुंचन पावतात. हे अरुंद होणे किंवा आकुंचन पावणे हे काही कालावधीसाठी असते. अशा कालावधीतच अशा रुग्णाला धाप लागते. आयुर्वेदशास्त्रात या व्याधीला ‘तमकश्वास’ असे म्हणतात. आयुर्वेदात ज्या महाव्याधी सांगितल्या आहेत, त्यांतील ‘श्वास’ या रोगाचा हा एक प्रकार आहे. आयुर्वेदीय शास्त्रानुसार दमा म्हणजे नेमके काय ते पाहू.
प्राण-उदानाची जोडी श्वासोच्छ्वासाचे काम करत असते. उरलेल्या तीन बाजूंचा म्हणजे समान, व्यान व अपान यांचाही प्रभाव श्वासोच्छ्वासावर होत असतो. वाताची गती जोवर व्यवस्थित आहे तोवर श्वसन व्यवस्थित चालू असते, पण ती गती कफदोषामुळे अवरुद्ध झाली तर अडलेला वात प्राणवह, उदकवह तसेच अन्नवह स्रोतसांना बिघडवतो व दम्याची उत्पत्ती करतो. थोडक्यात, दमा होण्यास कफ व वात हे दोन दोष मुख्यत्वे कारणीभूत असतात.
दम्याची मुख्य कारणे

 • दमा हा आजार ॲलर्जीशी संबंधित असल्याने जेव्हा असा रुग्ण एखाद्या ॲलर्जीकारक घटकाच्या सान्निध्यात येतो, तेव्हा हा त्रास सुरू होतो. जसे की, घरातील व घराबाहेरील धूर, धूळ, परागकण. शेतात गेल्यावर वेगवेगळे परागकण भोवती असतात, आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारचे गवत असते किंवा जंगलात एखादी व्यक्ती गेली किंवा शेतात काम करणाऱ्या व्यक्ती तर कायमच अशा परागकणांशी निगडित असतात.
 • परागकणांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचा धूर म्हणजे वाहनातून बाहेर पडणारा धूर, फटाक्यांचा धूर, वेगवेगळ्या प्रकाराने निर्माण होणारे धूर, उदबत्ती लावतो तिचा धूर, डासांसाठीचा, अगरबत्त्यांचा धूर वगैरे. यांच्यापासून निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या धुरांमुळे त्रास उद्भवू शकतो. हा वेगवेगळ्या प्रकारचा धूर दम्यास कारणीभूत असतो.
 • याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची थंड पेये, बाजारातील खाद्यपदार्थ- ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे रंग, तेले वापरली जातात- त्यांमुळे दम्याचा त्रास होतो.
 • उग्र वासामुळेही काहींना दम्याचा त्रास होतो. काही व्यक्तींना अयोग्य व्यायाम केल्यानेही दम्याचा त्रास होतो.
 • वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसायजन्य घटकही या त्रासाला कारणीभूत ठरतात. काही व्यक्ती सॉ-मिल, कॉटन मिल, साखर कारखाने यांसारख्या ठिकाणी काम करतात, जेथे बरेच प्रदूषण असू शकते.
 • याशिवाय भाजी मांडून बसणाऱ्या स्त्रिया, कपडे मांडून बसलेले दुकानदार, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांवर वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करणारे विक्रेते, रस्त्याकडेलाच पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्ती, ट्राफिक पोलिस, पिठाच्या गिरणीत काम करणारे कामगार इत्यादींना सतत धूळ व धुराच्या सान्निध्यात काम करावे लागल्याने दम्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते.
 • लहान-मोठ्या मुलांना प्रिय असलेली टेडी बिअरसारखी खेळणीही दम्याला कारणीभूत ठरतात.
 • त्याचप्रमाणे पिझ्झा, बर्गर, चाट आणि बाहेरच्या गाड्यांवरचे पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ हे सगळे घटक दम्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

दम्याची लक्षणे

 • सर्दी होते, घशात कफ साठल्याने श्वासोच्छ्वासाच्या वेळी घूर-घूर असा आवाज येतो, खोकला येतो. खोकल्याची उबळ तीव्र असते, पण छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते, पण कफ काही सुटत नाही. बराच वेळ खोकल्यावर जर थोडा कफ पडला तर काहीवेळापुरते बरे वाटते, पण पुन्हा खोकला येतोच, दम लागतो, बेचैनी वाटते, खूप तहान लागते.
 • दम लागायला लागला की बोलताना त्रास होतो. आडवे पडला तर छातीवर दाब येतो, वेदना होतात, दम अजूनच वाढतो.
 • डोक्याला व संपूर्ण अंगाला घाम येतो. काहीतरी गरम घ्यावे किंवा छातीवर शेक घ्यावा अशी इच्छा होते.
 • बहुधा असा त्रास रात्रीच्या अंतिम प्रहरी होतो. पावसाळा, ढगाळ वातावरण, थंड वातावरणात त्रास वाढतो. कफकारक आरोह-विहारानेही त्रास वाढतो.
 • राग, भय, अतिरिक्त ताण यांमुळेही दम्याचा त्रास वाढतो.
 • कफप्रधान प्रकारात छातीत कफ अधिक असतो, खोकल्याची ढास त्यामानाने कमी लागते व हा कफ लवकर सुटतो.
 • वातप्रधान प्रकारात मात्र खोकला कोरडा असतो. खूप खोकल्यावर थोडासा कफ सुटतो. हा प्रकार अधिक कष्टकारक असतो.

दम्यावरचे काही घरगुती उपाय

 • अडुळशाचे पिकलेले पान वाफवून रस काढावा व दोन चमचे रसात चिमूटभर दालचिनी चूर्ण टाकून मधात मिसळून दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे.
 • दालचिनी, लवंग, मिरे, सुंठ व खडीसाखर समभाग एकत्र करून हे चूर्ण मधातून सकाळ-संध्याकाळ घ्यावे.
 • आल्याचा रस व मध हे मिश्रण वारंवार चाटवावे.
 • लवंग व वेलची घालून विड्याचे पान चघळत खाण्याने दम्याचा तीव्र वेग कमी होतो. रस हळूहळू गिळावा.
 • रुईच्या पानास थोडेसे तेल लावून तव्यावर गरम करावे व त्याने छाती व पोटाला शेकावे, लगेच गुण मिळतो.
 • दम्याचा तीव्र वेग असता कोमट तीळतेलामध्ये थोडेसे मीठ घालून छाती व पोटाला हलक्या हाताने चोळावे. याने छातीत चिकटलेला कफ सुटतो.
 • निलगिरी वा लवंगाच्या तेलाचा वाफारा घ्यावा.
 • कपभर पाण्यात किसलेले आले टाकून उकळावे व गाळून त्यात खडीसाखर, चिमूटभर कापूर व थोडा हिंग टाकून गरम असताना घोट-घोट प्यावे.
 • दम्याचा विकार असणाऱ्यांनी गवती चहा, तुळशीची पाने, आले, दालचिनी टाकून केलेला चहा नियमित घ्यावा.
 • दम्याचा त्रास असता सकाळी एक कप पाण्यात 1 चमचा मध घालून नियमित प्यावे.
 • जेवणात फोडणीसाठी लसणाचा वापर करावा.
 • पोट हलके व साफ राहील याकडे लक्ष द्यावे.
 • आल्याचा रस, विड्याच्या पानाचा रस व मध समप्रमाणात एकत्र करून घेण्याचाही फायदा होतो.
 • देवदारची साल, गुग्गुल, धूप, ओवा यांची धुरी घेतल्याने फायदा होतो.
 • घराण्यात अनेकांना दम्याचा त्रास झाला असल्यास किंवा होत असल्यास सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी. आईवडिलांपैकी कोणालाही किंवा त्यांच्या घराण्यात पूर्वी कोणाला दम्याचा त्रास झालेला असल्यास जन्माला येणाऱ्या लहान मुलांचीही अगोदरच काळजी घ्यावी.
 • प्रत्येक वेळेस दम वाळवण्याची वाट न पाहता पूर्वी वमन-विरेचनादी पंचकर्म करून घ्यावे.
 • प्राणायाम व योग यांची योग्य सांगड घालावी.
 • सीतोफलादी चूर्ण, श्वासकुठार, बृहतश्वासचिंतामणी यांपैकी काही औषधांचा उपचार वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा.
  दमा आटोक्यात येतो, फक्त त्याची पूर्वतयारी करणे गरजेचे असते.