दक्षिण गोव्यात अपयश आले; पण मते वाढली : मुख्यमंत्री

0
9

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात अपयश आले असले, तरी दोन लाखांपेक्षा जास्त मते भाजपला मिळाली त्याचे श्रेय कार्यकर्ते व लोकांना द्यावे लागेल. या निवडणुकीत उत्तर गोव्यात 16, तर दक्षिण गोव्यात 11 विधानसभा मतदारसंघांत भाजप मोठा पक्ष ठरला. परिणामी येत्या 2027 च्या विधानसभा निवडणुकीत 27 पेक्षा जास्त भाजप जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

दक्षिण गोवा भाजप कार्यालयात ‘मतदार धन्यवाद’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. राज्यसभा खासदार व प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री, दक्षिण गोव्यातील मंत्री व आमदार उपस्थित होते. तसेच दामू नाईक, नरेंद्र सावईकर व पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजप थोडा कमी पडला; पण मताधिक्य वाढले. पराभवाला अनेक कारणे आहेत. त्यावर आम्ही विचार करून नव्याने पक्ष मजबूत करणार आहोत. आता प्रत्येक मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते मतदारांकडे जाऊन त्यांचे आभार मानणार असून, ते अभियान लवकरच सुरू होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दक्षिण गोव्यातील विजयानंतर इंडिया आघाडीते नेते अतिउत्साहात आहेत. आता ते 2027 मध्ये मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पाहत आहेत; पण ते स्वप्नच ठरेल, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.