राज्य सरकारने काल एका आदेशाद्वारे दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी ज्योती कुमारी (आयएएस) यांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी दक्षिण गोव्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अश्विन चंद्रू ए. (आयएएस) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर एका धर्मादाय कार्यक्रमासाठी दक्षिण गोवा जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 1 हजार रुपयांची आर्थिक मदत गोळा करण्याचा आदेश जारी केल्यानंतर ज्योती कुमारी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. सरकारने ज्योती कुमारी यांची बदली करत, त्यांची आता गोवा मनोरंजन संस्थेच्या (ईएसजी) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.