दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत अनुक्रमे भाजपचे सिद्धार्थ गावस देसाई व अंजली अर्जुन वेळीप या 16 विरुद्ध 9 मतांनी निवडून आल्या. काल जिल्हा पंचायत कार्यालयात ही निवडणूक झाली. विरोधी पक्षातील एक मत भाजपच्या उमेदवारांना मिळाले.
काँग्रेस – गोवा फॉरवर्ड आघाडीतर्फे लुईझा रॉड्रिगीस यांनी अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्ष पदासाठी इनासिना पिंटो यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे ही निवडणूक झाली.
काँग्रेसचे 8, गोवा फॉरवर्डचा 1 आणि आपचा 1 मिळून 10 जिल्हा पंचायत सदस्य आहेत; पण विरोधी पक्षाच्या उमेदवारांना प्रत्येकी 9 मतेच मिळाली. विरोधकांचे एक मत फुटले. कोलवा प्रभातील सदस्याने मत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला न दिल्याचा काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी आरोप केला.
दरम्यान, विरोधकांचे एक मत फुटल्याच्या पार्श्वभूमीवर, बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, आपला पक्ष भाजपच्या विरोधात आहे. भाजपला हटवण्यासाठी आम आदमी पक्ष विरोधी पक्षांसोबत आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत आपण विरोधी पक्षांसोबत होते. आजही त्यांच्यासोबत आहे. भाजपला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एकजूट होणे आवश्यक आहे. असे असताना आपला जिल्हा पंचायत सदस्य भाजपच्या उमेदवाराला मत देणार नाही.
उत्तर गोव्यात बिनविरोध निवड
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी अपेक्षेनुसार भाजपच्या रेश्मा बांदोडकर आणि नामदेव च्यारी यांची काल बिनविरोध निवड झाली. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी विरोधी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे अध्यक्षपदी रेश्मा बांदोडकर आणि उपाध्यक्षपदी नामदेव च्यारी यांची बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी
काल केली.
उत्तर गोवा जिल्हा पंचायतीमधील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन विकासकामे राबविण्यात येणार आहेत, असे नवनिर्वाचित अध्यक्ष रेश्मा बांदोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.