थरूर विरुद्ध खर्गे

0
33

कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आता शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे असे दोन दिग्गज नेते उरले आहेत. अशोक गेहलोत, दिग्विजयसिंह असे करीत करीत अचानक मल्लिकार्जुन खर्गेंचे नाव पुढे आले, तो काही निव्वळ योगायोग नव्हे. शशी थरूर यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी जोरदार आघाडी उघडल्याने त्यांना शह देण्यासाठीच खर्गेंचे घोडे पुढे दामटण्यात आले आहे हे उघड आहे. खरे तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाला गांधी घराण्याने पहिली पसंती दिली होती. परंतु त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडावे आणि राहुल गांधींचे तरुण मित्र सचिन पायलट यांना ते बहाल करावे असा प्रयत्न चालला होता. मात्र, गेहलोत यांनी मुख्यमंत्रिपद सोडावे लागते हे पाहून अप्रत्यक्षपणे बंडाचाच पवित्रा घेतला आणि परिणामी गांधी घराण्याची इतराजी ओढवून घेतली. सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदी आणण्यास विरोध करीत त्यांच्या समर्थकांनी राजीनामास्र उगारले आणि पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांना विधिमंडळ गटाची बैठक न घेताच हात हलवीत परतावे लागले हा केवळ त्या निरीक्षकांचा नव्हे, तर राहुल गांधींचा अपमान ठरल्याने गेहलोतांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीतून आपोआप बाद झाले. त्यामुळे हे ओळखून गेहलोत यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत न उतरता आपले मुख्यमंत्रिपदच कायम राखण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला.
गेहलोत माघार घेत आहेत हे पाहताच मध्य प्रदेशचे ज्येष्ठ परंतु वादग्रस्त नेेते दिग्विजयसिंह यांच्या महत्त्वाकांक्षेने उचल खाल्ली आणि त्यांनी संधीचा फायदा घेत आपले घोडे रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न केला. शशी थरूर यांनी ताबडतोब त्यांच्याकडे धाव घेऊन त्यांनी निवडणुकीत उतरू नये असा प्रयत्न केला, परंतु थरूर यांच्या विरोधात गांधी कुटुंब आपल्या पाठीशी राहील असे वाटल्याने दिग्विजयसिंहांनी त्यांना नकार दर्शवला होता. मात्र, प्रत्यक्षात दिग्विजयसिंहांसारखे वाचाळ नेते अध्यक्षपदी येणे धोक्याचे ठरू शकते हे जाणल्याने गांधी कुटुंबाने मल्लिकार्जुन खर्गेंना अचानकपणे पुढे आणले. खर्गेंनी दिग्विजयसिंहांना ह्याची कल्पना दिली तेव्हा आपली उमेदवारी मागे घेण्यावाचून सिंह यांना पर्याय उरला नाही आणि उमेदवारी अर्ज नेलेेला असतानाही तो न भरण्याचे शहाणपण त्यांनाही दाखवावे लागले.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण तीन अर्ज दाखल झाले होते. शशी थरूर, मल्लिकार्जुन खर्गे आणि तिसरा अर्ज होता तो आगंतूक के. एन. त्रिपाठी यांचा. परंतु त्रिपाठींचा अर्ज बाद ठरल्याने आता थरूर आणि खर्गे रिंगणात आहेत.
कॉंग्रेस पक्षात संघटनात्मक निवडणुका झाल्या पाहिजेत, पक्षाला नवसंजीवनी मिळाली पाहिजे वगैरेंसाठी आग्रही असलेले शशी थरूर ज्या २३ नेत्यांच्या गटामध्ये सामील झाले होते, त्यातील बहुतेक नेते मात्र आज त्यांच्या मागे नाहीत असे दिसते आहे. थरूर यांच्या उमेदवारी अर्जाला अनुमोदन देणार्‍यांमध्ये मोहसिना किडवई सोडल्यास कोणीही ज्येष्ठ कॉंग्रेस नेता त्यांच्यासोबत दिसत नाही. कार्ती चिदंबरम आणि काही लोकसभा खासदारांनी त्यांच्या अर्जावर सह्या केल्या आहेत.
दुसरीकडे, खर्गेंची उमेदवारी जरी गांधीनिष्ठ म्हणून पुढे आलेली असली तरी त्यांना पृथ्वीराज चव्हाणांपासून आनंद शर्मांपर्यंत आणि मनीष तिवारींपासून भूपिंदर हुडांपर्यंत जी-२३ गटातील नेत्यांचा पाठिंबा दिसतो. त्यामुळे सद्यपरिस्थितीमध्ये खर्गे यांचेच पारडे जड दिसते आणि हे स्पष्ट दिसत असल्याने शशी थरूर आपली उमेदवारी आठ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने मागेही घेऊ शकतात. सध्या जरी ते आपण लढणार असल्याचे छातीठोकपणे सांगत असले तरी एकूण चित्र खर्गेंना अनुकूल दिसते.
मल्लिकार्जुन खर्गे ह्यांनी आपल्या राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरही ह्या उमेदवारीसाठी पाणी सोडले आहे. म्हणजेच त्यांना आपल्या विजयाची पूर्ण खात्री आहे. गांधी कुटुंब या निवडणुकीत तटस्थ राहील असे आश्वासन जरी सोनियांनी आपल्याला दिले असल्याचे शशी थरूर म्हणत असले, तरी प्रत्यक्षात खर्गेंची उमेदवारी ही त्यांच्याच आशीर्वादाने पुढे आलेली दिसते. त्यामुळे थरूर यांना सोनिया आणि कंपूचा पाठिंबा मिळणे निव्वळ असंभव आहे. खर्गे हे जरी ज्येष्ठ नेते असले तरी त्यांच्यापाशी ना धड नेतृत्व, ना कर्तृत्व, ना वक्तृत्व. सारे काही मिळाले आहे ते गांधी कुटुंबाच्या कृपेने मिळालेले आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षपदी जरी ते उद्या आले तरी अंतिम शब्द गांधी कुटुंबाचाच चालणार आहे. गांधी कुटुंबाला तेच तर अपेक्षित आहे. तेवीस बंडखोरांच्या हट्टापायी जरी संघटनात्मक निवडणुका २२ वर्षांनंतर घेतल्या जात असल्या तरी पक्षाची सूत्रे आपल्या हातून जाऊ द्यायला सोनिया, राहुल आणि त्यांच्याभोवतीचे कोंडाळे थोडेच तयार होईल!