डॉ. अनुजा जोशी
सर्वशक्तिमान निसर्गाची पूजा निसर्गातल्याच वस्तूंनी करायची. निसर्गाला देव बनवून जपायचं. त्यासाठी मातीच्या मूर्तीच्या चरणाशी अवघा भाव अर्पण करायचा. मनोभावे लीन व्हायचं. मातीचा सण तसा हा मतीचा म्हणजे बुद्धीचा, बुद्धिनिष्ठतेने करायचा सण. गणेश ही त्यासाठीच बुद्धीची देवता. आपला देह मातीचा. आपला देव मातीचा. आपला देव ‘मती’चा! आपलं आयुष्य मातीसारखंच क्षणभंगुर आहे, पण ते अशा भावसुंदर रीतीने, श्रद्धेने साजरे केलेल्या सण-सोहळ्यांनी अधिकाधिक सुंदर, अर्थपूर्ण व निसर्गानुकूल करत जगायचं, हे भान सतत जागं ठेवायचं असा या चैतन्यमयी चतुर्थीचा संकेत व संदेश!
लाबादप्रमाणे गणेशचतुर्थी आली. ‘नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा।’ या उक्तीप्रमाणे या पावसाबरोबर, पावसासारखाच प्रिय असणाऱ्या ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर आसमंतात दुमदुमू लागला. बाप्पा येणार, बाप्पा येणार म्हणता म्हणता आता अगदी दोन दिवसांत बाप्पा घरोघरी सुशोभित मखरात विराजमान होईल. घरादारांची साफसफाई, रंगरंगोटी, सुशोभिकरण, रोषणाई, भेटीगाठी, फराळ, फटाके, कपडे, दागिने, भांडीकुंडी नि भरपूर खरेदी, अशी सगळ्याची धामधूम आटोपत आता गणपती आणायला लोक गणपतीच्या शाळेत जातील. आपण घरातल्या मुलाबाळांच्या हौशीनुसार, त्यांना आवडेल तसा सांगितलेला, आपल्या नावाचा गणपती कमळावर, सिंहावर, गरुडावर बसलेला दिसला की त्याक्षणी जो अत्यानंद होईल, तोच रंगीत संगीत होऊन सगळ्या सणावर पसरून राहील. तनामनात व आसमंतात नांदेल.
आपल्याला सहजच आपल्या लहानपणीचे दिवस आठवतील. बदलत्या काळाबरोबर गणपतीनेही कसं आधुनिक रूपडं घेतलंय याचा विचार मनात आला की गंमत वाटेल. पूर्वी आमचा देवबाप्पा कागद गुंडाळून, नवा खण पांघरून डोक्यावरून घरी यायचा. दगडधोंड्यांची खडबडीत वाट असे, घाटी असे, चढाव लागे, पाऊसपाणी खूप, रानातल्या बिकट वाटा, लांब लांबवर पसरलेला गाव या सगळ्यातून ते देखणं ‘चित्र’ जपत जपत लोक घरी आणत. आता गच्च झाडी गेली, चढाव-उतार कापले गेले, वाकड्या-तिकड्या वाटा सरळ झाल्या, घरापर्यंत डांबरी रस्ते झाले. डोक्यावर बसून चालत घरी येणारा गणपती आता चारचाकीत बसून दिमाखात घरी येतो. घरातल्या बाईने आत जाणारी पावलं रांगोळीनं रेखलेली असतात. ती सुहासिनी दारात औक्षण करते व पाटावर बसलेला गणपती घरात पाऊल ठेवतो. घर आनंदाने भरून जाते.
आपली नजर त्या देखण्या ‘चित्रा’वर खिळते. पहिल्या नजरभेटीत त्याच्यावर प्रेम बसतं. मूर्तीकाराने त्या ‘चित्रा’च्या डोळ्यात ‘कृपादृष्टी’ रेखलेली असते. चेहऱ्याला ‘स्नेहल वत्सलते’चा रंग दिलेला असतो. दोन हातातल्या पाशांकुशादी शस्त्रांमध्ये त्याने ‘राखण’ साकारलेली असते. एका हातातून ‘वरदहस्ता’चा आशीर्वाद उमटलेला असतो आणि गणपतीच्या एका हातात त्याने ठेवलेल्या सुरेख मोदकातून ‘सुखाची गोडी’ खुणावत असते! गणपती येतो आणि घर वेगळ्याच चैतन्याने भरून, भारून जाते. आता लाडक्या गणरायासाठी मखर तयार होत असतं. माटोळी बांधली जात असते. सजावटीवरून शेवटचे हात फिरत असतात. करंज्या, लाडू, मिठाईने डबे भरून तयार असतात. खूप सारा उत्साह, ऊर्जा आणि आनंदाने घरदार भरून गेलेलं असतं.
हो, बरोबर आहे. आता काळ बदलला, परिस्थिती बदलली, साधनं बदलली, तपशील बदलले. पण आनंद तोच आहे. हर्ष-उल्हास तोच आहे. चैतन्य तेच. उर्जा- प्रेरणा- कामना- मनोधारणा तीच आहे. बाप्पावरचे प्रेम तेच! बाप्पा देतो ते बळ तेच आहे! वरवर काहीही व कितीही बदलले तरी हृदयात सर्वकाळ अखंड-अभंग राहते तीच तर ‘श्रद्धा’! या धारणेनेच सण साजरे करायचे. या प्रेरणेनेच परंपरा जपायची. संस्कृती अशीच सश्रद्धपणे वाहत असते, वाहत राहते. आपण त्या प्रवाहाचे एक भाग असतो. किंबहुना एकेका थेंबासारखा एकेक जीव जोडला जाऊन हा प्रवाह, जीवनप्रवाह बनतो. त्याला सुंदर, सुशोभित, सार्थ व समृद्ध करतो, तो सण. साध्या जगण्याचा सोहळा होतो तो सणामुळे. श्रीगणेशाच्या चतुर्थीचा सण हा सगळ्या सणांचा एक मुकुटमणीच!
तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता
अवघ्या दीनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा…
साध्या जगण्याला सुखप्रद करणारा व अवघ्या दु:खांचे हरण करणारा श्रीमंगलमूर्ती मोरया आपल्या घरी येतो, वस्ती करतो आणि सुखाचा वर्षाव व विघ्नांचा नाश करून वाजत-गाजत निरोप घेतो, ही चतुर्थी सणाची रीतच अनोखी. सभोवतीच्या निसर्गाला आपल्यात सामावून घेणारी! भारतीय संस्कृतीने सगळेच सणवार निसर्ग, हवामान व आरोग्य या त्रिसूत्रीच्या आधारावर साजरे करण्याचे संकेत दिलेले आहेत. सण साजरे करताना डोळस नजरेने बघून ती-ती प्रथा पाळली, साजरी केली तर ‘अधिकस्य अधिकम् फलम्’ याप्रमाणे त्याचा फायदा जास्त. गणेश चतुर्थी सणामागचेही काही दंडक, काही संकेत आहेत. गणपतीची कृपादृष्टी हवी तर ते संस्कृती विज्ञान समजून घेणारी दृष्टीही सण साजरा करताना हवीच हवी. अगदी मुळापासून पाहाल तर हरखून जायला होईल.
देवाधिराज गणेशाचा हा सण म्हणजे मातीच्या गौरवाचा सण. मातीची मूर्ती करून तिला मखरात बसवण्याचा, सजवण्याचा, सन्मानित करण्याचा सण. भारत हा कृषिप्रधान देश. भरपूर पावसाचा प्रदेश. अर्थातच इथे मातीला शिरोधार्य मानणे स्वाभाविकच. पर्वताची मुलगी पार्वती, आणि तिचा हा पुत्र. पर्वत मातीचा, पर्वताची मुलगी हीसुद्धा मृण्मयीच म्हणजे मातीच! म्हणूनच या मातेचा पुत्रही मातीचाच. गणपतीचा आरक्तवर्णही मातीचाच. त्याचं पूजन ही एक अवघी निसर्गपूजाच. मातीच्या पूजेला सारं काही निसर्गातलं. मखर झाडापेडांचं. आरास, माटवी रानफळं, तुरे व घोसांची. पूजेसाठी वाहायला पानं, फुलं, गवत सगळं काही. नैवेद्याला शेतात पिकणाऱ्या तांदळाचं गोडधोड. महादेवाचा नारळ हा याचा पिता. नदीवरून आणलेला पाण्याचा कलश, फुलं, कोवळी रोपं व खड्यांच्या गौरी ही त्याची माता. सण आटोपला की विसर्जनही नदी-समुद्राच्या पाण्यातच. विसर्जन हा अंत, शेवट नव्हे; ते विशिष्ट प्रकारे पुन्हा सुरू होणे आहे. नवीन रूपात निर्मिती पुन्हा करू लागणे आहे. जगण्याचं चाक पुन्हा नव्या रूपात फिरू लागणे आहे. थोडक्यात काय, तर सर्वशक्तिमान निसर्गाची पूजा निसर्गातल्याच वस्तूंनी करायची. निसर्गाला देव बनवून जपायचं. त्यासाठी मातीच्या मूर्तीच्या चरणाशी अवघा भाव अर्पण करायचा. मनोभावे लीन व्हायचं. मातीचा सण तसा हा मतीचा म्हणजे बुद्धीचा, बुद्धिनिष्ठतेने करायचा सण. गणेश ही त्यासाठीच बुद्धीची देवता. आपला देह मातीचा. आपला देव मातीचा. आपला देव ‘मती’चा! आपलं आयुष्य मातीसारखंच क्षणभंगुर आहे, पण ते अशा भावसुंदर रीतीने, श्रद्धेने साजरे केलेल्या सण-सोहळ्यांनी अधिकाधिक सुंदर, अर्थपूर्ण व निसर्गानुकूल करत जगायचं, हे भान सतत जागं ठेवायचं असा या चैतन्यमयी चतुर्थीचा संकेत व संदेश!
िििि
भारतीय संस्कृतीने मानवी आयुष्याचा सर्व बाजूंनी परिपूर्ण विचार केला आहे. अथर्ववेदाचा उपवेद असलेल्या आयुर्वेदाने, भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात इथल्या ऋतू, काल, स्थिती व वातावरणाला मिळते-जुळते घेत सर्वार्थाने उत्तम जगण्यासाठी, उत्तम जीवनशैलीयुक्त आरोग्याचा पाया रचला आहे. आपल्या सर्वच सणवारांमधून व्यक्तिगत, सामाजिक व पर्यावरणीय आरोग्याचे भरण-पोषण हाच संकेत आहे. शरीर, मन व बुद्धी हा आरोग्याचा त्रिकोण आहे. सुदृढ शरीर, संवेदनशील मन व सुविचारी बुद्धी हा संपूर्ण आरोग्याचा मूलमंत्र आहे. सर्वच सणांमधून तो मिळत असतो. गणेशोत्सव, या मांदियाळीत मुकुटमण्यासारखा शिरोभागी विराजमान असल्यामुळे ‘गणपतीपूजन’ हा तर या ‘संपूर्ण आरोग्याचा’च विचार आहे असे म्हणता येते. एक महत्त्वाचे उदाहरण बघू. गणपतीला ज्या 21 दूर्वा आपण वाहतो, ती 21 ही संख्या कुठून येते? कसली आहे? त्याचे काही लॉजिक आहे का? तर आहे! आपल्या शरीराचे विविध 21 घटक समावस्थेत (नॉर्मल) असतील तर त्याला ‘स्वस्थ शरीर’ किंवा तब्येतीचे ‘स्वास्थ्य’ म्हटले जाते.
समदोष:समाग्निश्च समधातु मलक्रिया:।
प्रसन्नात्मेंद्रियमन: स्वस्थ इत्याभिधीयते॥
ि वात, पित्त, कफ (त्रिदोष)-3
ि अग्नी (जाठराग्नी)-1 रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा,
शुक्र (सप्तधातू)- 7
ि मल, मूत्र, स्वेद (त्रिमल)- 3
ि आत्मा- 1
ि पंचज्ञानेंद्रिये/कर्मेंद्रिये/पंचसंवेदना- कान, त्वचा, डोळे, जिव्हा, नाक- 5
ि मन- 1
याप्रमाणे वरील 21 घटक कार्यक्षम, प्रसन्न, समाधानी असतील त्याला ‘उत्तम स्वास्थ्य’ म्हणायचे! या 21 घटकांचा विचार म्हणजेच ‘गणपतीला प्रिय’ अशी ठरवलेली 21 ही शुभकारक संख्या. मग ती त्याला वाहायच्या दूर्वांची असो किंवा त्याला आवडणाऱ्या मोदकांची! बरं झालं, मोदकाचाही विषय आला. ‘मोदक’ हा नावाप्रमाणेच सर्वकाळ सर्वांना ‘मोद’ म्हणजेच ‘आनंद’ देणारा असतो, म्हणूनच तो गणपतीला आवडतो. याचा आरोग्याचा दृष्टीने काही अर्थ आहे का? तर हो, निश्चितच आहे! आपल्या प्रदेशात चिकट मातीत, चिखलात तग धरून टिकणारा व पिकणारा तांदूळ. आपले मुख्य अन्न. अन्नाचा राजा- तांदूळ! बलपुष्टीकारक नारळ, पौष्टिक व उष्ण गुणाचा गूळ आणि वाफेवर शिजवून केलेला उकडीचा मोदक हा गोड पदार्थ तूप घालून खाल्ला की तनामनाची छान तृप्तता होते. याचं वैशिष्ट्य असं की, हा कमी खाल्ला तरी अतृप्ती राहत नाही व जास्त खाल्ला तरी बाधत नाही. उकडीच्या मोदकाचे सहसा अजीर्ण-अपचन होत नाही हे किती महत्त्वाचं! जिभेवरचा ताबा सुटून समजा खूप जास्त मोदक खाल्ले गेले तरीही जादा झालेले सगळे लगेच बाहेर पडून जाते व पोट साफ होऊन छान हलकेपणा व प्रसन्नता येते! असा कोणत्याही परिस्थितीत आनंद एके आनंदच देणारा तो ‘मोदक!’
गणपतीला दूर्वांसहित वाहायची 21 प्रकारची पत्री, या उत्तम औषधी वनस्पती आहेत. अगस्ती, अर्जुन, आघाडा, कण्हेर, केवडा, जाई, डाळिंब, डोर्ली (रानवांगे), तुळशी, दूर्वा, देवदार, धोतरा, पिंपळ, बेल, बोर, मरवा, मधुमालती, माका, रूई, शंखपुष्पी, शमी अशा वनस्पतींची पाने ‘पत्री’ म्हणून वाहण्याची प्रथा आहे. माटोळीला बांधल्या जाणाऱ्या रानफळांमागेही रानझाडांची जपणूक, संवर्धन, त्यांचा बीजप्रसार, औषधी उपयुक्तता असे विविध हेतू आहेत. उदा. माटोळीच्या तांबड्या चुटुक कांगलांना संस्कृतमध्ये ‘ज्योतिष्मती’ असे म्हणतात. बुद्धी-मेंदूला ज्योतीप्रमाणे तल्लख, तेजस्वी करणारी ती लालकेशरी ‘ज्योतिष्मती!’ या फळांच्या बियांचे तेल ‘नस्य’ उपचारासाठी बुद्धिमांद्य, आकडी येणे, अर्धांगवायू इ.मध्ये वापरले जाते. ही अगदी नमुन्यादाखल दिलेली उदाहरणे. असे अनेक उपयुक्त तपशील आहेत. सुदृढ, निरोगी शारीरिक स्वास्थ्यासाठी ‘गणपती पूजन’ हे असे ‘डोळस’ दृष्टीने करायचे असते.
गणपती हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. संगीत, वादन, नर्तन, चित्रकला, हस्तकला अशा विविध कलांचा मनमुराद वापर आपण गणेशोत्सवात करतोच. कला ही मनाची सुबत्ता, जाणिवांचं भरण-पोषण, जगण्याची समृद्धी, मनाची शांतता, निरामयता कलेने मिळते. ताणतणावांच्या, आधुनिक धकाधकीच्या जीवनात सणाचे चार दिवस स्नेहशीलतेने, बंधुतेने एकत्रितपणाने भरून जातात. ‘आर्त’ भावाने म्हणायची ती ‘आरती’ मनातला सश्रद्ध भाव वाढवते व जगण्याची नवी उमेद देते. उत्तम मानसिक स्वास्थ्यासाठी भावसुंदरपणे हा कलासंपन्न गणेशोत्सव करायचा असतो.गणपती ही साक्षात बुद्धीची देवता. हत्तीचे मस्तक लावलेले मानवी शरीर हे त्याचे रूप आहे. हत्ती हा प्रचंड बुद्धिवान व बलवान प्राणी आणि तरीही तो शाकाहारी आहे. अन्नासाठी हिंसा करत नाही. बुद्धी व बळ दोन्हींची सत्ता गाजवत असूनही तो मदांध-सत्तांध-पाशवी होत नाही. त्याची बुद्धी सात्त्विक असते. दुराचाराचा मात्र तो कटाक्षाने नि:पात करतो. आज लोकशाही देशात राजकीय क्षेत्राने जीवनाचे हर एक क्षेत्र काबीज केलेल्या जमान्यात गणपतीच्या उपासनेतून आपल्याला बऱ्याच सामाजिक, राजकीय समस्यांचा विचार करता येतो. विवेकशील बुद्धिनिष्ठता, प्रामाणिकपणा, स्वाभिमान, संस्कृतीविषयक अस्मिता व सत्यवर्तन या सगळ्या मूल्यांची जपणूक म्हणजेच गणपतीची बौद्धिक पूजा! वेगवान तंत्र-यंत्र युगात व राजकीय प्रदूषणाच्या काळात ही फार महत्त्वाची आहे. उदा. आज राजकीय नेत्यांनी विकत घेतलेले गणेशोत्सव, केलेल्या खैराती, सोडती, बक्षिसे, ध्वनिप्रदूषण, निसर्ग व पर्यावरणाची हानी हे चित्र घातक आहे. चंगळवादी आहे. कलेच्या नावाखाली गणपतीच्या मूर्तीची वाटेल तशी केलेली विडंबने आपण पाहतो. सोड्याच्या बाटल्या, बुचं, खडी भांडी, कोळसा, दगड, काथ्या, कागदाचा लगदा, दोरे, शस्त्रे, तारा, वायर्स कशाहीपासून मोठमोठे, वेड्यावाकड्या तोंडांचे, भेसूर नजरांचे गणपती बनवले जातात. अभिनेत्यापासून ते सैनिक, डॉक्टरापर्यंत कुणाच्याही प्रतिकृतीला सोंड लावून तो गणपती म्हणून उभा केला जातो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केलेल्या घरगुती गणेशोत्सवाचा आपण आज पुरता विपर्यास करून बसलो आहोत. हा सारा मानवी बुद्धीचा विकारी व विखारी दुरुपयोग आहे. असो… हेही कधी ना कधी संपेल, बदलेल. हे असे अनेक दुराचार टाळले जाऊन गणपती पूजनातून बौद्धिक आरोग्यप्राप्ती होवो व शुभंकर जीवनमार्ग मिळो, अशी सदिच्छा आपण बाळगुया.
तू सुखकर्ता तू दु:खहर्ता
विघ्नविनाशक मोरया
संकटीरक्षी शरण तुला मी
गणपती बाप्पा मोरया
असे म्हणत तन, मन व बुद्धीने सुदृढ, सुंदर व निरामय जीवनासाठी त्या सुखकर्ता दु:खहर्ता गजाननाच्या चरणी मनोभावे माथा टेकूया व करूया ‘गणपती बाप्पा मोरया’ या आनंदाचा व भक्तिभावाचा गजर!