तूरडाळ नासाडी; चौकशीचे आदेश

0
13

>> मुख्यमंत्र्यांची माहितंी; प्रकरण चौकशीसाठी दक्षता खात्याकडे

नागरी पुरवठा खात्याने गोदामांत साठवलेली सुमारे अडीच कोटी रुपयांच्या २४२ मेट्रिक टन तूरडाळीच्या नासाडीप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून, संबंधित अधिकार्‍यांवर योग्य कारवाई केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, नागरी पुरवठा खात्याने या प्रकरणाची फाईल चौकशीसाठी दक्षता खात्याकडे पाठविली असून, योग्य चौकशी करून तूरडाळ नासाडीप्रकरणी जबाबदारी निश्‍चित केली जाणार आहे, असे नागरी पुरवठा खात्याचे सचिव संजीत रॉड्रिगीस यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील नागरी पुरवठा खात्याने विविध गोदामांतील नासाडी झालेल्या तूरडाळीची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा जारी केल्यानंतर तूरडाळ नासाडीचे प्रकरण उजेडात आले. कोविड-१९ महामारीच्या काळात सुमारे ४०० मेट्रिक टन तूरडाळ खरेदी करण्यात आली होती, त्यातील १५८ मेट्रिक टन तूरडाळीेचे वितरण करण्यात आले. मात्र उर्वरित तूरडाळ सुमारे दीड-दोन वर्षे वापराविना पडून राहिल्याने २४२ मेट्रिक टन तूरडाळीची नासाडी झाली आहे.
आठ महिन्यांपूर्वी तूरडाळ खराब झाल्याचे आढळून आले होते. या प्रकरणाची सरकारी पातळीवरून योग्य दखल घेण्यात आली नाही. नागरी पुरवठा विभागाने तूरडाळीच्या विल्हेवाटीसाठी यापूर्वी प्रयत्न केला होता; मात्र ठेकेदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांतील अन्य धान्य खराब होण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा नासाडी झालेल्या तूरडाळीची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा जारी करण्यात आली आहे. नागरी पुरवठा खात्याने केलेल्या तूरडाळीच्या नासाडीबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक म्हणाले…
नागरी पुरवठा खात्याच्या विविध गोदामातील नासाडी झालेल्या तूरडाळ प्रकरणी संबंधितांकडून स्पष्टीकरण घेतले जाणार आहे.
कोविड महामारीच्या काळात ही तूरडाळ खरेदी करण्यात आली होती. या खराब झालेल्या तूरडाळीची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा जारी करण्यात आलेली आहे.

आता १० मेट्रिक टन साखर खराब झाल्याचा प्रकार उघडकीस
नागरी पुरवठा खात्याच्या राज्यातील अकरा गोदामांमधील १०.३१० मेट्रिक टन साखर खराब झाल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. नागरी पुरवठा खात्याने काणकोण, केपे, सांगे, फोंडा, सत्तरी, डिचोली, पेडणे, तिसवाडी, मुरगाव आणि बार्देश तालुक्यातील गोदामांमधील खराब आणि वितळलेल्या साखरेची विल्हेवाट लावण्यासाठी २८ जुलै रोजी निविदा जारी केली आहे. सीलबंद निविदा १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.