मंत्रालयातील सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून निर्णय जाहीर; धारबांदोडा, सांगे, केपे व काणकोण तालुक्यांचा समावेश
गेल्या दोन-तीन वर्षांपासून चर्चेत असलेल्या तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंत्रालयात आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केली. या तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेसंबंधी अंतिम निर्णय घेण्यासाठी काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय केपे तालुक्यात तयार करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. या तिसऱ्या जिल्ह्यात धारबांदोडा, सांगे, केपे व काणकोण या चार तालुक्यांचा समावेश असेल. या तिसऱ्या जिल्ह्यामुळे राज्य सरकारच्या प्रशासनाचे विकेंद्रीकरण होईल व जनतेला चांगले प्रशासन व विनाविलंब सेवा देण्यासाठी हा तिसरा जिल्हा फायद्याचा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तिसरा जिल्हा निर्मितीची अधिकृत घोषणा व अधिसूचना 31 डिसेंबर रोजी जारी केली जाणार आहे.
राज्यात तिसरा जिल्हा निर्मितीचा विषय गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू होता. राज्य सरकारने तिसरा जिल्हा निर्मितीचा अभ्यास करण्यासाठी एका समितीचीही स्थापना केली होती. या समितीने अहवाल सरकारला सादर केला. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिसरा जिल्हा निर्मितीवर निर्णय घेण्यात आला होता. तिसऱ्या जिल्ह्याच्या मुख्यालयावरून वादविवाद सुरू झाला होता. त्यात काहींनी कुडचडे, तर काहींनी केपे येथे मुख्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गेले कित्येक महिने तिसऱ्या जिल्ह्याची फाईल धूळखात पडली होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिसरा जिल्हा निर्मितीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्व पक्षांच्या आमदारांची एक बैठक पर्वरी येथे मंत्रालयात काल घेतली. यावेळी तिसरा जिल्हा निर्मितीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
दरम्यान, 1 जानेवारी 2026 पासून जनगणेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने 31 डिसेंबर 2025 रोजी तिसरा जिल्हा स्थापनेची अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सभापतींकडून निर्णयाचे स्वागत
तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेचे सभापती गणेश गावकर यांनी स्वागत केले. तिसऱ्या जिल्ह्यात सावर्डे, धारबांदोडा, केपे, कुडचडे, काणकोण व सांगे या मतदारसंघांचा समावेश होणार आहे. या मतदारसंघातील लोकांना या जिल्ह्याचा लाभ होणार असल्याचे गावकर म्हणाले.
रवी नाईक यांनीही मांडली होती
तिसऱ्या जिल्ह्याची संकल्पना; पण…
माजी कृषीमंत्री दिवंगत रवी नाईक यांनी देखील एक-दोन वर्षांपूर्वी तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेची गरज व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनी फोंडा तालुका केंद्रस्थानी ठेवून या तिसऱ्या जिल्ह्याची स्थापना केली जावी अशी सूचना केली होती; मात्र आता या तिसऱ्या जिल्ह्यात फोंडा तालुक्याला स्थान मिळू शकलेले नाही.
केंद्राच्या धोरणानुसार तिसऱ्या जिल्ह्याचा निर्णय
राज्यांचे प्रशासन जनतेच्या दारापर्यंत नेता यावे, यासाठी छोट्या जिल्ह्यांची स्थापना करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे हे धोरण लक्षात घेऊनच आपल्या सरकारने तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या या धोरणानुसार देशभरात 120 नव्या जिल्ह्यांची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्राकडून अतिरिक्त निधी मिळेल : मुख्यमंत्री
नवीन जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर गोवा सरकारला केंद्राकडून अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. या जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना जिल्हा पातळीवरील कामांसाठी दूरचा प्रवास करावा लागणार नाही. त्यामुळे सावर्डे, धारबांदोडा, केपे, कुडचडे, काणकोण व सांगे या मतदारसंघांतील लोकांना या जिल्ह्याचा मोठा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नीती आयोगाने प्रशासकीय सुलभतेसाठी देशात छोटे जिल्हे स्थापन केले जावेत, अशी शिफारस केली होती, असेही त्यांनी नमूद केले. तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेबाबत राज्य मंत्रिमंडळ, गोवा विधानसभेत चर्चा झालेली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
‘विरोधकांना विश्वासात घेतले नाही’
तिसरा जिल्हा निर्मितीच्या प्रश्नी विरोधी आमदारांना विश्वासात घेतले नाही. तिसरा जिल्हा स्थापन करण्यास आमचा विरोध नाही. तथापि, या तिसऱ्या जिल्ह्यासंबंधी आमदारांना सविस्तर माहिती देण्याची सरकारची जबाबदारी आहे, असे आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.
‘अहवाल विरोधी आमदारांना द्या’
तिसऱ्या जिल्हा निर्मितीचा अहवाल 2023 मध्येच तयार केला आहे. तथापि, हा अहवाल आमदारांना उपलब्ध करण्यात आलेला नाही. तिसऱ्या जिल्ह्याला आपला विरोध नाही; मात्र हा अहवाल विरोधी आमदारांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी
आलेमाव यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.