तिसर्‍या लाटेत दोन्ही डोस न घेणार्‍या नागरिकांचा बळी

0
8

>> लसीकरणासाठी पुढे या; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्यात कोविडच्या तिसर्‍या लाटेत कोरोनाबाधिताच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात २४ तास कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात १०० खाटा आणि दक्षिण गोवा इस्पितळात २०० खाटा कोविडबाधितांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या व्यक्तींना अधिक धोका असून, तिसर्‍या लाटेत राज्यात कोविड लसीचा डोस न घेणार्‍या नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविड लसीकरणासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल कोविड व्यवस्थापन बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल कोविड व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे व आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

बांबोळी येथील सुपर स्पेशालिटी विभागातील दोन मजले कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध केले आहेत. तसेच गृहविलगीकरणातील रुग्णांवर देखरेख ठेवली जाणार आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामाजिक आरोग्य केंद्रात कोविड कीट उपलब्ध करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

सक्रिय १६ गंभीर रुग्णांपैकी १३ लसीविना
सद्यस्थितीत राज्यात कोविडचे १६ गंभीर रुग्ण आहेत. त्यातील १३ जणांनी लस घेतलेली नाही. तिघा गंभीर रुग्णांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. बूस्टर डोस उपलब्ध करण्यात आला आहे; परंतु बूस्टर डोसला कमी प्रतिसाद मिळत आहे. राज्यात पात्र लोकसंख्येच्या ९८ टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

कॉल सेंटर सुविधा पुन्हा सुरू
गृहविलगीकरणातील रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी कॉल सेंटरची सुविधा पुन्हा सुरू केली जाणार आहे. राज्यातील राजकीय पक्ष आणि नागरिकांनी निर्बंध व कोविड नियमावलीचे पालन करून कोविडचा फैलाव रोखावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.