तिरंगा मनातही हवा

0
36

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने येत्या तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली आहे. देशभरात घरोघरी तिरंगा फडकावा, तिरंग्याशी असलेले प्रत्येक भारतीयाचे नाते त्यातून अधोरेखित व्हावे, देशभक्तीची भावना जागावी, राष्ट्रध्वजाविषयीही जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने हे आवाहन केले जात आहे अशी यामागची सरकारची भूमिका आहे. मोदी सरकारकडून देशाच्या जनतेला अशा प्रकारचे भावनिक, प्रतिकात्मक आवाहन केले जाण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. कोरोनाकाळात थाळ्या वाजवण्याचे व त्याद्वारे देशातील कोरोना वॉरिअर्सना पाठिंबा व्यक्त करण्याचे केले गेलेले आवाहनही अशाच प्रकारचे भावनात्मक स्वरूपाचे होते. त्याला देशभरातून प्रतिसादही मिळाला होता. आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याच्या या आवाहनालाही मोठा प्रतिसाद देशभरातून निश्‍चितपणे मिळेल. मात्र, सरकारने तिरंगा फडकावण्याचे आवाहन केलेले आहे, सक्ती केलेली नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. स्वयंस्फूर्तीने ज्यांना ज्यांना वाटेल, शक्य असेल त्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेणे अपेक्षित आहे. परंतु देशातील सध्याचे एकंदर गढूळ वातावरण पाहता, या उपक्रमाचे निमित्त करून उद्या एखाद्या घरावर तिरंगा फडकलेला नसेल, तर त्याला देशद्रोही मानून त्यावर हल्ला चढवला जाणार नाही, दंगे घडवले जाणार नाहीत हेही शासनाने पाहणे आवश्यक असेल. विशेषतः अन्य धर्मीयांच्या घरांना या उपक्रमाचे निमित्त साधून लक्ष्य केले जाऊ शकते व त्याद्वारे धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न होऊ शकतो. याउलट काही घटकांकडून मुद्दामहून तिरंग्याचा अनादरही केला जाऊ शकतो. त्यामुळे हा उपक्रम सकारात्मकतेने घेतला जाणे आवश्यक आहे. त्याचा नकारात्मक गोष्टींसाठी गैरवापर होणार नाही हे पाहणे सरकारची जबाबदारी व कर्तव्य असेल.
देशातील विरोधी पक्षांनी सरकारच्या या उपक्रमामध्ये सहभाग घ्यायचे नाकारले आहे. कॉंग्रेसने स्वतंत्रपणे तिरंगा यात्रा काढल्या. म्हणजेच ह्या उपक्रमाकडे एक राष्ट्रीय उपक्रम म्हणून न पाहता सत्ताधारी भारतीय जनता पक्षप्रणित उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जाताना दिसते. असे व्हायला नको होते. शेवटी आपण यानिमित्ताने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहोत. त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणाकडूनही होऊ नये. आजवर राष्ट्रध्वज हा वर्षातून दोनदा येणार्‍या राष्ट्रीय सणांपुरता मर्यादित होता. झालेच तर ती अतिमहनीय व्यक्तींची मिरास बनून राहिली होती. राष्ट्रीय ध्वजसंहितेमधील कडक नियमावलीमुळे सर्वसामान्यांना इच्छा असूनही तिरंगा फडकावता येत नसे. गेल्या वर्षी ध्वजसंहितेमध्ये अनेक बदल करण्यात आले. सगळ्यांत ठळक बाब म्हणजे यापूर्वी केवळ खादीचा राष्ट्रध्वज वापरावा असा दंडक होता, तो सरकारने काढून टाकला. त्यामुळे आता खादीबरोबरच सुती, पॉलिस्टर, लोकर, सिल्कचा राष्ट्रध्वजही बनवता येतो. सर्वांपर्यंत तिरंगा पोहोचवायचा असेल तर केवळ खादी उत्पादनावर अवलंबून चालणार नाही म्हणून जरी हे करण्यात आले असले, तरी त्यामुळे आधीच रसातळाला चाललेल्या देशातील खादी उद्योगावर गंडांतर आलेले आहे. बाजारपेठेतील अन्य वस्तूंप्रमाणेच आता चिनी बनावटीचे तिरंगेही भारतात येऊ लागले तर आश्चर्य वाटणार नाही. राष्ट्रध्वजाचा आकार काय असावा याबाबत काही दंडक नाही, परंतु तो आयताकार असावा व त्याचे प्रमाण ३ः२ असे असावे असे ध्वजसंहितेमध्ये नमूद केलेले आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अथवा घरावर फडकवला गेलेला राष्ट्रध्वज आता रात्रंदिवस फडकत ठेवता येतो. तो सूर्यास्तावेळी उतरवण्याची अट नव्या कायद्यातून काढून टाकण्यात आलेली आहे. मात्र, यामुळे राष्ट्रध्वजाचा कोठेही कळत – नकळत अनादर होणार नाही, रात्री अपरात्री त्याची अवहेलना केली जाणार नाही याची काळजी घेणेही जरूरी असेल. उलटा, फाटका, अर्ध्यावर लटकलेला राष्ट्रध्वज हा गुन्हा आहे. अतिमहनीय व्यक्ती सोडल्या तर इतरांना आपल्या वाहनावर तो अजूनही लावता येत नाही. सजावटीसाठी त्याचा वापर करू नये, वाहन झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये, मानवी शरीरावर तो कंबरेच्या खाली परिधान करू नये असे दंडक आजही कायम आहेत. त्यामुळे आपली राष्ट्रभक्ती दाखवण्याच्या नादात राष्ट्रध्वजाचा चुकूनही अवमान किंवा अवहेलना होणार नाही हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रखर राष्ट्रभक्ती ही आपल्या मनात असायला हवी. राष्ट्रभक्तीचा केवळ जनात देखावा करायचा आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये भ्रष्टाचार, लाचलुचपत, साठेबाजी, गैरकृत्ये करून राष्ट्राच्या प्रगतीमध्ये अडसर बनायचे याला काय अर्थ आहे? देशभक्ती ही उक्तीपेक्षा कृतीत उतरली तरच ती देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देईल, अन्यथा तो नुसता पोकळ देखावाच ठरेल.